चिंचेची शेती (Cultivation of Tamarind)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
कोणत्याही प्रकारच्या हवामानात चांगले वाढणारे, अत्यंत हलक्या जमिनीत, माळरानामध्ये, डोंगरउतारावर कुठेही चांगले वाढणारे चिंचेचे झाड हे शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. ‘चिंच’ हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे कोरडवाहू पीक आहे. भारतातून एकूण निर्यात होणाऱ्या मसाल्याच्या पिकांमध्ये चिंचेचा सहावा क्रमांक लागतो. चिंचेला उत्तम भाव मिळत असल्यामुळे हे कोरडवाहू क्षेत्रातील नगदी पीक म्हणून संबोधले जाते.भारतातील चिंच प्रामुख्याने कॅनडा, स्वित्झर्लंड, ग्रेट ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स इत्यादी देशांमध्ये पाठविली जाते. चिंच विविध प्रकारात निर्यात केली जाते. त्यामध्ये अख्खी चिंच, फोडलेली चिंच, गाभा, बियांची भुकटी यांचा प्रामुख्याने समावेश होतो. औषधी गुणांमुळे चिंचेला अरब लोक ‘भारतीय खजूर’ असे म्हणतात. तामिळनाडू,कर्नाटक केरळ राज्यात चिंचेचा व्यापार मोठ्या प्रमाणात चालतो. महाराष्ट्रातील चिंचेला चांगला बाजार आहे. चिंच या पिकाचे एकदा लावलेले रोप अनेक वर्षे उत्पन्न देते. चला तर मग आजच्या या लेखात जाणून घेऊया बहुगुणी चिंच पिकाच्या शेती विषयीची माहिती.
चिंच पिकासाठी योग्य जमीन (Soil):
चिंच हे पीक विविध प्रकारच्या जमिनीत घेता येते. जसे की काळ्या भुसभूशीत, रेताळ वाळू मिश्रित, कोरडे आणि डोंगर उतारावर देखील हे पीक घेता येते.
चिंच पिकासाठी योग्य हवामान (Weather):
- समुद्रसपाटीपासून 600 मिटर पर्यंतच्या उंच प्रदेशात चिंचेचे पीक चांगले येते.
- जास्तीत जास्त 45 डिग्री सेल्सिअस तापमान असलेल्या प्रदेशातही चिंचेचे पीक चांगले येते.
- 750 पासून 1250 मि. मी. पाऊस पडणाऱ्या प्रदेशात देखील याची वाढ चांगली होते.
- कमी पावसाच्या प्रदेशात ही हे पीक घेता येते.
चिंच पिकाच्या सुधारित जाती:
चिंचेच्या जातींचे दोन मुख्य प्रकार आहेत.
पहिला प्रकार:
- चिंच पिवळसर किवा चॉकलेटी रंगाची अथवा लालसर पिवळ्या रंगाची असते.
- चिंचेचा उपयोग घरगुती वापरासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो.
- चिंच वाळवून बाराही महिने वापरली जातात.
दुसरा प्रकार:
- दुसऱ्या प्रकारची चिंच रक्तासारखी लाल असतात.
- ही चिंच ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये तयार होते.
- ती कच्ची खाल्ली जाते.
- ही चिंच पिकल्यानंतर वाळवून तिचा उपयोग पिवळ्या चिंचेप्रमाणे करतात.
- मात्र ही चिंच कमी आंबट असते म्हणून या चिंचेला गोड चिंच असे म्हणतात.
- यात योगेश्वरी जात चांगली आहे.
महाराष्ट्रात मराठवाडा कृषी विद्यापीठाने 'प्रतिष्ठान' नावाची चिंचेची जात निवड पद्धतीने शोधून काढली आहे. या जातीच्या चिंचेच्या फळांची लांबी 7.5 सेंटिमीटर, रुंदी 2.5 सेंटिमीटर आणि जाडी 1.8 सेंटिमीटर असून फळे सरळ आकाराची असतात. फळांच्या टरफलाचा रंग तांबूस तपकिरी आणि गर पिवळसर तांबड्या रंगाचा असतो.
तसेच चिंच लागवडीसाठी अकोला स्मृती, अजंठा गोड चिंच या जाती निवडाव्यात.
लागवड (Cultivation) :
- एक किलो वजनात 1300 ते 1800 चिंचोके येतात.
- त्यांची 700 रोपे तयार होतात.
- रोपवाटिकेसाठी मार्च ते एप्रिल महिन्यात गादी वाफे तयार करावेत.
- या गादीवाफ्यात ताजे बी पेरावे.
- बिया लावताना त्यावर कोणतीही प्रक्रिया करण्याची गरज नसते. परंतु उकळून थंड केलेल्या पाण्यात 24 तास चिंचोके ठेवल्यास ते चांगले रुजतात.
- रोप तयार होण्यासाठी साधारण एक महिन्याचा कालावधी लागतो. त्यानंतर ही रोपे पॉलिथिनच्या बॅगेत लावावी. त्यानंतर पावसाळ्यामध्ये ही रोपे आपण जमिनीत लावू शकतो.
- लागवडीसाठी 10×10 मिटर अंतरावर 1मी.× 1 मी.× 1मी. आकाराचे खड्डे खणून त्यामध्ये तळाला पालापाचोळा, एक पाटी कुजलेले शेणखत, एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट व चांगल्या मातीच्या मिश्रणाने खड्डा भरून घ्यावा.
- साधारणत: दहा - बारा वर्षात चिंचवड फुलायला व फळाला लागते.
खत व्यवस्थापन (Fertilizer Management) :
- खड्डा भरताना त्यामध्ये तळाला पालापाचोळा टाकून 15 ते 20 किलो चांगले कुजलेले शेणखत + पोयटा माती व 1.5 किलो सिंगल सुपर फास्फेट +100 ग्रॅम यांचे मिश्रण टाकावे.
- पूर्ण वाढलेल्या झाडास ( पाच वर्षानंतर ) 50 किलो शेणखत व 500 :250 :250 ग्रॅम नत्र, स्फुरद व पालाश प्रति झाड द्यावे.
पाणी व्यवस्थापन (Water Management) :
- सुरवातीची दोन वर्षे पाणी व्यवस्थापन आवश्यक आहे.
- पावसाळ्यात पावसाचा मोठा खंड पडल्यास 15 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
- हिवाळ्यात गरजेनूसार 15 दिवसांच्या अंतराने तर उन्हाळ्यात 8 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
- आळ्यामध्ये आच्छादन करावे.
- ठिबक सिंचन पद्धतीने पाणी द्यावे.
काढणी व उत्पादन:
- चिंचेच्या झाडाची वाढ अतिशय सावकाश होते.
- बियांपासून रोपे तयार करून लागवड केलेल्या झाडांना लागवडीनंतर सुमारे 10 वर्षांनी फळे येण्यास सुरुवात होते.
- कलमी झाडापासून लागवडीनंतर साधारणपणे सातव्या वर्षापासून उत्पादन मिळण्यास सुरुवात होते.
- चिंचेच्या झाडाला जून-जुलै महिन्यात फुलोरा येतो आणि मार्च-एप्रिल महिन्यात चिंचा काढणीस तयार होतात.
- चिंचा पिकण्यास सुरुवात झाल्यावर सालीचा अथवा टरफलाचा हिरवा रंग बदलून तपकिरी रंग येतो.
- पक्क फळांची साल पूर्णपणे वाळून गरापासून वेगळी होते.
- चिंचेच्या 10 वर्षे वयाच्या एका झाडापासून बिया आणि टरफले वेगळी केली की 100 ते 150 किलो चिंच मिळते.
- झाडांचा विस्तार वाढल्यानंतर चिंचेच्या उत्पादनात वाढ होते.
- चिंचेच्या पूर्ण वाढ झालेल्या वीस वर्षे वयाच्या झाडापासून 500 किलोपर्यंत चिंच मिळते.
- टरफले, शिरा आणि बिया वेगळी केलेली चिंच बाजारात विक्रीसाठी पाठवितात.
- वाळविलेल्या चिंचेच्या गराची विक्री पूर्ण वर्षभर केली जाते.
- चांगल्या जमिनीत चिंचेचे उत्पादनक्षम आयुष्य 100 वर्षे असते.
अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य हवामानानुसार चिंचेची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या चिंच पिकाची लागवड कशी करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “बागायती पिके” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
चिंच वाढण्यास किती वेळ लागतो?
चिंच लागवडीनंतर सुमारे 10 वर्षांनी चिंच येण्यास सुरुवात येते.
चिंचेचे किती प्रकार आहेत?
चिंचेचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे गोड चिंच आणि दुसरा म्हणजे आंबट चिंच.
चिंच पिकासाठी योग्य जमीन कोणती?
चिंच हे पीक विविध प्रकारच्या जमिनीत घेता येते. जसे की काळ्या भुसभूशीत, रेताळ वाळू मिश्रित, कोरडे आणि डोंगर उतारावर देखील हे पीक घेता येते.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor