पोस्ट विवरण
सुने
कृषि
टमाटर
कृषि ज्ञान
कृषी ज्ञान
DeHaat Channel
1 Mar
Follow

टोमॅटो लागवड तंत्रज्ञान (Tomato Cultivation)


टोमॅटो लागवड तंत्रज्ञान (Tomato Cultivation)

नमस्कार शेतकरी बंधूंनो,

महाराष्ट्र हे भारतातील प्रमुख टोमॅटो उत्पादक राज्यांपैकी एक आहे. देशातील एकूण टोमॅटो उत्पादनापैकी सुमारे २० टक्के उत्पादन या राज्यात होते. महाराष्ट्रातील प्रमुख टोमॅटो उत्पादक जिल्हे पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा आणि सोलापूर आहेत. खरीप, रब्‍बी, उन्‍हाळी या तीनही हंगामात टोमॅटो पिकाची लागवड करता येत असल्‍यामुळे टोमॅटो हे महाराष्‍ट्रातील शेतक-यांचे प्रमुख फळपिक आहे. आजच्या लेखात आपण याच टोमॅटो पिकाच्या लागवड तंत्रज्ञानाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

हवामान (Weather) :

 • टोमॅटो हे उष्‍ण कटिबंधातील फळपीक असून महाराष्‍ट्रात याची लागवड तिन्ही हंगामात केली जाते.
 • महाराष्ट्रात टोमॅटो लागवडीचा खरीप हंगाम जूनपासून सुरू होऊन सप्टेंबरपर्यंत चालतो, तर रब्बी हंगाम नोव्हेंबरपासून सुरू होऊन फेब्रुवारीपर्यंत चालतो.
 • अति थंडी पडल्‍यास टोमॅटोच्‍या झाडाची वाढ खुंटते.
 • तापमानातील चढउताराचा फळधारणेवर अनिष्‍ट परिणाम होतो.
 • रात्रीचे तापमान 180 ते 200 अंश सेल्सिअस दरम्यान राहिल्यास टोमॅटोची फळधारणा उत्तम होते.
 • फळांना आकर्षक रंग आणणारे ‘लायकोपिन’ रंगद्रव्य 260 ते 320 अंश सेल्सिअस तापमान असताना भरपूर प्रमाणात तयार होते.
 • तापमान, सूर्यप्रकाश आणि आर्द्रता यांचा एकत्रित परिणाम पिकाच्या वाढीवर व फळधारणेवर होतो.
 • सर्वसामान्य 200 ते 320अंश सेल्सिअस तापमान, 11 ते 12 तास स्वच्छ सूर्यप्रकाश आणि 60 ते 75 टक्‍के आर्द्रता असेल त्यावेळी टोमॅटो पिकाचे चांगले उत्पादन मिळते.

जमीन (Soil) :

 • टोमॅटो पिकासाठी मध्यम ते भारी, खोलीची पोयटयाची, भरपूर पाण्‍याचा निचरा होणारी सुपीक जमीन योग्य असते.
 • टोमॅटोच्या केशमुळ्या ह्या जमिनीच्या वरील 1 फुट थरात पसरत असल्याने हलक्या जमिनीत हे पीक घेतले जाते.
 • हलक्या जमिनीत पाण्याचा निचरा होत असल्याने पिकांची वाढ चांगली होते व पीक लवकर तयार होते.
 • जमिनीचा सामू मध्यम प्रतिचा म्हणजे 6 ते 8 दरम्यान असावा.
 • भारी जमिनीत फळांचा तोडा उशिरा सुरू होतो. परंतु उत्पादन भरपूर निघते.

पूर्वमशागत:

 • शेतास उभी आडवी नांगरणी देऊन नंतर ढेकळे फोडून वखारणी द्यावी.
 • जमिनीत एकरी 12 ते 14 गाडया शेणखत मिसळावे लागवडीसाठी 2 ओळीतील अंतर 60 ते 90 सेमी व दोन रोपातील अंतर 45 ते 60 सेमी ठेवावे.
 • खरीप व हिवाळी हंगामासाठी 90 बाय 60 सेमी अंतरावर व उन्‍हाळी हंगामासाठी 60 बाय 45 सेमी अंतरावर लागवड करावी.

हंगाम (Season) :

 • खरीप: जून, जूलै महिन्‍यात बी पेरावे.
 • रब्‍बी ( हिवाळी हंगाम): सप्टेंबर, ऑक्‍टोबर महिन्‍यात बी पेरावे.
 • उन्‍हाळी हंगाम: डिसेंबर, जानेवारी महिन्‍यात बी पेरावे

बियाण्‍याचे प्रमाण (Acre Seed):

एकरी टोमॅटो पिकाचे 60 ते 80 ग्रॅम बी लागते.

सुधारीत वाण (Varieties):

महाराष्‍ट्रात लागवडीच्‍या दृष्‍टीने उपयुक्‍त टोमॅटोची वाण खालीलप्रमाणे आहेत:

अभिनव(सेमिनीस), अभिराज(सेमिनीस), अलंकार(Clause), रुपाली(इंडो अमेरिकन सीड), जयम 2 (Advanta सीड्स)

लागवड (Cultivation):

 • रोपे तयार करण्‍यासाठी बियांची पेरणी गादी वाफ्यावर करावी.
 • गादी वाफा तयार करण्‍यापूर्वी जमिनीची खोल नांगरट करून कुळवाच्‍या 2, 3 पाळया देऊन जमिन भुसभूशीत करावी.
 • गादी वाफा हा 1 मी. रूंद 3 मी लांब व 15 सेमी उंच असावा.
 • गादी वाफ्यात 1 घमेले शेणखत 50 ग्रॅम सुफला मिसळावे व वाफा हाताने सपाट करावा.
 • पेरणीपूर्वी बियाण्‍यास 3 ग्रॅम थायरम बुरशीनाशक औषध चोळावे.
 • बियांची पेरणी ही वाफयाच्‍या रूंदीस समांतर बोटांनी रेघा ओढून त्‍यात पातळ पेरणी करून बी मातीने झाकून टाकावे.
 • वाफ्यास झारीने पाणी द्यावे.
 • बी उगवून आल्‍यानंतर 10 ते 12 दिवसांनी दोन ओळीत काकरी पाडून प्रति वाफ्यास 10 ग्रॅम फोरेट द्यावे.
 • वाफे हे तणविरहीत ठेवावेत.
 • बी पेरणीपासून 25 ते 30 दिवसांनी म्‍हणजे साधारणतः रोपे 12 ते 15 सेमी उंचीची झाल्‍यावर रोपांची सरी वरंब्‍यावर पुर्नलागवड करावी.
 • रोपे उपटण्‍यापूर्वी एक दिवस आधी वाफ्यांना पाणी द्यावे. त्‍यामुळे रोपांची मुळे न तुटता रोपे सहज उपलब्‍ध होतात.
 • रोपांची पुर्नलागवड नेहमी संध्‍याकाळी किंवा ऊन कमी झाल्‍यावर करावी.

रासायनिक खते (Fertilizer Management):

 • सरळ वाणांसाठी 200-100-100 व संकरीत वाणांसाठी 300-150-150 किलो नत्र, स्‍फूरद, पालाश या प्रमाणात खत द्यावे.
 • अर्धे नत्र लागवडीच्‍या वेळी व उरलेले लागवडीनंतर 40 दिवसांनी द्यावे.

पाणी व्यवस्थापन (Water Management):

 • टोमॅटोच्या झाडांना फुलण्यासाठी नियमित पाणी द्यावे लागते.
 • सर्वसाधारणपणे, टोमॅटोच्या झाडांना दर आठवड्याला सुमारे 1-1.5 इंच पाणी लागते, एकतर पाऊस किंवा सिंचन. तथापि, त्यांना किती पाणी आवश्यक आहे ते तापमान, आर्द्रता आणि मातीचा प्रकार यासारख्या घटकांवर अवलंबून असेल.
 • जमिनीच्‍या मगदुराप्रमाणे पावसाळयात टोमॅटो पिकास 8 ते 10 दिवसांच्‍या अंतराने तर हिवाळी हंगामात 5 ते 7 दिवसांच्‍या अंतरानी व उन्‍हाळी हंगामात 3 ते 4 दिवसांच्‍या अंतरानी रोपांना पाणी द्यावे.

आंतरमशागत:

 • नियमित खुरपणी करून तण काढून टाकावेत.
 • खुरपणी करताना मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्‍यावी. जेणेकरून त्‍याचा उत्‍पन्‍नावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

बागेला वळण आणि आधार देणे:

 • टोमॅटो पिकाचे खोड व फांद्या कमकुवत असतात त्‍यामुळे त्‍यांना आधाराची आवश्‍यकता असते. आधार दिल्‍यामुळे झाडांची आणि फांद्यांची वाढ चांगली होते. फळे भरपूर लागतात. फळे, पाने आणि फांद्या यांचा जमिनीशी व पाण्‍याशी संपर्क येत नाही. त्‍यामुळे फळे सडण्‍याचे आणि रोगाचे प्रमाण कमी होते. खते देणे, फवारणी करणे, फळांची तोडणी करणे इ. कामे सुलभतेने करता येतात.
 • टोमॅटोच्‍या झाडांना दोन प्रकारे आधार देता येतो:
 • प्रत्‍येक झाडाजवळ दिड ते दोन मीटर लांबीची व अडीच सेमी जाडीची काठी रोवून झाडाच्‍या वाढीप्रमाणे काठीला बांधत जावे.
 • या प्रकारात तारा आणि बांबू किंवा काठयांचा वापर करून ताटी केली जाते. आणि या ताटयांच्‍या आधारे झाडे वढविली जातात. सरीच्‍या बाजूने प्रत्‍येक 10 फूट अंतरावर पहारीने दर घेऊन त्‍यात दिड ते दोन मीटर उंचीच्‍या आणि अडीच सेमी जाडीच्‍या काठया घट्ट बसवाव्‍यात सरीच्‍या दोन्‍ही टोकांना जाड लाकडी बांबू बांधाच्‍या दिशेने तिरपे रोवावेत. प्रत्येक बांबूच्या समोर जमिनित जाड खुंटी रोवून बांबू खुंटीशी तारेच्‍या साहाय्याने ओढून बांधावेत. त्‍यानंतर 16 गेज ची तार जमिनीपासून 45 सेमी वर एका टोकाकडून बांधत जाऊन प्रत्‍येक काठीला वेढा आणि ताण देऊन दुस-या टोकापर्यंत ओढून घ्‍यावे अशा प्रकारे दुसरी 90 सेमी वर व तिसरी 120 सेमी अंतरावर बांधावी. या तारेंना रोपांच्‍या वाढणाऱ्या फांद्या सुतळी किंवा नॉयलॉनच्‍या दोरीने बांधाव्‍यात. टोमॅटोचे खोड मजबूत करण्‍यासाठी झाडाला वळण देणे आवश्यक असते.

टोमॅटोमधील कीड व रोग (Tomato Insects and Disease) :

टोमॅटो पिकावर फळ पोखरणारी अळी, पांढरी माशी, मावा, कोळी, लवकर येणारा करपा, उशिरा येणारा करपा, जिवाणूजन्य मर रोग आणि चुरडामुरडा रोग या कीड व रोगांचा मोठ्याप्रमाणावर प्रादुर्भाव दिसून येतो.

अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य वाण वापरून टोमॅटोची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या टोमॅटो पिकाचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. महाराष्ट्रात टोमॅटो पिकाची लागवड करण्यासाठी योग्य वेळ कोणती?

महाराष्ट्रात टोमॅटो पिकाची लागवड करण्यासाठी हिवाळ्यात ऑक्टोबर ते डिसेंबर आणि पावसाळ्यात जून ते जुलै हा काळ उत्तम असतो.

2. महाराष्ट्रात टोमॅटो पीक घेण्यासाठी आदर्श तापमान श्रेणी कोणती?

महाराष्ट्रात टोमॅटो पिकाच्या लागवडीसाठी आदर्श तापमान श्रेणी 20 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान आहे.

3. टोमॅटो पिकासाठी आवश्यक असणारी महत्त्वाची पोषक द्रव्ये कोणती?

टोमॅटो पिकासाठी लागणारी महत्त्वाची पोषक द्रव्ये म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम.

38 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ