उन्हाळी उडीद लागवड (Black gram Cultivation in Summer)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
उडीद या पिकाला बाजारपेठेत वर्षभर मागणी असते. कमी कालावधीत जास्त नफा देणारे हे पीक आहे. उडीद पीक 60 ते 70 दिवसात परिपक्व होते. उडीद पिकाच्या पौष्टिक मूल्यामुळे त्याला बाजारात सातत्याने मागणी असते. उन्हाळी हंगामात उडीद लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळते, त्यामुळे या काळात उडीद लागवड योग्य ठरते. रब्बी हंगामात आपण वेगवेगळ्या प्रकारची पिके लावतो. या लावलेल्या पिकांची काढणी झाल्यानंतर जर सिंचनाची सोय असेल तर उन्हाळ्यात उडीद लागवड केल्यास नक्कीच फायद्याची ठरते. हे पीक फार कमी कालावधीत येणारे असून अल्प पाण्यामध्ये देखील चांगले उत्पादन घेता येऊन चांगला पैसा हातात येऊ शकतो. म्हणूनच आजच्या या भागात आपण उन्हाळी उडीद लागवडीविषयी जाणून घेणार आहोत.
उन्हाळी उडीद लागवडीसाठी योग्य जमीन (Suitable land for Black Gram cultivation in Summer):
उन्हाळी उडीद पिकासाठी मध्यम ते भारी व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन उत्तम असते.
उन्हाळी उडीद लागवडीआधी पूर्वमशागत (Pre-cultivation before planting Black Gram in Summer):
- रब्बी हंगामात लावलेल्या पिकांची काढणी झाल्यानंतर चांगल्या प्रकारे वखराच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी.
- जमीन भुसभुशीत केल्यानंतर एकरी दोन टन कुजलेले शेणखत टाकावे.
उन्हाळी उडीद पेरणीची वेळ (Summer Black Gram Sowing time):
- उन्हाळी उडीद लागवड फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी ते मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्या पर्यंत करता येते.
- पेरणी करताना दोन ओळींमध्ये 30 सेमी अंतर ठेवावे व दोन रोपांमधील अंतर दहा सेमी असावे.
- पेरणी झाल्यानंतर पिकाला व्यवस्थित पाण्याचा पुरवठा करता यावा त्यासाठी चार ते पाच मीटर रुंदीचे सरे पाडून घ्यावेत.
उन्हाळ्यात लागवड करता येण्याजोगे उडीदाचे सुधारित वाण (Varieties for Summer Black Gram):
उन्हाळ्यात लागवड करायची झाल्यास टी-9, पीडीयू-1 या जाती चांगल्या ठरतात.
पेरणीसाठी लागणारे बियाण्याचे प्रमाण (Seed required for sowing):
एकरी 6 ते 8 किलो बियाणे लागते.
लागवड करण्याआधी बीजप्रक्रिया (Seed Treatment Before Planting):
- मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये त्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरम किंवा पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा बुटी लावावी.
- त्यानंतर 25 ग्रॅम रायझोबियम जिवाणूसंवर्धक गुळाच्या थंड पाण्यामध्ये मिसळून बियाण्यावर लावावे.
- सावलीमध्ये वाळविल्यानंतर पेरणी करावी.
- रायझोबियममुळे मुळांवरील गाठींचे प्रमाण वाढून नत्राची उपलब्धता वाढते.
खत मात्रा (Fertilizer Management):
- उडीद या पिकाला 8 किलो नत्र आणि 16 किलो स्फुरद प्रति एकरी द्यावे.
- रासायनिक खते ही चांगल्या कुजलेल्या शेणखतासोबत मिसळून बियाण्याजवळ पेरणी केल्यास पिकाच्या वाढीस भरपूर प्रमाणात फायदा होतो.
उडीद पिकाची अंतर मशागत:
- पिकांची पेरणी झाल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसांमध्ये पहिली कोळपणी करून घ्यावी तसेच पहिल्या कापणीनंतर दुसऱ्या कोळपणीसाठी दहा ते पंधरा दिवसांचा गॅप द्यावा.
- कोळपणी पूर्ण केल्यानंतर खुरपणी करून पिके तणमुक्त ठेवावी.
- पीक तणविरहित ठेवल्याने उत्पादनांमध्ये चांगली वाढ होते.
उडीद पिकासाठी पाणी व्यवस्थापन (Water Management):
- पेरणी केल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी पहिली पाण्याची पाळी द्यावी.
- पिकाच्या संपूर्ण कालावधीमध्ये एकूण पाच किंवा सहा पाळ्या देणे पुरेसे होते.
- पिक जेव्हा फुलोरामध्ये येते आणि जेव्हा शेंगा तयार होण्याचा कालावधी असतो तेव्हा पाण्याचा ताण अजिबात पडू देऊ नये.
उडीद पिकावर परिणाम करणारे रोग (Disease):
- मर रोग
- पिवळा मोझॅक रोग
- भुरी
- मूळकूज
- पानावरील चट्टे (लीफ ब्लाइट)
- केवडा
उडीद पिकाची काढणी:
उडदाची कापणी करून खळ्या वर आणून त्याची मळणी करावी. कारण शेंगा तोडणे फार जिकरीचे काम असून वेळ खर्च होतो. तसेच उडीद पिकाची काढणी 60 ते 70 दिवसांमध्ये करावी.
अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार उन्हाळी हंगामात उडीद लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या उन्हाळी उडीद पिकाच्या लागवडीकरता कोणते तंत्र वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. उन्हाळी उडीद पिकाची काढणी किती दिवसांमध्ये करावी?
उडीद पिकाची काढणी 60 ते 70 दिवसांमध्ये करावी.
2. उन्हाळी उडीद पिकासाठी योग्य जमीन कोणती?
उन्हाळी उडीद पिकासाठी मध्यम ते भारी व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन उत्तम असते.
3. उन्हाळी उडीद पेरणीची योग्य वेळ कोणती?
उन्हाळी उडीद लागवड फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी ते मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत करता येते.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor