पोस्ट विवरण
सुने
पशु पालन
पशु ज्ञान
DeHaat Channel
13 June
Follow

दुभत्या जनावरांचे लसीकरण : महत्त्व आणि फायदे (Vaccination of dairy animals : Importance and benefits)

नमस्कार पशुपालकांनो,

देहात परिवारात आपले स्वागत आहे!

जनावरांना आजार झाल्यास, अपुऱ्या पशुवैद्यकीय सेवेमुळे, किंवा नक्की निदान न झाल्यामुळे जनावरे दगावतात व पशुपालकांना उत्पादन, जनावरे व औषधोपचारावरील खर्च असे एकूण मोठ्या आर्थिक संकटाला समोरे जावे लागते. त्यामुळे जनावरांना रोगांपासून दूर ठेवण्यासाठी लसीकरण करणे अतिशय आवश्यक ठरते. म्हणूनच आजच्या या भागात आपण दुभत्या जनावरांच्या लसीकरणाचे महत्त्व आणि फायदे याविषयी जाणून घेणार आहोत.

जनावरांच्या नियमित लसीकरणाचे फायदे व नुकसान (Advantages and Disadvantages of Routine Vaccination of Animals):

  • जनावरांना नियमित लसीकरण केल्यास संसर्गजन्य आजाराचे प्रमाण कमी होऊन जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकते.
  • दुग्धव्यवसायात दुधाळ जनावरांना निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
  • जनावरांना विविध प्रकारच्या जिवाणू व विषाणूपासून संसर्गजन्य रोग होतात. या रोगांमुळे दुधाळ जनावरांचे दूध उत्पादन घटते, जनावरांची कार्य करण्याची क्षमता कमी होते व त्यांच्यापासून मिळणाऱ्या उत्पादनाची प्रत खालावते. त्यामुळे व्यवसाय तोट्यात जाऊ शकतो.
  • जनावरांमध्ये विशिष्ट रोगांसाठी लस उपलब्ध आहे आणि अशाप्रकारची लस दिल्यानंतर रोगांचा प्रादुर्भाव टाळणे शक्य होते.
  • लसीकरणामुळे जनावरांची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते, मात्र लसीकरणापासून मिळणारी रोगप्रतिकार शक्ती विशिष्ट कालावधीसाठी असते, त्यामुळे पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार लसीकरण करावे.

लसीकरण करताना लक्षात ठेवायच्या महत्वाच्या गोष्टी (Important things to remember while getting vaccinated):

  • लसीकरण तज्ञ पशुवैद्यकांच्या सल्ल्यानेच करावे.
  • निरोगी जनावरांचेच लसीकरण करावे.
  • लसीकरण शक्यतो सकाळी करावे.
  • लसीकरणाच्या १५ दिवस आधी जनावरांना जंतनाशकाची मात्रा द्यावी.
  • जनावरांच्या अंगावरील गोचिड, पिसवा काढण्यासाठी योग्य औषधाचा वापर करावा.
  • जनावरांचे नियमित लसीकरण करावे.
  • रोगाची लागण झालेल्या जनावरांमध्ये लसीकरण करू नये.
  • आपल्या भागात वारंवार उद्भवणाऱ्या आजाराचे लसीकरण पशुवैद्यकाला विचारून करावे; कारण काही विशिष्ट आजार काही विशिष्ट भागातच उद्भवतात.
  • गाभण जनावरात लसीकरण करू नये.
  • लसीकरण करण्याकरिता वापरलेल्या इंजेक्शन किंवा सुई योग्य प्रकारे नष्ट कराव्यात.
  • वयापेक्षा लहान जनावरांचे लसीकरण करू नये.
  • आपल्याकडील जनावरे व त्यांना आवश्यक मात्रा या बाबींचा विचार करूनच लस खरेदी करावी.
  • लसीच्या बाटलीवर लिहिलेली मुदतीची तारीख बघावी.
  • लस देण्याची पद्धत व मात्रा उत्पादकांच्या माहितीपत्रात दिल्याप्रमाणेच वापरावी.
  • लसीकरणाबाबत व लस तयार करण्याबाबत लस निर्मात्या कंपनीच्या माहिती पत्रकात दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे.
  • बाजारातून आणलेली लस योग्य त्या तापमानात (बर्फात) ठेवावी.
  • एकदा लसीची बॉटल फोडली की त्यातील पूर्ण मात्रा लवकरात लवकर उपयोगात आणावी.
  • शिल्लक राहिलेल्या मात्रा योग्य रितीने नष्ट कराव्यात.
  • पहिल्यांदा लस दिल्यावर ठराविक कालावधीनंतरच दुसरी लस द्यावी.
  • कळपातील सर्व जनावरांचे एकाच वेळी लसीकरण करावे.
  • कळपात लसीकरण करीत असताना प्रत्येक जनावरांसाठी वेगळी सुई वापरावी किंवा किमान निर्जंतूक करून घ्यावी.
  • वरील नियमांचे पालन करून पशुवैद्यकांच्या सल्ल्याने जर लसीकरण केले तर लसीकरण प्रभावी होईल व जनावरांचे संभावित संसर्गजन्य रोगापासून संरक्षण होईल.
  • पशुपालन व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी लसीकरणाशिवाय पर्याय नाही.

गाई म्हशीतील लसीकरण (Vaccination in Cows and Buffaloes):

  • घटसर्प/गलघोटू : एप्रिल मे महिन्यात वर्षातून एक वेळेस द्यावी. (संकरित गाई व म्हशीत वर्षातून दोन वेळेस दयावी)
  • फऱ्या/एकटांग्या : एप्रिल मे महिन्यात वर्षातून एक वेळेस द्यावी.
  • फाशी/काळपुळी : मे महिन्यात वर्षातून एक वेळेस (रोगाचा प्रादुर्भाव असलेल्या भागातच)
  • लाळ्या व खुरकुत : वर्षातून दोन वेळेस मार्च व सप्टेंबर महिन्यात.
  • अॅट्रॅकस : ज्या भागात प्रादुर्भावाची १ वर्ष शक्यता वारंवार आहे अशा ठिकाणी दरवर्षी द्यावे.
  • सांसर्गिक गर्भपात: ज्या फार्ममध्ये बुरसेल्लोसिसची चाचणी करून जी जनावरे निश्चितपणे रोगग्रस्त सापडतात त्यांना कळपातून काढून टाकले जाते. अशा ठिकाणी परत लसीकरण केले नाही तरी चालते.

शेळ्या मेंढ्यांतील लसीकरण (Vaccination in Goats and Sheep):

  • काळपुळी : वर्षातून एकदा फेब्रुवारीत द्यावी (रोगग्रस्त भागात)
  • घटसर्प : वर्षातून एकदा मार्च महिन्यात द्यावी
  • आंत्रविषार : वर्षातून एकदा एप्रिलमध्ये द्यावी
  • फन्ऱ्या : वर्षातून एकदा मे महिन्यात द्यावी
  • लाळ्या खुरकुत : वर्षातून दोनदा सप्टेंबर व मार्च मध्ये द्यावी
  • देवी : वर्षातून एकदा डिसंबरमध्ये द्यावी (गाभण मेंढ्यांना ही लस देऊ नये)

दुग्ध व्यवसायात दुधाळ जनावरांना निरोगी ठेवणे आवश्यक असते. दुधाळ जनावरांना कोणत्याही प्रकारच्या रोगाची बाधा झाल्यास दूध उत्पादनात घट होते. जनावरांची कार्यक्षमता कमी होते, त्यांच्यापासून मिळणाऱ्या उत्पादनाची प्रतही खालावते. लसीकरणामुळे जनावरांची रोग प्रतिकारक्षक्ती वाढते, मात्र ही  रोगप्रतिकारशक्ती विशिष्ट कालावधीसाठी असते. त्यामुळे तज्ञ पशुवैद्याच्या सल्ल्यानेच लसीकरण करावे. जनावरांना नियमितपणे लसीकरण केल्यास संसर्गजन्य रोगाचे प्रमाण कमी होऊन जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकते.

तुम्ही तुमच्या दुभत्या जनावरांचे लसीकरण करता का? त्याचा काय फायदा दिसून आला? या विषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. दुधाळ जनावरांना कोणत्या पोषक तत्वांची आवश्यकता असते?

दुधाळ जनावरांना पाच पोषक तत्वे उर्जा, प्रथिने, खनिज पदार्थ, जीवनसत्वे आणि पाण्याची आवश्यकता असते.

2. दुधाळ जनावरांना योग्य आहार देणे का महत्वाचे असते?

चांगल्या दुग्धोत्पादनासाठी गाई-म्हशींना सकस आणि आवश्यक अन्नघटकांनीयुक्त आहार देणे गरजेचे आहे.

3. दुभत्या जनावरांचे लसीकरण का महत्वाचे आहे?

दुधाळ जनावरांना कोणत्याही प्रकारच्या रोगाची बाधा झाल्यास दूध उत्पादनात घट होते. जनावरांची कार्यक्षमता कमी होते, त्यांच्यापासून मिळणाऱ्या उत्पादनाची प्रतही खालावते या सर्वांपासून दुधाळ जनावरांचे रक्षण करण्यासाठी दुभत्या जनावरांचे लसीकरण करणे महत्वाचे आहे.

32 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ