पोस्ट विवरण
सुने
खरपतवार
मूंग
कृषि ज्ञान
तण व्यवस्थापन
DeHaat Channel
14 July
Follow

मूग पिकातील तण व्यवस्थापन (Weed management in Moong bean)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

मूग हे एक महत्त्वाचे शेंगायुक्त पीक आहे ज्याची लागवड विविध प्रदेशांमध्ये केली जाते. कमी कालावधीत आणि कमी पाण्यामध्ये येणारे हे एक प्रमुख कडधान्य पीक आहे. या पिकाला बाजारभाव चांगला भेटत असल्याने या पिकाची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. खरीप हंगामामध्ये तुरीच्या खालोखाल मूग हे महत्वाचे पिक म्हणून गणले जाते. हे 70 ते 80 दिवसात येणारे पिक असल्यामुळे थोड्याश्या पावसाचा देखील लाभ घेता येऊ शकते. दुबार तसेच मिश्र पीक पद्धतीसाठी देखील हे पीक अतिशय महत्वाचे आहे. तथापि, इतर कोणत्याही पिकांप्रमाणे, मूग पिकाला सुद्धा तणांच्या आव्हानांना तोंड द्यावे लागते जे पोषक, पाणी आणि सूर्यप्रकाशासाठी एकमेकांशी स्पर्धा करते, ज्यामुळे उत्पादन क्षमता कमी होते. पेरणीनंतर 15 ते 30 दिवसांचा कालावधी हा मूग पिकासाठी संवेदनशील असतो. या समस्येचा सामना करण्यासाठी, शेतकरी तणांचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी तणनाशकांकडे वळतात. आजच्या आपल्या या लेखात आपण मूग पिकातील तण नियंत्रणाविषयी जाणून घेणार आहोत.

तण व्यवस्थापन म्हणजे काय?

कमीत कमी पर्यावरणीय प्रदूषणासह पिकाची आर्थिक हानी कमी करण्यासाठी तणांची संख्या आणि त्यांचा विकास कमी करण्याची पद्धत म्हणजेच तण व्यवस्थापन.

तण नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय (Preventive measures):

  • शेतामध्ये पूर्ण कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरावे.
  • पीक पेरणीपूर्वी शेतात उगवलेली तणे काढून टाकावीत.
  • पेरणीसाठी तणविरहित बियाणे वापरावे.
  • शेतात तणांची कमीत कमी उगवण होईल याकडे लक्ष द्यावे. त्यामुळे कीड - रोगांच्या पुढील प्रसारास आळा बसेल.
  • खुरपणी करून तण काढणे, कोळपणी करणे, पिकाला भर देणे ही आंतरमशागतीची कामे नियमित आणि वेळेवर करणे आवश्‍यक आहे.
  • त्‍याकरिता आवश्‍यकतेनुसार खुरपणी करून तण काढून घ्‍यावे.
  • तसेच पिकास मातीची भर द्यावी.

मूग पिकात वापरायची तणनाशके:

  • पेरणीनंतर 0 - 3 दिवसांनी अरुंद पाने आणि काही रुंद पाने असलेल्या तणांच्या नियंत्रणासाठी पेंडीमेथालिन 30% ईसीची (देहात - पेंडिक्स) 1400 ते 1600 मि.ली. एकरी 200 ते 400 ली पाण्यातून फवारणी करावी.
  • फेनोक्साप्रॉप-पी-इथिल 9 ईसी 9.3% डब्ल्यु/डब्ल्यु (बायर - व्हीप सुपर) 12.5 ते 15 मिलीची किंवा प्रोपॅक्विझाकॉप 10 % ईसी (सिजेंटा - झेट्रोला) 15 मिलीची उगवणीपश्चात, पीक 15 ते 20 दिवसाचे असताना फवारणी करावी. त्यानंतर 5 - 10 दिवस डवरणी करू नये.
  • एट्राजीन 50% डब्लूपीची (एट्राफोर्स - देहात ) 400 ते 800 ग्रॅमची सर्व प्रकारच्या तणांवर एकरी 800 ते 1600 ली पाण्यातून फवारणी करावी.
  • क्विजालोफॉप-एथिल 10% ईसी (धानुका - सकुरा) 20 ग्रॅम/एकर पेरणीनंतर 15 - 20 दिवसांनी विशेषतः अरुंद पानांच्या तण नियंत्रणासाठी प्रभावी आहे.
  • वरील तणनाशके हि शेतकरी बांधवांच्या वापरानंतर आलेल्या अनुभवातून घेतली आहे. वापर करण्यापूर्वी आमच्या अधिकाऱ्यांसोबत नक्की संपर्क साधा.

तण व्यवस्थापन तंत्र:

  • खुरप्याच्या साहाय्याने वेळोवेळी तण काढणे ही पिकातील तण नियंत्रणाची सर्वात पारंपारिक आणि प्रभावी पद्धत आहे.
  • पेरणीनंतर 30 दिवसांच्या आत किंवा ठराविक अंतराने शेतातील तण काढणे आवश्यक आहे.

तणनाशकामुळे होणारे फायदे:

  • पीक उत्पादन वाढते.
  • तणनाशके, खुरपणी किंवा तण नियंत्रणाच्या इतर यांत्रिक पद्धतींपेक्षा अधिक किफायतशीर ठरतात, विशेषत: मोठ्या शेतात.
  • हाताने तण काढणे किंवा तण नियंत्रणाच्या इतर यांत्रिक पद्धतींच्या तुलनेत तणनाशकांचा वापर केल्यास वेळ वाचतो.
  • तणनाशके मशागतीची गरज कमी करतात, ज्यामुळे मातीची धूप रोखता येते आणि मातीचे आरोग्य सुधारते. जीवाश्म इंधनावर चालणाऱ्या यंत्र सामग्रीची गरज कमी करून ते हरितगृह वायूचे उत्सर्जनही करतात.
  • तणनाशके शेतातील मजुरीचा खर्च कमी करू शकतात.

तणनाशकामुळे होणारे तोटे:

  • काही तणनाशके नॉन-बायोडिग्रेडेबल असतात आणि दीर्घ काळासाठी हानिकारक असतात.
  • तणनाशके किंचित विषारी आहेत. त्यामुळे ती विविध आजारांना कारणीभूत ठरू शकतात. काही डोळ्यांच्या आणि त्वचेच्या समस्या आणि वापरकर्त्यांच्या श्वासोच्छवासावर देखील परिणाम करू शकतात आणि तण नाशकाच्या अयोग्य वापरामुळे मृत्यू देखील होऊ शकतो.
  • वाहत्या पावसाच्या पाण्यासह तणनाशके प्रवाहात वाहून जाऊ शकतात किंवा भूगर्भातील पाण्याच्या पुरवठ्यात मिसळून पाणी प्रदूषित करू शकतात.
  • तृणभक्षी तणनाशकांनी उपचार केलेल्या वनस्पती खाऊ शकतात ज्यामुळे वाढणाऱ्या अन्न साखळीत विषारी घटक जातील.

तणनाशके फवारताना घ्यावयाची काळजी (Herbicide):

  • ढगाळ व पावसाळी वातावरण तसेच धुके किंवा पाऊस असताना फवारणी करू नये.
  • वारा नसताना व जमिनीत ओलावा असताना उगवणीपूर्वी फवारणी करावी. स्वच्छ पाणी वापरावे.
  • जमिनीवर फवारावयाचे तणनाशक चांगली मशागत केलेल्या ढेकळेरहित जमिनीवर फवारावे.
  • तणनाशक ढेकळाखाली उगवणाऱ्या तणांपर्यंत पोहोचू शकत नाही. पर्यायाने पूर्णपणे नियंत्रण होत नाही.
  • उगवणीपूर्व फवारणी पेरणी दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पिकाचे बी मातीने व्यवस्थित झाकल्यानंतरच करावी.
  • पीक अंकुरण झाल्यावर फवारणी करू नये.
  • उगवणीपूर्व तणनाशके फवारताना तणांची उगवण झालेली नसावी.
  • फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेट नोझल वापरावे. म्हणजे फवारणी सर्वत्र सारख्या प्रमाणात होईल. असे नोझल कमी दाबावर फवारा उडवते. त्यामुळे शेजारच्या पिकावर फवारा जात नाही.
  • फवारणी स्वतःच्या अथवा शेजारच्या शेतात उडणार नाही याची संपूर्ण दक्षता घ्यावी.
  • तणनाशकांचा संपर्क अन्य कीटकनाशके, बुरशीनाशके, बियाणे यांच्याशी येणार नाही याची काळजी घ्यावी.
  • तणनाशके खरेदी करताना अंतिम वापराची मुदत तपासावी. मुदत संपलेली तणनाशके वापरू नयेत.
  • रासायनिक तणनाशकांचा वापर हा तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.
  • तणनाशकांचा आवश्यकतेनुसार शिफारशीत प्रमाणात वापर करावा. तणनाशकांचा वारंवार आणि अतिरेकी वापर करणे टाळावे.
  • तणनाशके वापरलेल्या जमिनीत दरवर्षी शेणखत, कंपोस्ट खत किंवा गांडूळ खताचा वापर करावा.

तुम्ही मूग पिकातील तणांचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “तण व्यवस्थापन” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. तण किती प्रकारचे असतात?

तण एकदलवर्गीय व द्विदलवर्गीय अशा दोन प्रकारचे असतात.

2. तणनाशक फवारणीनंतर किती दिवस शेतात मशागत करू नये?

ग्लायफोसेटसारखे तणनाशक फवारल्यानंतर कमीत कमी 21 दिवस शेतात कोणतीही मशागत करू नये.

3. तणनाशक फवारणीसाठी कोणते नोझल व पंप वापरावा?

जमिनीवर तणनाशक फवारणी करत असल्यास शक्यतो फ्लॅटफेन नोझलचा वापर करावा व पीक उगवणीनंतर फवारावयाच्या तणनाशकाकरिता शक्यतो फ्लडजेट नोझलचा वापर करावा. तणनाशकांच्या फवारणीसाठी शक्यतो वेगळा पाठीवरचा नॅपसॅप पंप वापरावा.

4. मूग पिकासाठी पेरणीनंतरचा किती कालावधी संवेदनशील असतो?

पेरणीनंतर 15 ते 30 दिवसांचा कालावधी हा मूग पिकासाठी संवेदनशील असतो.

5. मुगाची काढणी किती दिवसांमध्ये होते?

मूग पिकाची काढणी 70 ते 90 दिवसांमध्ये होते.

37 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ