केळीचे आधुनिक लागवड तंत्रज्ञान (Cultivation Technology of Banana)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
केळीच्या उत्पन्नात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात अंदाजे दोन लाख वीस हजार हेक्टर क्षेत्र केळीच्या लागवडीखाली आहे. केळी उत्पादन करणा-या प्रांतात क्षेत्राच्या दृष्टीने महाराष्ट्राचा जरी तिसरा क्रमांक लागत असला तरी व्यापारी दृष्टीने किंवा परप्रांतात विक्रीच्या दृष्टीने होणा-या उत्पादनात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. केळीच्या उत्पादनापैकी सुमारे 50 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते. सध्या महाराष्ट्रातील एकूण चौवेचाळीस हजार हेक्टर क्षेत्र केळीच्या लागवडीखाली असून त्यापैकी निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्र जळगांव जिल्हयांत आहे म्हणून महाराष्ट्रातील जळगांव जिल्हाला केळीचे आगार मानले जाते. आजच्या लेखात आपण याच केळीच्या आधुनिक लागवड तंत्रज्ञानाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.
केळी पिकासाठी योग्य हवामान व जमीन:
- केळी हे उष्ण कटीबंधीय फळ असून त्यास उष्ण व दमट हवामान चांगले मानवते.
- साधारणतः 15 ते 40 डिग्री सेंटीग्रेड पर्यंतचे तापमान या पिकास चांगले मानवते.
- केळी पिकाला भारी कसदार सेंद्रीय पदार्थयुक्त अशी गाळाची, भरपूर सुपिक, भुसभुशित किंवा मध्यम काळी एक मिटरपर्यंत खोल असलेली व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिन मानवते.
सुधारीत वाण:
- बसराई- पनामा रोगास प्रतिकारक, बंची टॉप रोगास बळी पडते.
- श्रीमंती- घड पक्व होण्यास अधिक कालावधी लागतो.
- जी9- उत्पादन क्षमता इतर केळीच्या वाणांपेक्षा अधिक असते. ही केळ पिकल्यानंतरही बरेच दिवस टिकून राहते. मध्यम ते तीव्र प्रकारचे वादळ वाऱ्यासाठी सहनशील.
- ग्रँड नैन- केळीच्या फण्यांमध्ये 15 से.मी अंतर असल्यामुळे फळांची वाढ भरपूर होते. केळीची लांबी 22 - 25 से.मी. असते. फळ प्रक्रियेस उत्तम.
- हरीसाल- या उंची 4 मिटरपर्यंत असते. साल जास्त जाडीची असून फळे बोथट असतात, तसेच ही जात टिकाऊ आहे. या जातीला सागरी हवामान मानवते.
लागवडीची वेळ व हंगाम:
- योग्य प्रमाणात पाणी उपलब्ध असल्यास केळीची लागवड वर्षभरात कधीही करता येते. तरीही कमी तापमान व अति तापमान कालावधी वगळून केळीची लागवड करावी.
- मृग बाग - जून - जुलै
- कांदे बाग - ऑक्टोबर - नोव्हेंबर
पूर्व मशागत:
- जमिनीची खोल नांगरट करून 2- 3 कुळवाच्या पाळ्या देऊन ढेकळे फोडून घ्यावीत.
- शेवटच्या कुळवणीपुर्वी 10 ते 12 ट्रॉली शेणखत जमिनीत मिसळून घ्यावे.
- जमीन तयार झाल्यानंतर 1 x 1 x 1 फुट आकाराचे खड्डे तयार करून प्रत्येक खड्डा खालील मिश्रणाने 3/4 भरून घ्यावा.
- शेणखत 10 किलो किंवा गांडूळ खत 5 किलो, निंबोळी पेंड 500 ग्रॅम, बाविस्टीन 5 ग्रॅम, फोरेट 5 ग्रॅम, कार्बोफ्युरॉन 10 ग्रॅम, जैविक खते-100 ग्रॅम
लागवड पध्दत:
- लागवड करताना 0.5 x 0.5 x 0.5 मीटर आकाराचे खडडे खोदून किंवा स-या पाडून लागवड करावी.
- दोन झाडातील अंतर बसराई जाती करित 1.25 किंवा 1.50 मीटर असावे.
- झाडांमधील अंतर 5 बाय 5 फुट असल्यास हेक्टरी 4444 झाडे लावता येतात.
- जोड ओळ पद्धतीमध्ये झाडांमधील अंतर 0.9 x 1.2 x 2.1 मी असल्यास देखील 4444 झाडे लावता येतात.
खत व्यवस्थापन:
- या झाडाची मुळे उथळ असतात. त्यांची अन्नद्रव्यांची मागणी जास्त असते.
- वाढीच्या सुरुवातीच्या काळात (पहिले वार महिने) नत्रयुक्त जोरखताचा हप्ता देणे महत्वाचे ठरते.
- प्रत्येक झाडास 200 ग्रॅम नत्र 3 समान हप्त्यात लावणीपासून दुस-या तिस-या व चौथ्या महिन्यात द्यावे.
- प्रत्येक झाडास प्रत्येक वेळी 500 ते 700 ग्रॅम एरंडीची पेंड खतासोबत द्यावी. शेणखता बरोबर 400 ग्रॅम अमोनियम सल्फेट प्रत्येक झाडास लावणी करतांना देणे उपयुक्त ठरते.
- दर हजार झाडास 100 कि नत्र 40 कि स्फूरद व 100 कि पालांश (प्रत्येक खोडास) 100 ग्रॅम नत्र 40 ग्रॅम स्फूरद, 40 ग्रॅम पालाश म्हणजेच हेक्टरी 440 की. नत्र 175 की. स्फूरद आणि 440 की पालाश द्यावे.
पाणी व्यवस्थापन:
- केळी पिकास एकूण 1800 ते 2200 मी.मी. पाणी लागते.
- केळीसाठी ठिबक सिंचन अत्यंत उपयुक्त आहे.
- केळीला पावसाळ्यात 8-10 ली, हिवाळ्यात 10-15 ली आणि उन्हाळ्यात 16-25 ली पाण्याची मात्रा आवश्यक असून हवामान, जमिनीचा प्रकार व पीकवाढीची अवस्था यानुसार योग्य तो बदल करावा.
आंतर मशागत:
- केळीची बाग सतत तणमुक्त ठेवावी. 20-25 दिवसांच्या अंतराने आडव्या उभ्या पाळ्या माराव्यात.
- 4 महिन्यांनी खोदणी करून बुंध्याभोवती माती लावावी.
- मुख्य खोडासोबत स्पर्धा टाळण्यासाठी केळीची पिल्ले कोयता किंवा विळ्याने कापत राहावीत.
- केळफुल बाहेर पडल्यानंतर विरुद्ध बाजूने एक सशक्त पिलू ठेवावे.
- दोन फुलफण्या बाहेर पडल्यानंतर केळ फुल कापावे.
- जसजसे घडाचे वजन वाढते तसतसे केळीच्या झाडांना बांबू/ पॉलीप्रोपिलीन पट्ट्यांनी बांधावे.
- केळीचे घड बाहेर पडल्यानंतर 5 मायक्रॉन गेजच्या स्कर्टिंग बॅगने झाकावेत.
लागवडीपासून 270 ते 280 दिवसांत केळीला फळधारणा चालू होते व त्यांनतर 90 ते 110 दिवसांत घड काढणीस तयार होतात. फळांचा हिरवा रंग पिवळसर होऊन फळाला गोलाई येणे हे पक्वतेचे लक्षण आहे.
तुम्ही केळी पिकाची लागवड कशी करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “बागायती पिके” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात केळीचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते?
महाराष्ट्रातील जळगांव जिल्हाला केळीचे आगार मानले जाते.
2. केळी पिकास कोणते हवामान उपयुक्त आहे?
केळी हे उष्ण कटिबंधातील फळपीक असून त्यास उष्ण व दमट हवामान चांगले मानवते.
3. केळीचे पीक कोणत्या जमिनीत घेता येते?
केळीचे पीक मध्यम ते भारी, भरपुर सेंद्रीय पदार्थ असणाऱ्या, पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमीनीत घेता येते. जमिनीचा सामू 6.5 ते 8.0 च्या दरम्यान असावा.
4. केळी पिकासाठी योग्य लागवड हंगाम कोणता?
मृग बाग (जून लागवड), कांदे बाग (ऑक्टोबर लागवड), फेब्रुवारी (खान्देश विभागासाठी) हा योग्य लागवड हंगाम आहे.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor