पोस्ट विवरण
सुने
पशु पालन
पशु ज्ञान
DeHaat Channel
6 Mar
Follow

घातक आजारांपासून जनावरांच्या रक्षणासाठी योग्य वेळी लसीकरण आवश्यक! (Timely vaccination is essential to protect animals from dangerous diseases!)

नमस्कार पशुपालकांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

गाई, म्हशी, शेळ्या, मेंढया हे पाळीव प्राणी घटसर्प, फऱ्या, फाशी व आंत्रविषार अशा  साथीच्या रोगांमुळे तडकाफडकी दगावतात. या रोगांची लागण झाल्यानंतर उपचार करण्यास वेळ मिळत नाही, कारण ते अतिशय वेगाने प्राण्यांच्या शरीरावर परिणाम करतात. परिणामी जनावरे दगावल्याने पशुपालकांना आर्थिक आणि भावनिक दृष्ट्या मोठे नुकसान सहन करावे लागते. अशा प्रकारच्या संकटांपासून बचाव करण्यासाठी लसीकरण हा एकमेव प्रभावी उपाय आहे. योग्य वेळी लसीकरणाचे वेळापत्रक पाळल्यास या रोगांचा प्रसार रोखता येतो. पशुपालकांनी नियमितपणे पशुवैद्यकीय तपासणी आणि लसीकरण करून प्राण्यांचे संरक्षण करावे. यामुळे प्राण्यांचे आरोग्य सुधारते आणि पशुपालनाचा व्यवसाय सुरक्षित होतो. चला तर मग आजच्या भागात जाणून घेऊया या रोगाविषयी व लसीकरण कधी करावे याविषयीची माहिती.

घटसर्प:

घटसर्प हा जिवाणूजन्य आजार असून, पावसाळ्यामध्ये जास्त प्रादुर्भाव दिसून येतो. या आजाराची बाधा झाल्यावर जनावरामध्ये अतितीव्र आणि सौम्य अशी दोन प्रकारची लक्षणे दिसून येतात. बऱ्याच वेळा लक्षणे दाखविण्याआधीच जनावर दगावते. त्यामुळे योग्यवेळी लक्षणे ओळखून उपचार करणे अत्यंत आवश्यक आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजना:

  • या आजारावर औषधोपचार करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब हाच जनावरांना वाचविण्याचा उपाय आहे.
  • दरवर्षी पावसाळ्यापूर्वी (एप्रिल- मे महिन्यांत) पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रतिबंधात्मक लसीकरण करावे.
  • लहान वासरांना सहा महिने वयाची असताना लसीची पहिली मात्रा, दुसरी मात्रा तीन महिन्यांच्या फरकाने द्यावी. त्यानंतर दरवर्षी एक मात्रा द्यावी.
  • लसीकरणापूर्वी कृमिनाशक औषधे व परजीवी कीटकांचे निर्मूलन करावे. जेणेकरून लसीकरणाचे चांगले परिणाम दिसून येतात.
  • जनावरांना संतुलित आहार द्यावा. जेणेकरून जनावरांमध्ये योग्य प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती तयार होईल.
  • जनावरांचा गोठा नियमित स्वच्छ ठेवण्यावर भर द्यावा.
  • पावसाळ्यात जनावरांना उघड्यावर चरायला सोडू नये.
  • बाधित जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे. त्यांचे खाद्य-पाणी व्यवस्थापन स्वतंत्र करावे.
  • पशुवैद्यकांच्या सल्ल्याने बाधित जनावरांवर त्वरित उपचार करणे गरजेचे आहे. अन्यथा, जनावर दगावण्याची शक्यता असते.
  • मरतुक झालेल्या जनावराची जमिनीत खोलवर पुरून किंवा जाळून शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी.

फऱ्या:

फऱ्या हा जिवाणूजन्य आजार असून क्लोस्ट्रीडीयम शेवाय या जिवाणूमुळे होतो. दोन वर्षापर्यंतचे धष्टपुष्ट जनावर या आजारास प्रामुख्याने बळी पडते. हा आजार मुख्यत्वे करून पावसाळ्यात आढळून येतो.

प्रतिबंधात्मक उपाययोजना:

  • योग्य उपचारा अभावी पशुधन एक ते दोन दिवसात मृत्युमुखी पडते.
  • जनावरांना नेहमीच्या ठिकाणी चरण्यासाठी सोडू नये.
  • या आजारात मृत्यू दर 70 ते 100% असल्यामुळे आजार होण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे गरजेचे असते. त्यासाठी पशुपालकांनी पावसाळ्यापूर्वी एप्रिल व मे महिन्यामध्ये पशुधनास पशुवैद्यकाच्या साह्याने लसीकरण करून घ्यावे.

फाशी:

निरोगी जनावरांमध्ये काळपुळी(फाशी) आजाराच्या प्रादुर्भावामुळे अचानक मृत्यु होतो. काळपुळी हा आजार बॅसिलस अँथेंसिस या जिवाणूमुळे होतो. या आजाराची बाधा गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, वराह तसेच माणसालाही होऊ शकते. या आजारात जनावराला भरपूर ताप येतो. मृत्यु झालेल्या जनावरांच्या कानातून, नाकातून, तोंड आणि गुदद्वार, योनीमार्ग यांसारख्या अवयवातून काळसर रंगाचा रक्तस्त्राव होतो. मृत्यू झालेल्या जनावराचे रक्त गोठत नाही. ते पातळ आणि काळपट पडते.

प्रतिबंधात्मक उपाययोजना:

  • या आजारावरील प्रतिबंधात्मक लस दरवर्षी न चुकता टोचावी.
  • आजाराचे निदान लवकरात लवकर झाल्यास पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रतिजैविके द्यावीत.

आंत्रविषार:

आंत्रविषार हा जिवाणूजन्य आजार आहे. या आजारात विष तयार झाल्यामुळे आतड्यांच्या दाह होतो. त्यामुळे मृत्यू होतो. या आजारामुळे शेळ्या, मेंढ्यांचा मृत्यू अचानक होतो. प्रादुर्भाव झाल्यापासून 12 ते 24 तासांत करडांचा मृत्यू होतो. करडांना हिरव्या रंगाची पातळ हगवण होते. जिवाणूच्या विषांमुळे जनावरांच्या आतड्यांच्या दाह होतो. यामुळे हगवणीतून रक्त पडते. बाहेरून चारून आलेली जनावरे अचानक सुस्त होतात. हालचाल कमी करतात. बाधित पिले हवेत उडी मारून जमिनीवर पडतात, अडखळत चालतात, जनावरांचा तोल जातो. आजाराच्या शेवटच्या टप्प्यात पोटफुगी, हगवण ही लक्षणे प्रामुख्याने आढळून येतात.

प्रतिबंधात्मक उपाययोजना:

  • ईटीव्ही लस मॉन्सूनपूर्व म्हणजे 15 जूनपर्यंत आणि मॉन्सूननंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत दरवर्षी घ्यावी.
  • तीन महिन्यांवरील कोकरे आणि करडांना आंत्रविषाराची लस द्यावी.
  • पशुवैद्यकाकडून गाभण शेळ्या, मेंढ्यांना आंत्रविषार लसीकरण करून घ्यावे.
  • जनावरांना कोवळे, लुसलुशीत हिरवे गवत जास्त प्रमाणात खाऊ घालू नये.
  • लहान करडांना, कोकरांना गरजेपेक्षा जास्त दूध पाजू नये.
  • शेळ्या मेंढयांना अति कर्बोदके व पिष्टमय पदार्थ युक्त खाद्य (ज्वारी, मका, इ.) जास्त प्रमाणात खाऊ घालू नये.
  • मेलेल्या शेळ्या, मेंढ्यांचे पशुवैद्यकाकडून त्वरित शवविच्छेदन करून घ्यावे. आंत्रविषार या आजाराने मरण पावल्या असल्यास उर्वरित शेळ्या, मेंढ्यांना आंत्रविषार प्रतिबंधात्मक लसीकरण करावे.

तुम्ही तुमच्या जनावरांतील आजारांची लक्षणे ओळखून लसीकरण केले का? हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. घटसर्प आजारासाठी लसीकरण केव्हा करावे?

घटसर्प आजारासाठी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी (एप्रिल- मे महिन्यांत) पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रतिबंधात्मक लसीकरण करावे. लहान वासरांना सहा महिने वयाची असताना लसीची पहिली मात्रा, दुसरी मात्रा तीन महिन्यांच्या फरकाने द्यावी. त्यानंतर दरवर्षी एक मात्रा द्यावी.

2. फऱ्या आजारासाठी लसीकरण केव्हा करावे?

पशुपालकांनी पावसाळ्यापूर्वी एप्रिल व मे महिन्यामध्ये पशुधनास पशुवैद्यकाच्या साह्याने लसीकरण करून घ्यावे.

3. आंत्रविषार आजारासाठी कोणती लस द्यावी?

आंत्रविषार आजारासाठी ईटीव्ही लस मॉन्सूनपूर्व म्हणजे 15 जूनपर्यंत आणि मॉन्सूननंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत दरवर्षी घ्यावी.

43 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ