तपशील
ऐका
पशुपालन
पशु ज्ञान
DeHaat Channel
9 May
Follow

हवामान बदलाचा जनावरांच्या उत्पादकतेवरील परिणाम (Impact of Climate Change on Animal Productivity)

नमस्कार पशुपालकांनो,

पशुंच्या सभोवती बाह्य वातावरणातील तापमानात अचानक वाढ किंवा तापमान कमी झाल्यास पाळीव पशू (गाय, म्हैस, शेळी, मेंढी, कोंबड्या, वराह इत्यादी) बाह्य वातावरणातील तापमानाइतके स्वतःचे शारीरिक तापमान संतुलित करीत असतात. उच्च तापमान, कमी तापमान, आर्द्रता आणि वारा जनावरांच्या शरीराच्या सामान्य शरीर विज्ञान आणि चयापचय प्रक्रियेत बदल घडवून आणतो आणि त्याचा जनावरांच्या उत्पादकतेवर देखील घातक परिणाम होतो. चला तर मग आजच्या भागात जाणून घेऊया नेमका हवामान बदलामुळे जनावरांच्या उत्पादकतेवर काय परिणाम होतो याविषयी.

हवामान बदल (Climate Change) म्हणजे काय?

एखाद्या ठराविक ठिकाणी अनेक वर्षांपासून असलेला ऊन, वारा, पाऊस, थंडी यांची स्थिती म्हणजे हवामान. या सरासरी हवामानातला बदल म्हणजेच क्लायमेट चेंज - हवामान बदल.

जनावरांच्या तापमानाविषयी:

  • जनावरांच्या तापमानात दैनंदिन बदल होत असतात, जसे जनावरांचे शारीरिक तापमान रात्री २ ते सकाळी ६ दरम्यान सर्वात कमी असते, तर सायंकाळी ५ ते ८ च्या सुमारास ते सर्वात जास्त असते.
  • या फरकाचा संबंध शारीरिक हालचालीही आणि चयापचयाशी असतो.
  • शरीराच्या अंतर्भागापासून बाहेरच्या भागाकडे तापमान कमी कमी होत जाते.
  • पोटाचा पहिला कप्पा आणि यकृताचे तापमान जास्त असते.
  • परिसरातील तापमान, हवेतील आर्द्रता, वायुविजन अर्थात हवा खेळती राहण्याची व्यवस्था, तसेच त्वचेतील रुधिराभिसरण आणि घामाचे बाष्पीभवन, हे घटक शरीरातील तापमानात बदल घडविण्यास कारणीभूत असतात.
  • शरीरातील चयापचनाच्या प्रक्रियामुळे उष्णता किंवा ऊर्जा उत्पादन सतत चालू असते, परिसरातील अतिथंड हवेमुळे शरीराची हालचाल वाढते, अर्थात कापरे भरते. यामुळे उष्णता उत्पादन आणखी वाढते.
  • स्नायू ताठरले जाऊन ऊर्जा उत्पती होते.
  • पुष्कळशी ऊर्जा चयापचयातील रासायनिक प्रक्रियेमुळे उत्पन्न होते.
  • जनावरांमधील सर्वसाधारण शारीरिक तापमानाचा विचार केला, तर गाई म्हशी मध्ये ३७.२ ते ३८.९ अंश सेल्सिअस, उष्णता उत्पादन आणि त्यांचा ऱ्हास संतुलित राहण्यामध्ये केंद्रीय तंत्रातील हायपोथेलॅमस मधील तापमान नियंत्रक केंद्र महत्वाची भूमिका बजावते.
  • या केंद्राचा अग्रभाग उष्णता वाढण्यापासून, तर पार्श्वभाग उष्णता कमी होण्यापासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी होतो.

उन्हाळ्यात जनावरांच्या आरोग्यावर होणारा परिणाम:

  • उन्हाळ्याच्या ताणामुळे उत्पादन, पुनरुत्पादन आरोग्यावर विविध प्रकारे परिणाम होतो.
  • जास्त उष्णतेच्या ताणामुळे शरीराचे तापमान वाढते, त्यामुळे रक्तप्रवाह वाढतो परिणामी खाद्य कमी खातात आणि पाणी पिण्याचे प्रमाण वाढते. याचा उत्पादनावर परिणाम होतो.
  • उन्हाळ्यात स्तनदाहाचा प्रादुर्भाव आणि सोमेटिक पेशींची संख्या वाढते.
  • फॉलिकल्स आणि माजाच्या प्रक्रियावर सुद्धा परिणाम होतो, ज्यामुळे प्रजननक्षमतेवर नकारात्मक प्रभाव पडतो.
  • वीर्य गुणवत्ता, बीजांड व गर्भधारणेचे प्रमाण कमी झाल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम होतो.

पावसाळ्यात जनावरांच्या आरोग्यावर होणारा परिणाम:

  • जनावरांचा गोठा स्वच्छ नसल्यास पावसाळ्यात अमोनिया सारख्या रसायनाची निर्मिती होते. त्याचा परिणाम जनावरांच्या डोळ्यावर होतो, गोठ्यामधून पाण्याच्या गळतीमुळे कोक्सीडीओसीस होऊ शकतो.
  • जमिनीवर असलेल्या ओलाव्यामुळे अनेक जीवाणु निर्माण होतात त्यामुळे जनावरे आजारी पडतात.
  • गोचीडासारखे बाह्य परजीवी जनावरांच्या शरीराचा चावा घेतात, त्यामुळे बबेसियोसीस, थायलेरियोसीस सारखे आजार होतात.
  • गोठ्याच्या सभोवतालच्या वातावरणात बाह्य परजीवींची असंख्य अंडी असतात.
  • बऱ्याचदा बाह्य परजीवींमुळे होणाऱ्या आजारांमुळे जनावरांचा मृत्यू होतो.
  • अस्वच्छ व्यवस्थापन व घाणेरड्या गोठ्यामुळे कासेचे आजार मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे कासेला सूज येते, दुधात गाठी येतात, दुधातील उत्पादनावर आणि गुणवत्तेवर परिणाम होतो.
  • बुरशी लागलेले खाद्य जनावरांच्या आहारात आले तर विषबाधा होऊ शकते.

हिवाळ्यात जनावरांच्या आरोग्यावर होणारा परिणाम:

  • गोठयाचे व्यवस्थित नियोजन नसल्यामुळे हिवाळ्यात जनावरांना थंडी वाजते परिणामी शरीरातील तापमान संतुलन राखण्यासाठी अधिक ऊर्जेचे गरज असते.
  • उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी त्यांना अधिक पोषक खाद्याची गरज असते.
  • जास्त थंडीमुळे न्युमोनिया किंवा श्वसनाचे आजार जास्त प्रमाणात होतात, त्यामुळे दूध उत्पादन, आरोग्य, पुनरुत्पादनवर परिणाम होतो.
  • जनावरांना सकस आहार मिळाला नाही तर चयापचयाचे विकार होतात.
  • दुग्धज्वर, कीटॉसिस, लालमूत्र अशा आजारामुळे दूध उत्पादनावर मोठा परिणाम पडतो.
  • वातावरणातील तापमान कमी झाल्यास वासराला शरीरातील तापमान नियमनासाठी अधिक ऊर्जेची गरज असते.
  • ऊर्जेचा जास्त वापर झाल्यामुळे वासराचे वजन आणि रोगप्रतिकरक्षमता कमी होते.
  • गोठ्यातील जागा ओलसर असेल तर जनावरे, वासरे आजारी पडतात.
  • थंड हवामानात जन्मलेल्या वासरांची, करडांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असते, त्यामुळे त्यांना हायपोथर्मिया होतो. यामुळे त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो.
  • थंडीच्या काळात सकाळच्या वेळेस जनावरांचे स्नायू आखडतात, त्यामुळे जनावरे लंगडते. थंडीचा जनावरांच्या त्वचेवर परिणाम होतो.
  • कास खडबडीत होऊन तिला भेगा पडून जखमा होऊन कासदाह होतो. परिणामी दुधउत्पादन कमी होते.

बदलत्या हवामानानुसार जनावरांच्या आहार, गोठा, व्यवस्थापन यामध्ये आवश्यक बदल करणे आवश्यक असते. चला तर मग जाणून घेऊया ते कसे?

  • प्रजनन व्यवस्थापनासोबतच गाभण जनावरे व वासरांच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे.
  • प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण करून घ्यावे.
  • चाऱ्याचे नियोजन, गोठ्याचे नियोजन, प्रजनन व्यवस्थापन व वासरांची काळजी घ्यावी.
  • हिवाळा संपून उन्हाळा सुरू होताना वातावरणात बदल होत असतात.
  • उन्हाळ्यात तापमानात वाढ होते, गरम वारे वाहू लागतात, अशा बदलणाऱ्या काळात जनावरांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
  • हिवाळ्यात जनावरांच्या वजनात चांगली वाढ होते.
  • हा ऋतू प्रजननासाठी अतिशय उत्तम असल्यामुळे उन्हाळ्यात जास्तीत जास्त जनावरे गाभण असतात.
  • त्यांची योग्य काळजी घेणे आवश्यक असते.

गोठा नियोजन:

  • उन्हाळ्यात जास्त ताप‌मानापासून जनावरांचे संरक्षण होण्यासाठी गोठ्यात आवश्यक ते बदल करून घ्यावेत.
  • रात्री व पहाटेच्या वेळेस ज्या वेळेस वातावरण थंड असते, त्या वेळेस जनावरांना खाद्य द्यावे.
  • जमिनीवर भुसा किंवा गोणपाट पसरून त्यावर नवजात वासरांना ठेवावे, जेणेकरून त्यांचे अति गरम वातावरणापासून संरक्षण होईल.
  • गोठ्यातील जमीन कोरडी व थंड राहील याची काळजी घ्यावी.
  • मुक्त संचार गोठ्यात दिवसाच्या वेळेस जनावरांना निवाऱ्याची सोय एका बाजूला करावी.

प्रतिबंधात्मक उपाय:

  • तापमानात होणारी वाढ यामुळे जनावरे विविध आजारांना बळी पडू शकतात, त्यासाठी प्रतिबंधात्मक काळजी घ्यावी.
  • उन्हाळ्याच्या सुरुवातीला सहा महिने वयाच्या पुढील गाई, म्हशींना लसीकरण करून घ्यावे.
  • लसीकरणापूर्वी सर्व जनावरांना जंतनाशक पाजावे. लसीकरणामुळे जनावरांना पूर्णपणे रोगप्रतिकारक शक्ती मिळू शकेल.
  • शेळ्या, मेंढ्यांना देवी रोगाविरुद्ध लसीकरण करावे, लसीकरण केल्याच्या नोंदी ठेवाव्यात.

प्रजनन व्यवस्थापन:

  • म्हशी हिवाळ्यात रेतन होतात. या काळात गाभण असतात. त्यामुळे गाभण काळाकडे विशेष लक्ष द्यावे. पुरेसा आहार द्यावा.
  • काही जनावरे उन्हाळ्याच्या सुरुवातीलासुद्धा रेतन होतात.
  • माजावर न येणाऱ्या जनावरांची पशुवैद्यकाकडून तपासणी करून घ्यावी. आवश्यक तो उपचार करून घ्यावा.
  • क्षार खनिजे व जीवनसत्त्वाचा पुरवठा करावा. म्हणजे शरीरातील कमतरता भरून निघेल, जनावर गाभण राहण्यास मदत होईल.
  • माजाची लक्षणे ओळखण्यासाठी जनावरांचे पहाटे व संध्याकाळी निरीक्षण करावे.

वासरांचे संगोपन:

  • आहार व आरोग्याचे योग्य नियोजन केल्यावरच जनावरांची चांगली पिढी तयार होऊ शकते, म्हणून त्यांची विशेष काळजी घ्यावी.
  • नवजात वासरांना गरम वाऱ्यापासून संरक्षण करावे.
  • जन्मलेल्या नवजात वासरांना स्वच्छ करून त्यांच्या नाका-तोंडातील चिकट पदार्थ काढावा.
  • नाळ शरीरापासून दीड ते दोन इंचावर दोऱ्याने बांधून नवीन ब्लेडने कापावी. कापलेली नाळ आयोडिनयुक्त द्रावणात बुडवावी.
  • जन्मलेल्या वासरांना वजनाच्या १० टक्के चीक २४ तासांच्या आत पाजावा. त्यानंतर १० टक्के दूध पाजावे.
  • दोन महिन्यांनंतर दूध कमी करून त्याऐवजी मिल्क रिप्लेसर व इतर पूरक खाद्य द्यावे.
  • जन्मल्यावर १५ दिवसांनी पहिला जंताचा डोस द्यावा. त्यानंतर दर तीन महिन्यांनी जंताचे पुढील डोस द्यावेत.
  • शेळ्यांचे व्यवस्थापन उन्हाळा जास्त असल्यास शेळ्यांना वातावरण थंड असेल अशा वेळी चारावयास सोडावे.
  • उन्हाचा थकवा घालवण्यासाठी पशूतज्ज्ञाच्या सल्ल्याने लिव्हर टॉनिक व जीवनसत्वे द्यावीत.

आहार नियोजन:

  • गरम वातावरणात शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी अधिक ऊर्जेची गरज असते.
  • ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अधिक ऊर्जा असलेला चारा तसेच पशुखाद्य जनावरांना द्यावे.

या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. तुमच्या जनावरांच्या उत्पादकतेवर हवामान बदलामुळे काय परिणाम दिसून येतात? तुम्ही हवामान बदलात तुमच्या जनावरांचे व्यवस्थापन कसे करता? याविषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions)

हवामान बदल (Climate Change) म्हणजे काय?

एखाद्या ठराविक ठिकाणी अनेक वर्षांपासून असलेला ऊन, वारा, पाऊस, थंडी यांची स्थिती म्हणजे हवामान. या सरासरी हवामानातला बदल म्हणजेच क्लायमेट चेंज - हवामान बदल.

आधुनिक पद्धतीचा बंदिस्त गोठा म्हणजे काय?

आधुनिक पद्धतीचा बंदिस्त गोठा पूर्णतः बंदिस्त असतो यामध्ये नवीन टेक्नॉलॉजिचा वापर करतात.

जनावरांच्या गोठ्याचे प्रकार किती व कोणते?

जनावरांचे गोठे तीन प्रकारचे असतात. आधुनिक पद्धतीचा बंदिस्त गोठा, अर्धबंदिस्त गोठा आणि मुक्त संचार गोठा.

25 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor