रामफळाची शेती (Cultivation of Ramphal)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले स्वागत आहे!
सीताफळाच्या जातकुळीतलं म्हणजे काहीसं सीताफळाप्रमाणेच चव असणारं फळ म्हणजे रामफळ. रामफळ हे चवीला अतिशय गोड असून याची चव सीताफळाप्रमाणेच असते. रामफळाच्या झाडाची पानं पेरूच्या पानासारखी असतात. रामफळाचे झाड हे कमी प्रमाणात आढळत असून, रामफळ हे उन्हाळ्यात येणारं फळ आहे. या फळाचं आवरण तपकिरी किंवा केशरी रंगाचं असतं. फळ कच्च असताना तपकिरी असतं तर पिकल्यावर केशरी रंगाचं होतं.
खायला अतिशय चवदार आणि दिसायला आकर्षक असलेलं हे फळ रामनवमीच्या सुमारास पिकायला सुरुवात होते म्हणून याला रामफळ असं म्हणतात. भारताप्रमाणेच पाकिस्तान, बांगलादेश, तैवान, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि दक्षिण-पूर्व आशियात देखील रामफळ आढळते. तर महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भात रामफळाची तुरळक झाडे आणि बागा आढळतात. चला तर मग आजच्या या भागात जाणून घेऊया रामफळाच्या शेती विषयीची माहिती.
रामफळासाठी योग्य हवामान:
- उष्ण कटिबंधीय प्रदेशात या रामफळ या फळझाडाची वाढ चांगली होते.
- या पिकास उष्ण आणि दमट हवामान मानवते.
- कडाक्याची थंडी, डोंगरमाथ्यावरची हवा या फळास मानवत नाही.
रामफळासाठी योग्य जमीन:
- सुपीक, खोल आणि गाळाची जमीन या फळझाडास चांगली मानवते.
- हलक्या उथळ आणि मुरमाड जमिनीत रामफळ चांगले वाढत नाही.
रामफळ लागवडीसाठी योग्य हंगाम:
रामफळ लागवडीसाठी पावसाळयात जून-जुलै महिना योग्य मानला जातो.
रामफळ पिकाची अभिवृद्धी:
- रामफळाची लागवड रोपे लावून केली जाते.
- रामफळाच्या स्थानिक जातीवर इच्छित झाडाचे डोळे भरूनही अभिवृद्धी करता येते.
- बी संकलना पासून रोप निर्माण करण्यापर्यंत रामफळाच्या झाडाला एखाद्या लहान मुला सारखं जपणे यासाठी आव्हान आहे.
रामफळ लागवड पद्धती:
- रामफळाकरिता लागवडीचे अंतर- 8X8 मीटर वर करावी.
- रामफळ लागवडीकरिता खड्डे - साधारण 1 X 1 X 1 मीटर आकाराचे घ्यावेत.
- तळाशी पालापाचोळा घालावा.
- 3 घमेली पूर्ण कुजलेले शेणखत, अर्धा किलो निंबोळी पेंड, 1 किलो सुपर फॉस्फेट, 50 ते 60 ग्रॅम लींडेन पावडर तसेच चांगली माती या सर्वांनी खड्डा भरावा.
- खड्डा पूर्ण भरून घ्यावा व मधोमध कलम लावावे, कलम साधारणतः संध्याकाळी लावावे.
- खोडाजवळ पाणी साचु देऊ नये.
- रामफळाची लागवड मुख्यतः पावसाळ्यात रोपे लावून केली जाते.
- कलम लावताना पॉलीथीन पिशवी ब्लेडने कापावी पण मातीचा गड्डा फुटु देऊ नये.
- झाडांना लगेच पाणी द्यावे.
- काठीचा आधार द्यावा.
- साधारणतः 2.5 फुटापर्यंत एक खोड वाढु द्यावे.
- रामफळाच्या खोडावरील फुट नियमीत काढावी.
- 3 ते 4 फांद्या वेगवेगळ्या दिशेस वाढु द्याव्यात.
रामफळ पिकास वळण द्यायच्या आणि रामफळ पिक छाटणीच्या पद्धती :
- रामफळाचे झाड एकाच खोडावर डेरेदार वाढवून घ्यावे. त्यासाठी 1 मीटर उंचीपर्यंतच्या फुटी लहान वयातच वेळोवेळी काढून टाकाव्यात.
- फळधारणा होण्यासाठी अथवा फुले लागण्यासाठी रामफळाच्या झाडाची छाटणी करावी लागत नाही.
रामफळ पिक खत व्यवस्थापन :
- रामफळाच्या झाडांना नियमितपणे खते आणि पाणी देणे गरजेचे असते. रामफळास ऑगस्ट महिन्यात फुले येतात व मार्च-एप्रिल महिन्यामध्ये फळे तयार होतात.
- तेव्हा फळधारणा झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात रामफळाच्या झाडास प्रत्येकी पुढीलप्रमाणे खते द्यावीत.
- कंपोस्ट खत - 50 किलो
- सुपर फॉस्फेट - 2.5 किलो
- सल्फेट ऑफ पोटॅश - 5.0 किलो
रामफळ पिक पाणी व्यवस्थापन:
- हिवाळयात 15-20 दिवसांनी तर फळे काढणीपर्यंत 15-20 दिवासांनी पाण्याची पाळी द्यावी.
- फळे काढणीस तयार असताना अखेरीस 15 दिवसांनी तर फळे काढणीपर्यंत 10-15 दिवसांनी पाण्याची पाळी द्यावी.
रामफळ पिकातील आंतरपिके, आंतरमशागत आणि तणनियंत्रण :
- रामफळाच्या बागेत पहिली 5 वर्षे, तूर, शेवगा, यांसारखी पिके घ्यावीत.
- आंतरमशागत करताना खोडाभोवती चाळणी करून आळी करावीत.
- तणांचा बंदोबस्त, निंदणी, खुरपणी, आच्छादने आणि तणनाशकांचा वापर करून करावा.
रामफळ पिकाच्या फळांची काढणी, उत्पादन आणि हाताळणी :
- रामफळास ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये फुले येतात व फळे तयार होण्याचा काळ मार्च - एप्रिल हा असतो.
- फळांचा रंग तसेच पोत बदलतो व त्यानुरूप फळ तयार झाले असे ओळखावे.
- लागवडीनंतर 10-12 वर्षांपासून भरपूर आणि नियमित उत्पादन सुरू होते.
- चांगल्या जमिनीत वाढलेल्या व व्यवस्थित निगा राखलेल्या एका झाडापासून सुमारे 200 फळे दरवर्षी मिळतात.
- या फळांचे वजन 80 ते 100 किलो भरते.
- रामफळाचे झाड 45 - 50 वर्षे उत्पादन देते.
अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य हवामानानुसार रामफळाची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या रामफळ पिकाच्या लागवडीकरता कोणते तंत्र वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “बागायती पिके” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. रामफळ पिकास कोणते हवामान उपयुक्त आहे?
रामफळ पिकास उष्ण आणि दमट हवामान उपयुक्त आहे.
2. रामफळाचे पीक कोणत्या जमिनीत घेता येते?
रामफळाचे पिक सुपीक, खोल आणि गाळाच्या जमिनीत घेता येते.
3. रामफळ बागेत कोणती आंतरपिके घेता येतात?
रामफळाच्या बागेत पहिली 5 वर्षे, तूर, शेवगा, यांसारखी पिके घ्यावीत.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
