पोस्ट विवरण
सुने
सोयाबीन
कृषि ज्ञान
कृषी ज्ञान
DeHaat Channel
9 Feb
Follow

उन्हाळी सोयाबीन लागवड तंत्रज्ञान

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

सोयाबीन पिकाची लागवड ही मुख्यतः पावसाळ्यात केली जाते. ज्यामुळे सोयाबीन पीक काढताना शेतकऱ्यांना अचानक आलेल्या अवकाळी पावसाचा फटका बसतो. या वर उपाय म्हणून शेतकरी बांधव उन्हाळी सोयाबीन लागवड करण्यावर भर देतांना आपणास आढळून येत आहे. महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अनेक ऊस उत्पादक शेतकरी देखील सोयाबीनच्या शेतीकडे वळले आहेत. सध्या सोयाबीनला मिळत असलेला चांगला दर हे देखील या मागचे एक कारण आहे. सोयाबीनच्या वाढत्या उन्हाळी लागवडीचा विचार करूनच आजच्या या लेखात आपण याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

उन्हाळी सोयाबीन लागवडीसाठी आवश्यक जमीन आणि हवामान:

 • जमीन निवडतांना सर्व प्रथम जमीन भारी, काळीची तसेच पाणी धरून ठेवणारी असावी.
 • जमीन जेवढी भारी तेवढी त्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. ज्यामुळे उन्हाळ्यात सुद्धा जास्त प्रमाणात पाण्याच्या पाळ्या देण्याची आवश्यकता राहणार नाही.
 • जमिनीचा सामु 6 ते 6.50 या दरम्यान असावा.
 • पाण्याचा उत्तम निचरा असणाऱ्या जमिनीत सोयाबीनचे पीक चांगले येते.
 • सोयाबीन हे पीक सूर्यप्रकाशास अतिशय संवेदनशील असल्याने तापमान हे 22 ते 30 डिग्री सेल्सिअस पर्यंत असावे.
 • सोयाबीन पीकासाठी समशितोष्ण हवामान अनुकूल असते. त्यामुळे उन्हाळी हंगामामध्ये पिकाची कायिक वाढीची अवस्था थोडीफार लांबण्याची शक्यता असते.
 • तापमान वाढल्यास म्हणजेच 35 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त झाल्यास फुलाची गळ होण्याची शक्यता अधिक असते म्हणूनच 22 ते 30 डिग्री सेल्सिअस हे तापमान अनुकूल मानले जाते.

उन्हाळी सोयाबीन लागवडीसाठी सुधारित वाण:

केडीएस-726, जेएस 20-29, जेएस 20-69, जेएस-335, जेएस 93-05, जेएस 20-116, पिडी केव्हि अंबा या सुधारित वाणांची निवड उन्हाळी सोयाबीन लागवडी साठी करावी.

जमीनीची पूर्व मशागत:

 • उन्हाळी सोयाबीन लागवडी खालील क्षेत्राची सर्वप्रथम संपूर्ण नांगरणी करावी.
 • नंतर आवश्यकतेनुसार कुळवाच्या 2 ते 3 पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी व रोटरणी करून घ्यावी व जमीन एक समान समतल करून घ्यावी.
 • त्यानंतर शेणखत टाकणार असाल तर एकरी 2 ते 3 ट्रॉली शेणखत + 2 किलो कोंपोस्टिंग बॅक्टीरिया एकत्र मिसळून वापरावे.

बिजप्रक्रिया:

 • कार्बोक्झीन 37.5 % + थायरम 37.5 % (धानुका-विटावॅक्स पॉवर) ची 3 ग्रॅम प्रति किलोने बीजप्रक्रिया करावी. बीज प्रक्रियेमुळे उन्हाळी सोयाबीनचे कॉलर रॉट, चारकोल रॉट व रोपावस्थेतील इतर रोगांपासून संरक्षण होते.
 • याशिवाय बीजप्रक्रियेसाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी 8-10 ग्रॅम प्रति किलो बियाणेसाठी वापर करावा.
 • बुरशी नाशकांच्या बीजप्रक्रियेनंतर बियाण्यास रायझोबियम जिवाणू खत (ब्रेडी रायझोबियम) + स्फुरद विरघळणारे जिवाणू खत (पीएसबी)ची 250 ग्रॅम प्रति 10 कि.ग्रॅ. किंवा 100 मिली/10 कि.ग्रॅ ने बीजप्रक्रिया करावी.

पेरणीची योग्य वेळ:

 • उन्हाळी हंगामी सोयाबीनच्या बीजोत्पादनाकरिता डिसेंबरचा शेवटचा आठवडा ते जानेवारीच्या पहिल्या पंधरवाड्या पर्यंत पिकाची पेरणी करावी.
 • जर पेरणीस उशीर झाला तर पिक फुलोऱ्यात असतांना व दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना म्हणजेच मार्च व एप्रिल महिन्यात जास्त तापमानामुळे फुले शेंगा गळ होते व दाण्याचा आकार लहान होतो. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते .
 • जर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेले असेल तर पेरणी थोडी लांबवून तापमान साधारणत: 15 अंश झाल्यावर पेरणी करावी .
 • कमी तापमानात पेरणी केल्यास उगवणीसाठी 10 ते 12 दिवस लागतात.

पेरणीसाठीचे अंतर आणि पद्धत:

 • सोयाबीनची पेरणी 45 x 5 सें.मी. अंतरावर व 2.5 ते 3.0 सें.मी. खोलीवर करावी.
 • पेरणीच्या वेळेस बियाणे जास्त खोलीवर पडल्यास व्यवस्थित उगवण होत नाही.

बियाण्याचे प्रमाण:

 • उन्हाळी सोयाबीन लागवडीसाठी एकरी 26 किलो बियाणे वापरावे.

खत व्यवस्थापन:

 • उन्हाळी सोयाबीन लागवडीमध्ये एकरी 12 किलो नत्र + 24 किलो स्फुरद + 12 किलो पालाश + 8 किलो गंधक पेरणीच्या वेळेस द्यावे.
 • पेरणी करतेवेळी खते ही बियाण्याच्या खालीच पडतील व त्यांचा बियाण्याशी सरळ संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी.
 • गंधकाचा वापर सोयाबीनसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे एकरी 10 किलो झिंक सल्फेट आणि 4 किलो बोरॅक्स द्यावे.
 • या पिकास नत्र, स्फुरद, पालाश, मॅग्नेशिअम, गंधक, कॅल्शियम, मॉलिब्डेनम, बोरॉन, लोह, जस्त व मँगनीज ही अन्नद्रव्ये वाढीसाठी, फुलधारणेसाठी व शेंगात दाणे भरण्यासाठी आवश्यक असतात .
 • उन्हाळी हंगामात पाणी देण्यामध्ये खंड पडल्यास पोटॅशियम नायट्रेटच्या दोन फवारण्या अनुक्रमे 35 व्या व 55 व्या दिवशी 100 ग्रॅम पाण्यामध्ये टाकून कराव्या.
 • पेरणीनंतर नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा तसेच माती परिक्षण अहवालानुसार रासायनिक खतांची मात्रा कमी जास्त करावी.
 • पिक 20 ते 25 दिवसाचे असतांना जर सुक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिवळे पडले तर मायक्रोला (ग्रेड-2) या सुक्ष्मअन्नद्रव्यांची 50 ते 75 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यामधून फवारणी करावी.
 • पिक शेंगा लागण्याच्या अवस्थेत असतांना 19:19:19 (देहात न्यूट्री-एनपीके) या रासायनिक खताची 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी करावी तसेच शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना 0:52:34 (देहात न्यूट्री-एमकेपी) या रासायनिक खताची 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.

आंतरमशागत:

 • पिक 20 ते 35 दिवसाचे असताना दोन कोळपण्या 15 ते 20 दिवसांनी पहिली आणि 30 ते 35 दिवसांनी दुसरी करावी व एक निंदणी करुन शेत तणविरहित ठेवावे.
 • एकदा सोयाबीनला फुले लागली की कोळपणी करु नये अन्यथा सोयाबीनच्या मुळ्या तुटून नुकसान होते.

पाणी व्यवस्थापन:

 • पेरणीच्या अगोदर तुषार सिंचनाने पाणी देवून पेरणी करावी.
 • थंडीमुळे तापमान कमी असेल तर पूर्णत: उगवणीसाठी 10 ते 12 दिवस लागू शकतात.
 • चांगल्या उगवणीसाठी पेरणीनंतर 5 दिवसांनी पुन्हा तुषार सिंचनाने हलके पाणी द्यावे.
 • जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात 10 ते 12 दिवसांच्या अंतराने तसेच मार्च व एप्रिल महिन्यात 8 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
 • उन्हाळी सोयाबीन लागवडीमध्ये रोप, फुलोऱ्याची व शेंगा भरण्याची अवस्था या पाण्याचा ताणास संवेदनशील असल्यामुळे या कालावधीत पाटाने पाणी द्यावे.
 • ज्या शेतात बिजोत्पादन घ्यावयाचे आहे त्या शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.

अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य वाण वापरून उन्हाळी सोयाबीन पिकाची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या उन्हाळी सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.


35 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ