तपशील
ऐका
पशुपालन
पशु ज्ञान
DeHaat Channel
19 Dec
Follow

थंड हवामानाचा शेळ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम (Effect of cold weather on health of goats)


नमस्कार पशुपालकांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

वाढत्या थंडीचा मानवाप्रमाणेच, जनावरांच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो. थंड हवामानाचा शेळ्यांचे आरोग्य आणि उत्पादन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो. योग्य व्यवस्थापन न केल्यास शेळ्यांचे आरोग्य बिघडू शकते. त्यातून आर्थिक तोटा होण्याची देखील शक्यता असते. थंडीच्या काळात शेळ्यांना शरीरातील उष्णता टिकवून ठेवणे कठीण होते. त्यामुळे त्यांचे शरीर जास्त ऊर्जा खर्च करते आणि शेळ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणूनच आजच्या आपल्या या लेखात आपण थंड हवामानाचा शेळ्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो व त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याविषयी जाणून घेणार आहोत.

थंड हवामानाचा शेळ्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो?

  • थंड हवामानात वजन घटणे, कमकुवतपणा आणि हायपोथर्मियासारख्या आजारांचा धोका वाढतो.
  • थंडीच्या काळात शेळ्यांना जास्त पोषणमूल्य असलेल्या आहाराची गरज असते. चाऱ्यातून पुरेशी उष्णता मिळाली नाही तर शेळ्यांच्या आरोग्यावर व उत्पादनावर परिणाम होतो.
  • थंडीमुळे शेळ्यांचे दूध उत्पादन घटते. तसेच प्रजनन क्षमतेवरही परिणाम होऊन गर्भधारणेसाठी अडचणी येऊ शकतात. यामुळे नुकसान होऊ शकते.
  • न्यूमोनिया, खोकला व इतर श्वसनासंबंधी आजार होण्याचा धोका जास्त असतो. याशिवाय ओलसर आणि थंड परिस्थितीत त्यांच्या पायांमध्ये जखमा व संसर्ग होण्याची शक्यता वाढते.

उपाययोजना:

  • थंड हवामानात करावयाचे गोठ्याचे नियोजन:
  • शेळ्यांना उबदार आणि कोरड्या निवाऱ्याची गरज असते. गोठा उष्णता टिकवून ठेवणारा, वाऱ्यापासून संरक्षण करणारा व स्वच्छ असावा.
  • शेळ्यांच्या आरामासाठी कोरड्या गवताचा वापर करावा.
  • रात्रीच्या वेळेस गोणपाट किंवा पोते यांनी शेड नीट झाकावे. जेणेकरून थंड हवा आत येण्यास प्रतिबंध होईल.
  • निवारा हा नेहमी कोरडा, स्वच्छ आणि अमोनिया मुक्त असावा; कारण हा वायू करडांच्या फुफ्फुसांना दाह निर्माण करून खोकला, श्वसन संस्थेचे विकार निर्माण करतो. यातूनच जीवघेणा न्यूमोनियाचा आजार होतो.
  • थंडी जास्त वाजत असेल तर छोटी शेकोटी, विजेचा दिवा किंवा विजेची शेगडी वापरून गोठ्यातील हवा उबदार ठेवावी. त्यामुळे शेळ्यांचे सर्दी, हगवण आणि न्यूमोनिया यांपासून संरक्षण होईल.
  • मुक्त संचार पद्धतीने संगोपन केले जात असेल, तर त्या ठिकाणी एका कोपऱ्यात एखादा बंदिस्त गोठा जरूर असावा. जेणेकरून रात्रीच्या वेळी शेळ्या तेथे जाऊन बसतील व त्यांचे थंडीपासून संरक्षण होईल.
  • शेळ्या, मेंढ्या आणि लहान करडांना सकाळच्या वेळी कोवळ्या उन्हात मोकळे सोडावे, जेणेकरून त्यांना सूर्यप्रकाशातून ऊब मिळेल.

थंड हवामानात करावयाचे आहार नियोजन:

  • शेळ्यांच्या वजनवाढीसाठी हा काळ योग्य असल्यामुळे वजनाच्या अर्धा टक्के किंवा १०० ते २५० ग्रॅम खुराक द्यावा.
  • हिवाळ्यात वाढत्या वयाच्या शेळ्यांना जास्त चांगल्या प्रतीचा चारा आवश्यक असतो.
  • चरण्याच्या जोडीला घन आहार दिल्यास उच्चतम वाढ दर मिळतो.
  • शेळ्यांना ओला व सुका चारा देणे गरजेचे आहे. आहार नेहमी जास्त ऊर्जा निर्माण करणारा ठेवावा, कारण थंडीत शरीराचे तापमान नियमित ठेवण्यासाठी जास्त ऊर्जेची गरज भासते.

थंड हवामानात शेळ्यांना होणारे आजार व उपाययोजना:

  • थंडीमध्ये आजार लवकर पसरतात कारण जिवाणू व विषाणू थंड तापमानात जास्त वेळ टिकून राहतात, त्यामुळे गोठा जंतुनाशकाने आठवड्यातून १ ते २ वेळा धुवावा.
  • बाह्य परजीवींची हिवाळ्यात अंधाऱ्या, थंड आणि ओलसर जागेत झपाट्याने वाढ होते.
  • रक्ती हगवणीमध्ये करडांची वाढ खुंटते किंवा ती अतिसाराने मरण पावतात.
  • गवतावर दंव असताना शेळ्यांना सकाळी-सकाळी आजूबाजूच्या परिसरात चरण्यासाठी सोडू नये. कारण या वेळात जंतांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते.
  • आजार झाल्यावर तो बरा करण्यापेक्षा तो होऊ न देणे अधिक चांगले. म्हणून करडांना ठरल्यावेळी रोगप्रतिबंधक लस आणि जंतुनाशक औषधे द्यावीत. शेळ्यांना लस कधीही आजार आल्यानंतर देऊ नये, कारण आजारी व विशिष्ट साथीमध्ये आजारी शेळीला लस दिल्यास तो आजार बरा न होता बळावतो.
  • हिवाळ्यात शेळ्यांवरील पिसू, गोचिड यांचे योग्य वेळेस नियंत्रण करणे आवश्यक आहे. अन्यथा, हे शेळ्यांच्या अंगावर, केसांच्या खाली राहून त्यांचे रक्त पितात. यामुळे शेळ्या अस्वस्थ होतात आणि त्यांना रक्तक्षय होण्याची शक्यता असते.
  • शेळ्यांना ऊर्जायुक्त चारा जसे की डाळीचे काड, गहू कुटार व खनिज मिश्रण द्यावे.
  • शेळ्यांना उबदार ठेवण्यासाठी त्यांच्या अंगावर गोंड्याचे कपडे घालावेत.
  • लसीकरण व नियमित आरोग्य तपासणी करून शेळ्यांचे आजारांपासून संरक्षण करावे.
  • गोठ्यात उबदार वातावरण ठेवण्यासाठी गवताचा थर आणि योग्य वायुविजनाची व्यवस्था करावी.

या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. या गोष्टींचे पालन करून तुम्ही शेळीपालनातून तुमचे उत्पन्न वाढवू शकाल. याविषयीची माहिती इतर पशुपालकांसह देखील शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. थंडीच्या काळात शेळ्यांना विविध समस्यांना सामोरे का जावे लागते?

थंडीच्या काळात शेळ्यांना शरीरातील उष्णता टिकवून ठेवणे कठीण होते. त्यामुळे त्यांचे शरीर जास्त ऊर्जा खर्च करते आणि शेळ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते.

2. शेळीपालन पद्धतीचे दोन प्रकार कोणते?

शेळीपालन पद्धतीचे बंदिस्त शेळीपालन आणि अर्धबंदिस्त शेळीपालन हे दोन प्रकार आहेत.

3. बंदिस्त शेळीपालन म्हणजे काय?

बंदिस्त शेळीपालना मध्ये शेळ्यांना गोठ्यात आणि शेड मधेच बंदिस्त ठेवून जागेवरच चारा आणि पाणी दिले जाते.

4. अर्धबंदिस्त शेळीपालन म्हणजे काय?

अर्धबंदिस्त शेळीपालना मध्ये शेळ्यांना रोज काही वेळ चरण्यासाठी मोकळे सोडले जाते आणि नंतर गोठ्यात पुन्हा आणले जाते.

66 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor