तपशील
ऐका
पशुपालन
पशु ज्ञान
DeHaat Channel
18 July
Follow

जनावरांमध्ये पावसाळ्यात वाढतोय या आजारांचा प्रादुर्भाव, जाणून घ्या लक्षणे व नियंत्रणाच्या पद्धती (Diseases in animals increases during monsoon - Symptoms and Control)

नमस्कार पशुपालकांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

भारतीय शेती मुख्यतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकरी पावसाळ्याची मोठ्या आतुरतेने वाट बघत असतो. पावसाळ्यात माळरानावर व चराऊ क्षेत्रावर नवीन गवत उगवते, नदी नाल्यांना भरपूर पूपाणी येत असते. जनावरे माळरानावर उगवलेल्या नवीन हिरवे गवतावर चरत असतात व नदी नाल्यातील दूषित पाणी पितात. त्याद्वारे विविध रोगाचे जंतू जनावरांच्या पोटात गेल्यामुळे जनावरे विविध आजारांना बळी पडतात. म्हणूनच पावसाळ्याच्या दिवसात जनावरांची विशेष काळजी व योग्य व्यवस्थापन याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.

पावसाळ्यात जनावरांना होणाऱ्या आजारांमध्ये प्रामुख्याने पोटाचे, कासेचे, जिवाणूंमुळे होणारे आजार तसेच शेतीकामासाठी वापरल्या जाणाऱ्या जनावरांना खुरांचे आजार होतात. आता जाणून घेऊया आजारांविषयी:

घटसर्प:

  • घटसर्प हा संसर्गजन्य आजार असून गाई, म्हैस, शेळी, मेंढी या जनावरात होतो.
  • हा रोग पाश्चुरेला मल्टीसीडा नावाच्या जीवाणूमुळे होतो.
  • हवामानात तीव्र बदल झाल्यास, जनावरांना पावसाळ्यात असंतुलित आहार दिल्यास किंवा जनावरांना लांब वाहुन एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेले तर या रोगाचा प्रादुर्भाव होतो.
  • या रोगाचा प्रसार दूषित चारा, पाण्यामार्फत होतो.
  • रोगप्रतिकारकशक्ती कमी झाली की शरीरात या रोगाच्या जीवाणूंची संख्या वाढते व ते श्वासनलिकेत व फुफ्फुसामध्ये जातात, हे जीवाणू आजारी जनावराच्या नाकातून वाहणाऱ्या स्त्रावातून रोगाचा प्रसार करतात.

लक्षणे:

  • जनावराचे शारीरिक तापमान वाढते, जनावर खात पित नाही.
  • नाकातून व तोंडातून स्त्राव वाहतो.
  • घशाला सूज येते व जनावराला श्वासोच्छवासास त्रास होतो.
  • डोळे लाल होतात.
  • जनावर थरथर कापते व दगावते.

प्रतिबंधक उपाय:

  • बाधित जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे.
  • दूषित अन्न, पाणी व बाधीत मृत जनावरांना पुरून किंवा जाळून योग्य विल्हेवाट लावावी.
  • बाधित जनावरांच्या गोठ्याचे निर्जंतूकीकरण करावे आणि पावसाळ्यापूर्वी घटसर्प प्रतिबंधक लसीकरण करावे.

फऱ्या/ एक टांग्या:

  • फऱ्या/ एक टांग्या हा संसर्गजन्य रोग असून गाई, म्हैस, शेळी, मेंढी या जनावरात आढळतो.
  • हा रोग मुख्यतः लहान वयाच्या जनावरांमध्ये आढळतो.
  • हा रोग क्लोस्ट्रिडियम चोव्हिया नावाच्या जीवाणूमुळे होतो.
  • या रोगाचा प्रसार दूषित अन्न व दूषित जखमांतून होतो.
  • जिथे पाणी साचते, दलदल असते अशा ठिकाणी चरणाऱ्या जनावरांमध्ये हा रोग आढळतो.

लक्षणे:

  • आजारी जनावराला खूप ताप येतो, जनावराच्या मागच्या पुठ्यावर व खांद्यावर सूज येते व या ठिकाणी दाबले असता करकर असा आवाज येतो.
  • जनावराचे पाय लुळे होवून चालतांना जनावर लंगडते, वेळीच उपाय न केल्यास जनावर दगावते.

प्रतिबंधक उपाय:

  • बाधीत जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे तसेच बाधीत क्षेत्रामध्ये जनावरांना चरायला सोडू नये.
  • बाधीत मृत जनावरांची योग्य विल्हेवाट लावावी.
  • पावसाळ्यापूर्वी प्रतिबंधक लसीकरण करावे.
  • स्वच्छता ठेवावी.
  • बसलेल्या जनावरांना उभे करून त्यांना चालविण्याचा प्रयत्न करावा किंवा त्यांची कुस बदलावी.

जनावरातील हगवण:

  • हगवण हा रोग गाई-म्हशींना टोगा व्हायरीडी या गटाच्या विषाणू मुळे होत असून 6 ते 24 महिने वयाची जनावरे या रोगाला मुख्यतः बळी पडत असतात.
  • या रोगाचे विषाणू बाधित जनावराच्या डोळे, नाक व तोंडातील स्त्रावाच्या संपर्कात आल्यामुळे निरोगी जनावरात हा रोग पसरतो.

लक्षणे:

  • या रोगामध्ये जनावराला 4 ते 7 दिवस खूप ताप राहतो.
  • सुरूवातीला जनावरांच्या नाकातून घट्ट स्त्राव वाहतो, नंतर कोरडा खोकला येतो, जनावराला हगवण लागते, त्यामध्ये चिकट द्रव व रक्त दिसून येते.
  • जिभेवर, टाळूवर व हिरड्यांवर क्षती दिसून येतात व त्यामुळे जनावरे लाळ गाळतात.

प्रतिबंधक उपाय:

  • गोठ्याची स्वच्छता व निर्जंतुकीकरण केल्यास या रोगाचा प्रसार थांबवता येतो.
  • बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे.

सरा:

  • पावसाळ्याच्या दिवसात हवामान दमट झाल्यामुळे डास, माशा व इतर कीटक यांची संख्या वाढते व यांच्या चावल्यामुळे या रोगाचा प्रसार निरोगी जनावरांमध्ये होतो.
  • हा रोग गाय, म्हैस, घोडा व उंट यामध्ये आढळते. ट्रीपॅनोसोमा इव्हान्साय या एक पेशीय जंतूमुळे हा रोग होतो. या जंतुचा प्रसार मुख्यतः टॅबनस जातीच्या माशा चावल्यामुळे होतो.

लक्षणे:

  • खूप ताप येतो.
  • जनावरे गोल गोल फिरतात.
  • कठिण वस्तुवर डोके घासतात.
  • भुक मंदावते, दुध उत्पादन कमी होते.
  • वजन कमी होते व वेळेवर उपचार न केल्यास जनावर मृत्यू पावते.

प्रतिबंधक उपाय:

  • हा रोग उपचार केल्यास पूर्णपणे बरा होतो.
  • या रोगाचा प्रसार करणाऱ्या कीटकांच्या वाढीवर कीटकनाशकाची फवारणी करून प्रतिबंध करावा.
  • बाधित जनावरांना वेगळे बांधावे व गोठ्यामध्ये स्वच्छता राखावी.

थायलेरिओसिस:

  • थायलेरिओसिस हा रोग संकरीत जनावरांमध्ये व वासरांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो.
  • या रोगाचा प्रसार पिसवे चावल्या मुळे होतो.
  • हा रोग थायलेरिया अनुलाटा या एक पेशीय जंतुमुळे होतो.

लक्षणे:

  • या रोगाने बाधित जनावरांना खूप ताप येतो व त्यामुळे जनावर बापायला लागते.
  • लिम्फनोड आकाराने वाढतात व त्यांच्यावर सुज येते.
  • जनावरांचे डोळे पिवळसर दिसतात व लघवी तपकिरी रंगाची होते.
  • शरिरातील रक्त कमी होऊन जनावर अशक्त होते.
  • डोळ्यातून व नाकातून पाणी वाहते, योग्य उपचार न केल्यास जनावर 7 ते 10 दिवसात मरण पावते.

प्रतिबंधक उपाय:

  • जनावरांच्या गोठ्यामध्ये व परिसरात नियमितपणे किटकनाशकाची फवारणी करावी.
  • या रोगाचे लसीकरण करून प्रतिबंध करता येतो.

खुरातील जखमा चिघळणे व त्यात किडे पडणे:

पावसाळ्यात जनावरांचे पाय सतत पाण्यात राहिल्यामुळे किंवा त्यात चिखल गेल्यामुळे खुरांमध्ये जखमा होतात.

लक्षणे:

  • सतत ओलावा राहिल्यामुळे अशा जखमा चिघळून त्यावर माशा बसतात आणि जखमेत किडे पडतात.
  • असे झाल्याने जनावरांच्या पायांना वेदना होतात, जनावर लंगडते.
  • परिणामी जनावरांचे चारा खाण्याचे प्रमाण कमी होते व दुग्धोत्पादनावर त्याचा विपरित परिणाम होतो.
  • शेळ्या-मेंढ्यामध्ये अशा जखमा झाल्यास त्यांना धनुर्वात होतो.

प्रतिबंधक उपाय:

  • जनावरांचा गोठा स्वच्छ व कोरडा ठेवावा.
  • जखम पोटॅशिअम परमॅगनेटने स्वच्छ करून मलमपट्टी करावी.

तुम्ही पावसाळ्यात तुमच्या जनावरांची काळजी कशी घेता? त्यांच्यामध्ये वरीलपैकी कोणत्या रोगाची लक्षणे दिसून आली आणि तुम्ही काय उपाययोजना केल्या या विषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1) जनावरांचे वय ओळखण्याच्या पद्धती?

1) जनावरांचे निरीक्षण केले तर लहान, तरुण आणि म्हातारी जनावरे अशा वयोगटात त्यांचे विभाजन करता येते.

2) लहान जनावरे या गटात वासरांचा, तरुण जनावरांमध्ये आकाराने लहान असलेली, अंगात चपळपणा, मऊ व घट्ट कातडी, शरीरावरील केस मऊ व दातांची पूर्ण रचना असणारी जनावरे येतील.

3) म्हातारी जनावरे म्हणजे आकाराने मोठी, शांत स्वभावाची, सैल कातडी व दातांची अपूर्ण रचना असलेली होय.

2) जनावरे पावसाळ्यात विविध आजारांना बळी का पडतात?

जनावरे माळरानावर उगवलेल्या नवीन हिरव्या गवतावर चरत असतात व नदी नाल्यातील दूषित पाणी पितात. त्याद्वारे विविध रोगाचे जंतू जनावरांच्या पोटात गेल्यामुळे जनावरे विविध आजारांना बळी पडतात.

3) थायलेरिओसिस हा रोग कोणत्या जनावरांमध्ये आढळतो?

थायलेरिओसिस हा रोग संकरीत जनावरांमध्ये व वासरांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो.

46 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor