तपशील
ऐका
पशुपालन
पशु ज्ञान
DeHaat Channel
29 Feb
Follow

जनावरांचा विमा महत्वाचा (Animal insurance is important)


जनावरांचा विमा महत्वाचा (Animal insurance is important)

नमस्कार पशुपालकांनो,

पशुपालन हे भारतातील ग्रामीण उपजीविकेचे महत्त्वाचे साधन आहे. नैसर्गिक आपत्ती, आजारपण, अपघात आदी कारणामुळे पशुधन (जनावरे) दगावल्यास शेतकरी किंवा पशुपालक यांचे आर्थिक नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी जनावरांचा विमा काढणे महत्वाचे असते. गाय, म्हैस, बैल, वळू, कालवड, रेडे, घोडे, शेळ्या व मेंढ्या यांचा विमा काढता येतो.

पशुधनाचा विमा का काढावा (Animal insurance)?

 • पशुपालनाचा व्यवसाय करीत असताना पशुधनाला विविध प्रकारच्या आजारांची बाधा होत असते.
 • आजाराची तीव्रता जास्त असल्यास, जनावरांचा मृत्यु संभावतो.
 • काही वेळेस अपघातामुळे जनावरे दगावतात.
 • जनावरे दगावल्याने किंवा आजाराने मृत्यु झाल्यास पशुपालकांचे प्रचंड नुकसान होते.
 • हे नुकसान टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी पशुपालकांनी आपल्या गोठ्यातील जनावरांचा विमा काढून घेतला पाहिजे.

जनावरे दगावण्याची कारणे (Reasons behind animals death) :

1) आजार, 2) साप किंवा विंचू चावणे, 3) विषबाधा, 4) वीज पडणे, 5) भूकंप, 6) पूर, 7) आग, 8) नैसर्गिक आपत्ती. काही वेळा जनावरांना कायमचे अपंगत्व येऊन आर्थिक नुकसान होते.

पशुधन विमा योजना म्हणजे काय (What is Animal Insurance Plan) ?

 • केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे.
 • या अंतर्गत सर्व दुधाळ आणि मांस उत्पादक जनावरांचा विमा उतरवला जातो.
 • विमाधारक जनावरांचा मृत्यू झाल्यास विमा कंपनीकडून पशुधन मालकांना नुकसान भरपाई दिली जाते.
 • जनावरांचा विमा काढण्यासाठी पशुपालकांना प्रीमियमची रक्कम भरावी लागते.

या योजनेसाठी अर्ज कसा करावा (How to apply for this scheme) ?

 • या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल आणि अर्जावर क्लिक करावे लागेल.
 • तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही या पोस्टच्या शेवटी दिलेल्या लिंकवर क्लिक करून पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊ शकता.
 • अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
 • पशुधन विमा प्रतिनिधी किंवा संबंधित व्यक्तीकडून जनावराच्या कानात बिल्ला टोचून घ्यावा.
 • जनावराचे आरोग्य प्रमाणपत्र पशुवैद्यकाकडून घ्यावे.
 • विम्याचा हप्ता भरावा.
 • विमा पॉलिसी घ्यावी.

पशुधन विमा योजनेसाठी पात्रता (Eligibility) :

 • अर्ज करणाऱ्या पशुपालकांसाठी भारताचे कायमस्वरूपी रहिवासी असणे अनिवार्य आहे.
 • दुभत्या व मांस उत्पादक जनावरांचा विमा काढता येईल.
 • या प्राण्यांमध्ये गाय, म्हैस, शेळी, मेंढी, उंट इ.
 • इतर कोणत्याही विमा योजनेंतर्गत जनावरांचा विमा काढला असेल, तर त्या जनावरांचा पशुधन विमा योजनेंतर्गत पुन्हा विमा काढता येणार नाही.

पशुधन विमा योजनेचा लाभ (Benefits) :

 • विमा काढल्यानंतर जनावरांचा मृत्यू झाल्यास विमा कंपनी पशुधन मालकांना विम्याची रक्कम देईल.
 • जनावरांच्या मृत्यूनंतर 15 दिवसांच्या आत पशुपालकांना नुकसान भरपाईची रक्कम देण्यात येईल.
 • या योजनेंतर्गत पशुधन मालकांना 1 वर्ष आणि 3 वर्षांसाठी विमा मिळू शकतो.
 • या योजनेअंतर्गत जनावरांच्या सध्याच्या बाजार मूल्यावर भरपाई दिली जाईल.

या प्रक्रियेनंतर आपला विमा सुरू होतो. विमा कालावधीत जर जनावरास काहीही झाले तर त्याची माहिती तात्काळ पशुधन विमा कंपनीला द्यावी. वेळोवेळी जनावरांना शासकीय दवाखान्यात औषधोपचारासाठी आणावे. लसीकरण, जंत निर्मूलन करावे. त्याच्या नोंदी ठेवाव्यात.

जनावराची ओळख पटण्यासाठी कानात लावलेला बिल्ला महत्त्वाचा असतो. कानात बिल्ला असेल तरच विम्याचा क्लेम मिळतो, अन्यथा मिळत नाही. जर बिल्ला कानातून पडला तरतात्काळ विमा कंपनीस लेखी कळवून नवीन बिल्ला मारून घ्यावा. त्याची नोंद आपल्या विमा पॉलिसीमध्ये करावी.

योजनेत विमा काढण्यासाठी पशुधन मर्यादा:

 • गाय / बैल / म्हैस / रेडा / घोडे / गाढव : जास्तीत जास्त 5 जनावरे,
 • शेळ्या / मेंढ्या : जास्तीत जास्त 50.

विविध श्रेणीतील पशुपालकांनी किती प्रीमियम भरावा (Premium)?

 • दारिद्र्यरेषेवरील पशुपालकांना 50 टक्के अनुदान दिले जाईल, म्हणजे या श्रेणीतील पशुपालकांना केवळ 50 टक्के प्रीमियम भरावा लागेल.
 • दारिद्र्यरेषेखालील, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या पशुपालकांना 70 टक्के अनुदान दिले जाईल. या श्रेणीतील पशुपालकांना केवळ 30 टक्के प्रीमियम भरावा लागेल.
 • प्रीमियमचा दर 1 वर्षासाठी 3 टक्के आणि 3 वर्षांसाठी 7.50 टक्के निश्चित करण्यात आला आहे.
 • पशुवैद्य किमान पाच प्राण्यांचा विमा काढू शकतात.

पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाची अधिकृत वेबसाइट (Official website of Department of Animal Husbandry and Dairying) :

dahd.nic.in

पशुधन विमा संरक्षण (Insurance) :

हे विमा पॉलिसी कालावधीत जनावराचे आजारपण, अपघात, आग, वीज पडणे, पूर, भूकंप, वादळ, दुष्काळ कारणाने मृत्युमुखी पडल्यास नुकसान झाल्यास भरपाई मिळते. विमा हप्त्याकरिता जनावराची किंमत

त्याच्या दुधाच्या उत्पादनावर ठरविण्यात येते.

विमा हप्त्याचे दर आणि अनुदान:

 • 1 वर्षाकरिता: 2.45 टक्के
 • 3 वर्षांकरिता: 6.40 टक्के

जनावर दगावले असल्यास करावयाची प्रक्रिया:

 • त्वरित विमा कंपनीला संपर्क करून जनावर मृत झाल्याबाबत कळवावे.
 • पशुवैद्यकाकडूनच जनावराचे शवविच्छेदन करावे.
 • कानात बिल्ला असल्याबाबत खात्री करावी. जनावराचे छायाचित्र घ्यावे.
 • पंचनामा करून अहवाल घ्यावा.
 • जनावराची योग्य विल्हेवाट केल्याचे सरपंचाचे प्रमाणपत्र घ्यावे.
 • मूळ बिल्ला विमा कंपनीला क्लेम फॉर्मसोबत द्यावा.

केंद्र सरकारच्या पशुधन विमा योजनेअंतर्गत देशी संकरीत गायी व म्हशी, पाळीव प्राणी, शेळ्या-मेंढ्या या जनावरांचा विमा काढला जातो. पशुधन विम्याच्या रकमेत शासनाचे 50 ते 70 टक्के अनुदान आहे.

तुम्ही तुमच्या जनावराचा विमा काढला का? कसा काढला? तुम्हाला काय अडचणी आल्या? याविषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. जनावरांचा विमा का काढावा?

नैसर्गिक आपत्ती, आजारपण, अपघात आदी कारणामुळे पशुधन (जनावरे) दगावल्यास शेतकरी किंवा पशुपालक यांचे आर्थिक नुकसान होते यामुळे जनावरांचा विमा काढणे आवश्यक असते.

2. केंद्र सरकारचा पशुधन विमा योजने अंतर्गत कोणत्या जनावरांचा विमा काढला जातो?

केंद्र सरकारच्या पशुधन विमा योजने अंतर्गत देशी संकरीत गायी व म्हशी, पाळीव प्राणी, शेळ्या-मेंढ्या या जनावरांचा विमा काढला जातो.

3. पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाची अधिकृत वेबसाइट कोणती?

पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाची dahd.nic.in ही अधिकृत वेबसाइट आहे.

32 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor