तपशील
ऐका
कृषी
फलोत्पादन
कृषी ज्ञान
काजू
बागायती पिके
DeHaat Channel
29 July
Follow

काजू लागवडीबद्दल सर्व काही! (All About Cashew Cultivation!)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

काजू हे एक परकीय चलन मिळवून देणारे महत्त्वाचे पीक आहे. आपल्या देशात काजूबियांचे उत्पादन वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने फळबागा विकास योजनेमधून प्रयत्न सुरू केले आहेत. फळझाडांमध्ये हापूस आंब्याला 'फळांचा राजा' म्हटले जाते, त्याचप्रमाणे काजूला 'फळांची राणी' म्हटले जाते. भारतात काजूची ओळख पोर्तुगीज लोकांनी अंदाजे 400 वर्षांपूर्वी करून दिली. पूर्वीच्या काळी काजूची लागवड भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर प्रामुख्याने जमिनीची धूप होऊ नये म्हणून करण्यात आली होती. महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागाच्या घाटमाथ्यावर काजू लागवडीला फार मोठ्या प्रमाणात वाव आहे. आज आपण याच विशेष पिकाविषयी जाणून घेणार आहोत.

काजूचा उपयोग:

  • काजूच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा उपयोग होतो.
  • काजूच्या झाडाच्या लाकडाचा उपयोग होड्या, नावा, टाइपरायटर्सचे रोलर्स तयार करण्यासाठी करतात.
  • काजूच्या लाकडापासून कलाकुसरीचे लाकूड कामही करता येते.
  • काजूच्या झाडाच्या सालीमधून मिळणाऱ्या रसापासून पक्की शाई आणि रंग तयार करतात.
  • काजूच्या झाडापासून तांबड्या - पिवळ्या रंगाचा डिंक आणि टॅनिन मिळते.
  • काजूचे फळ फुगीर आणि रसाळ असते.
  • पिवळ्या आणि तांबड्या रंगाच्या निरनिराळ्या छटा फळावर आढळतात.
  • काजूच्या बोंडापासून सरबत, व्हिनेगार आणि दारू (काजू-फेणी) तयार करतात.
  • काजूची जेली, मुरंबा, लाडू, चॉकलेट वगैरे पदार्थ बनविता येतात.
  • काजूगराला सुकामेवा असे देखील म्हणतात.

काजू लागवडीसाठी योग्य माती (Suitable Soil for Cashew):

  • समुद्राच्या तळाची लाल आणि लॅटराइट माती काजू पिकासाठी चांगली मानली जाते.
  • दक्षिण भारताच्या किनारी भागात काजूचे उत्पादन अधिक होते.
  • याशिवाय काजूची लागवड अनेक प्रकारच्या मातीत चांगली काळजी घेऊन करता येऊ शकते.

काजू लागवडीसाठी अनुकूल हवामान आणि तापमान (Climate and Temperature for Cashew):

  • काजू लागवडीसाठी उष्णकटिबंधीय हवामान सर्वोत्तम मानले जाते आणि उष्ण व दमट हवामानासारख्या ठिकाणी काजूचे उत्पादन खूप चांगले होते.
  • काजू पिकाला जास्त पाऊस लागतो. त्याची झाडे चांगली वाढण्यासाठी 600-4500 मि.मी. पाऊस आवश्यक आहे.
  • नेहमीपेक्षा जास्त हिवाळा आणि उन्हाळा असल्यास काजू पिकाच्या उत्पादनावर परिणाम होतो, या व्यतिरिक्त हिवाळ्यातील दंव देखील काजू पिकाचे नुकसान करते.
  • सुरुवातीला त्याच्या झाडांना 20 अंश तापमान आवश्यक असते. यानंतर, जेव्हा झाडे फुलू लागतात तेव्हा त्यांना कोरडे हवामान आवश्यक असते.
  • जेव्हा काजूची फळे पिकण्यास सुरवात होते, तेव्हा त्यांना 30 ते 35 अंश तापमान आवश्यक असते.
  • तापमान जास्त असल्यास फळांचा दर्जा कमी होतो आणि फळ तुटण्याचा धोका वाढतो.

काजू लागवडीकरिता सुधारित वाण (Cashew Varities) :

  • वेंगुर्ला 1-8
  • गोवा-1
  • V.R.I. 1-3
  • बीपीपी 1
  • बीपीपी 2

काजू पिकाची अभिवृद्धी आणि काजू पिकाची लागवड पद्धती:

  • काजूच्या झाडाची अभिवृद्धी बियांपासून रोपे तयार करून तसेच गुटीकलम, भेटकलम, मृदुकाष्ठ कलम, व्हिनीयर कलम अथवा डोळे भरून करता येते.
  • काजूमध्ये परागीकरणामुळे बियांपासून तयार केलेल्या झाडामध्ये मातृवृक्षाचे सर्व गुणधर्म येत नाहीत. म्हणूनच काजूची कलमे लावून काजूची लागवड करणे आवश्यक आहे.
  • कलम पद्धतीमध्ये मृदुकाष्ठ कलमे करण्याची पद्धत सोपी, कमी खर्चाची आणि जास्त यशस्वी असल्यामुळे या पद्धतीचा वापर काजूच्या अभिवृद्धीसाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो.
  • काजूच्या बियांपासून लागवड करताना रोपे तयार करण्यासाठी गावठी झाडाच्या बिया वापरू नयेत.
  • पेरणीसाठी पूर्ण वाढलेले, टपोरे आणि राखाडी करड्या रंगाचे ताजे बी वापरावे.
  • काजू बी तयार झाल्यापासून त्याची उगवणक्षमता 7 ते 8 महिन्यांनी कमी होते जाते.
  • साधारणपणे एका किलोत 125 ते 150 पक्क्या बिया मावतील अशा रितीने बियांची निवड करावी.
  • पॉलिथीनच्या 25 सेंटिमीटर आकाराच्या 300 गेज जाडीच्या पिशव्या: 15 x 2:1 या प्रमाणात पोयटा माती आणि कुजलेले शेणखत यांच्या मिश्रणाने भरून घ्याव्यात.
  • पिशव्या भरण्यापूर्वी प्रत्येक पिशवीला खालील भागात 4 ते 6 छिद्रे पाडावीत. त्यामुळे पाण्याचा निचरा चांगला होऊन रोपे कुजणार नाहीत.
  • पॉलिथीन पिशव्यांमध्ये बियाणे रुजत घालण्यापूर्वी ते सुमारे 24 ते 48 तास थंड पाण्यात भिजत ठेवावे.
  • पॉलिथीनच्या पिशव्यांमध्ये बिया 2.5 ते 3 सेंटिमीटर खोल रुजत घालाव्यात.
  • रोपे 2 ते 3 महिन्यांची झाल्यानंतर शेतात कायम जागी लावावीत.

मृदुकाष्ठ पद्धतीने कलम तयार करणे:

  • मृदुकाष्ठ कलम तयार करण्यासाठी प्रथम बियांपासून खुंटरोपे तयार करावीत. यासाठी 15 x 20 सेंटिमीटर आकाराच्या पॉलिथीनच्या पिशव्यांना खालील अर्ध्या भागात पेपर पंचने 8- 10 छिद्रे पाडून या पिशव्या 3:1 या प्रमाणात चांगले कुजलेले शेणखत व पोयटा माती यांच्या मिश्रणाने भराव्यात.
  • शेणखत आणि पोयटा मातीच्या मिश्रणात लिंडेन भुकटी (10%) मिसळावी, या पिशव्यांमध्ये काजूचे ताजे बी साधारणपणे नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला 1.5 ते 2 सेंटिमीटर खोल लावावे.
  • बी लावण्यापूर्वी 1-2 दिवस पाण्यात भिजत ठेवावे.
  • बियांच्या पेरणीनंतर सुमारे 15 दिवसांनी बियांची उगवण होते.
  • रोपे 1-2 महिन्यांची झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात रोपांवर मृदुकाष्ठ कलम करावे.
  • कलमे करण्यासाठी निवडक जातीच्या भरपूर फळे देणाऱ्या, निरोगी झाडावरील, शेंड्याकडील सुमारे चार महिने वयाच्या फांद्या डोळकाडीसाठी निवडाव्यात.
  • या फांद्यांची जाडी कलमे करण्यासाठी वापरावयाच्या खुंटरोपांच्या जाडी एवढी असावी.
  • या फांद्यांवरून 15 सेंटिमीटर लांबीच्या डोळकाड्या घ्याव्यात.
  • कलमे करताना खुंटरोपाच्या शेंड्याकडून 10 सेंटिमीटर खाली आडवा काप घेऊन शेंडा छाटावा.
  • खुंटरोपावर 4 ते 5 सेंटिमीटर लांबीचे काप घेऊन पाचरीचा आकार द्यावा. नंतर ही डोळकाडी खुंटरोपाच्या उभ्या कापामध्ये घट्ट बसवावी आणि पॉलिथीन पट्टीने कलम केलेला भाग घट्ट बांधावा.
  • कलमांची अथवा रोपांची लागवड करण्यासाठी योग्य अंतरावर 60 x 60 x 60 सेंमी. आकाराचे खड्डे घ्यावेत.
  • खड्डे 1:1 या प्रमाणात चांगले कुजलेले शेणखत आणि मातीने भरावेत.
  • खड्डे भरताना मातीमध्ये लिंडेन भुकटी (10%) अधिक दीड किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि अर्धा किलो निंबोळी पेंड मिसळावी.
  • पावसाळयाच्या सुरुवातीला प्रत्येक खड्यात एक रोप अथवा कलम लावावे.
  • लागवड करताना कलमाचा जोड खड्ड्यातील मातीत जाणार नाही याची काळजी घ्यावी.
  • प्रत्येक कलमाला अथवा रोपाला काठीचा आधार द्यावा.

काजू पिकासाठी हंगाम आणि लागवडीचे अंतर:

  • काजूच्या लागवडीसाठी जमिनीची आखणी करण्यापूर्वी लागवडीची पद्धत ठरवावी.
  • लागवडीच्या (1) चौरस पद्धत, (2) चौकोनी पद्धत, (3) षटकोनी पद्धत, (4) समपातळी उतार पद्धती अशा निरनिराळ्या पद्धती आहेत.
  • प्रत्येक पद्धतीने एक एकर क्षेत्रावर बसणाऱ्या झाडांची संख्या वेगवेगळी येईल.
  • काजूच्या लागवडीसाठी सपाट जमिनीवर चौरस पद्धत वापरावी. या पद्धतीने दोन ओळींमधील आणि दोन झाडांमधील अंतर सारखेच असते. या पद्धतीत दोन्ही बाजूंनी आंतरमशागत करणे फारच सोपे जाते.
  • काजूच्या लागवडीसाठी जमिनीची निवड केल्यावर उन्हाळ्यात मशागत करावी.
  • एप्रिल-मे महिन्यात छाटणी आणि ७ ते 8 मीटर अंतरावर चौरस पद्धतीने काजूची लागवड करावी.
  • काजूच्या झाडाला लागवडीनंतर सुरुवातीच्या 2-3 वर्षांत योग्य वळण देणे हे पुढील व्यवस्थापनाच्या आणि झाडाच्या वाढीच्या दृष्टीने आवश्यक आहे.
  • काजूचे झाड 1 मीटर उंचीचे झाल्यावर त्याचा शेंडा खुडावा व त्यापासून पुढे येणाऱ्या 5 ते 6 जोमदार फांद्या योग्य अंतरावर चारही दिशांना विखुरलेल्या स्थितीत वाढतील अशा प्रकारे ठेवाव्यात.
  • झाडांची चांगली वाढ होण्यासाठी लागवडीनंतर 5 वर्षांपर्यंत वेड्यावाकड्या वाढणाऱ्या फांद्या काढून टाकाव्यात.
  • रोगट, कमजोर, वाळलेल्या फांद्या काढून टाकाव्यात.
  • काजूच्या झाडाची दरवर्षी छाटणी करण्याची आवश्यकता नसते.

काजू पिकातील खत व्यवस्थापन:

  • काजूच्या झाडाला शेतकरी शक्यतो खते देत नाहीत. मात्र काजूची झाडे खतांच्या मात्रांना चांगला प्रतिसाद देतात.
  • वरखताचा पुरवठा केल्यास झाडांची जोमदार वाढ होऊन उत्पादनही जास्त मिळते.
  • ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर कमी झाल्यावर झाडाच्या विस्ताराखाली बांगडी पद्धतीने वर्तुळाकार चर खोदून खते द्यावीत.
  • झाडाचे वय आणि विस्तार लक्षात घेऊन झाडाभोवती चर खोदावेत.
  • मोठ्या झाडांच्या बाबतीत चराची रुंदी 30 ते 45 सेंटिमीटर आणि खोली 15 ते 25 सेंटिमीटर ठेवावी. त्यामध्ये पालापाचोळा, शेणखत आणि रासायनिक खते टाकून चर मातीने बंद करावेत.

काजू पिकासाठी पाणी व्यवस्थापन:

  • काजूचे झाड कणखर असल्यामुळे या झाडाला वारंवार पाणी देण्याची आवश्यकता नसते.
  • ज्या ठिकाणी ओलिताची सोय आहे अशा ठिकाणी काजूची लहान झाडे जगविण्यासाठी उन्हाळ्यातील चार महिन्यांपर्यंत 5 ते 6 दिवसांच्या अंतराने आणि हिवाळयात 8 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

काजू पिकातील आंतरपिके :

  • काजू लागवड हलक्या ते मध्यम जमिनीत केली जात असल्यामुळे तसेच कोरडवाहू फळझाड म्हणून काजूची लागवड केली जात असल्यामुळे सर्वसाधारणपणे या पिकात आंतरपिके घेतली जात नाही. परंतु ज्या ठिकाणी ओलिताची सोय आहे, अशा ठिकाणी सुरुवातीच्या 2-3 वर्षांच्या काळात मिरची, आले, रताळी, हरभरा, बीट, रागी, उडीद ही पिके आंतरपिके म्हणून घेता येतात.
  • जमिनीची सुपीकता आणि पोत सुधारण्यासाठी ताग किंवा धेंच्याची लागवड करून हे पीक फुलावर येण्यापूर्वी जमिनीत हिरवळीचे खत म्हणून गाडून टाकावे.

काजू पिकातील आंतरपिके :

  • आंध्र प्रदेशात चवळी, मटकी, भुईमूग ही पिके काजूमध्ये आंतरपिके म्हणून घेतात.
  • काजूमध्ये ही पिके आंतरपिके म्हणून घेण्यास चांगली आहेत.
  • त्याचप्रमाणे काजूमध्ये शेवगा, कढीपत्ता ही पिके आंतरपिके म्हणून घेता येतात.

काजू पिकातील तण व्यवस्थापन :

  • तणांची मुख्य पिकाबरोबर अन्न, पाणी आणि सूर्यप्रकाश यांसाठी स्पर्धा होते आणि उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो. म्हणून बागेतील तणांचा वेळेवर बंदोबस्त करणे आवश्यक आहे.
  • हिरवळीची खते उदाहणार्थ, ताग, धेंचा दोन्ही झाडांच्या मधील पट्टयात पेरून तणांच्या वाढीस प्रतिबंध करावा.
  • वेळोवेळी निंदणी, खुरपणी करून तणांचा बंदोबस्त करावा.

काजू पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि रोग :

  • काजूच्या झाडावर प्रामुख्याने टी मॉस्किटो, खोडकिडा, लीफ मायनर आणि पाने गुंडाळणारी अळी या किडींचा उपद्रव होतो आणि फांद्यांची मर, पानावरील करपा आणि रोप मर हे रोग दिसून येतात

काजू पिकाच्या फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री :

  • लागवडीच्या सुरुवातीपासून काजूच्या झाडांची चांगली निगा राखल्यास काजूच्या झाडांना लागवडीनंतर तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षापासून फळे यावयास सुरुवात होते. परंतु 6 ते 7 व्या वर्षापासून उत्कृष्ट प्रतीच्या काजूबियांचे उत्पादन मिळण्यास सुरुवात होते आणि पुढे 40-50 वर्षे काजूचे नियमित उत्पादन मिळते.
  • काजूच्या झाडाला नोव्हेंबरपासून मोहोर येण्यास सुरुवात होते.
  • फुलोरा आल्यानंतर फळे पक होईपर्यंत 62 ते 65 दिवसांचा कालावधी लागतो.
  • काजूच्या झाडाला नवीन पालवी येते आणि या पालवीलाच पुढे मोहोर येतो.
  • सर्वसाधारणपणे फुलोरा दोन ते तीन वेळा येतो. यांपैकी जास्त फळे दुसऱ्या वेळी म्हणजे डिसेंबर-जानेवारी महिन्यांत आलेल्या मोहोराला येतात, म्हणून या काळात उत्पादनात वाढ करण्यासाठी काजूच्या मोहोराची निगा राखणे अत्यंत आवश्यक असते, अन्यथा उत्पादन कमी येते.
  • काही वेळा 90 ते 95% मोहोर गळून जातो. म्हणून मोहोराची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
  • लवकर येणाऱ्या मोहोरापासून तयार होणारी फळे 60 दिवसांत पक्क होतात तर उशिरा आलेल्या बहारापासून तयार होणारी फळे 45 दिवासांत पक्क होतात.
  • काजूचे उत्पादन हे त्या झाडावर असणाऱ्या लहान - लहान फांद्यांच्या संख्येवर अवलंबून असते. ज्या झाडांना लहान फांद्या जास्त असतात त्या झाडांचे उत्पादनही जास्त मिळते. अशा फांद्यांवर एका हंगामात 20 ते 30 किलोपर्यंत काजूबिया धरतात.
  • जमिनीच्या प्रतीनुसार झाडांचा विस्तार आणि झाडावरील लहान फांद्यांची संख्याही वाढते.
  • एका झाडापासून दर हंगामात 35 किलो काजूबिया मिळण्यासाठी साधारणपणे 4,000 बिया लागतात. ह्याकरिता लहान फांद्यांची संख्या 200 ते 250 पर्यंत असावी.
  • फेब्रुवारी महिन्यापासून काजूबिया तयार होण्यास सुरुवात होते आणि मार्च-एप्रिलमध्ये बिया काढणीस तयार होतात, काजू जसजसे तयार होतात, तशी हातानेच तोडणी करावी लागते आणि हे काम 45 ते 75 दिवसांपर्यंत चालते.
  • दोन-तीन दिवसांच्या अंतराने काजूच्या पक्क बिया काढाव्यात.
  • पूर्ण पिकलेली फळे झाडावर तशीच राहू दिल्यास वटवाघळे ती खाऊन टाकतात किंवा तोडून झाडापासून दूर अंतरावर रात्रीच्या वेळी नेऊन टाकतात.
  • पक्क काजूबिया बोंडापासून वेगळ्या करून 2-3 दिवस उन्हात चांगल्या वाळवाव्यात. त्यामुळे बियांमधील ओलाव्याचे प्रमाण 10 ते 12% होते.
  • काजूचे बी काजूफळातील बोंडाच्या वजनाच्या 25 ते 30% वजनाएवढे असते. प्रत्येक मोठ्या झाडापासून 75 ते 100 किलो काजूफळे आणि 20 ते 30 किलो काजूबिया मिळतात.
  • काजूच्या बियांवर कारखान्यामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या प्रक्रिया करून काजूगर तयार केले जाते. नंतर त्यांची वर्गवारी करून 18 किलो काजूगर मावतील अशा आकाराच्या पत्र्याच्या चौकोनी डब्यांमध्ये पॅकिंग करून विक्री करतात.

काजू पिकाच्या फळांची साठवण आणि पिकविण्याच्या पद्धती :

  • काजूची रसाळ फळे पक्क झाल्यावर तोडली जातात. नंतर खालच्या काजूबिया वाळवून भाजतात. त्यानंतर साल काढून काजूगराचे पूर्ण बी, दोन तुकडे, लहान तुकडे आणि चुरा अशा चार गटांत प्रतवारी (ग्रेडिंग) केली जाते.
  • वातानुकूलित पत्र्याच्या डब्यात काजूगर साठवतात. काजूची फळे झाडावरच पिकतात, त्यासाठी स्वतंत्र पिकविण्याच्या पद्धती नाहीत.

अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य हवामानानुसार काजूची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या काजू पिकाच्या लागवडीकरता कोणते तंत्र वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “बागायती पिके” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. काजू पिकास कोणते हवामान उपयुक्त आहे?

काजू लागवडीसाठी उष्णकटिबंधीय हवामान सर्वोत्तम मानले जाते आणि उष्ण व दमट हवामानासारख्या ठिकाणी काजूचे उत्पादन खूप चांगले होते.

2. काजूचे पीक कोणत्या जमिनीत घेता येते?

काजूच्या पिकासाठी समुद्राच्या तळाची लाल आणि लॅटराइट माती चांगली मानली जाते. तसेच काजूची लागवड अनेक प्रकारच्या मातीत चांगली काळजी घेऊन करता येऊ शकते.

3. काजू पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि रोग कोणते?

काजूच्या झाडावर प्रामुख्याने टी मॉस्किटो, खोडकिडा, लीफ मायनर आणि पाने गुंडाळणारी अळी या किडींचा उपद्रव होतो आणि फांद्यांची मर, पानावरील करपा आणि रोप मर हे रोग दिसून येतात

59 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor