शेतकरी बंधूंनो करा सेंद्रिय शेती, सरकारकडून मिळतंय अनुदान! (Farmer brothers, do organic farming, Government providing Subsidy!)
नमस्कार शेतकरी बंधूंनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
अलिकडच्या काळात अन्न उत्पादनाची गरज पूर्ण करण्यासाठी विषारी कीटकनाशके, रासायनिक खते आणि संकरित पदार्थांचा वापर केला जात आहे. या प्राणघातक रसायनांपासून निसर्गाचे आणि स्वतःचे रक्षण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजेच सेंद्रिय शेती. रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर थांबवून जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढावा, यासाठी आता राज्य सरकार सेंद्रिय शेतीसाठी अनुदान देत आहे. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊया सरकारच्या सेंद्रिय शेती योजनेबद्दल.
सेंद्रिय शेती करण्यासाठी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यातच आता डॉ. पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती मिशन योजनेला 2022-23 ते 2027-28 या कालावधी करिता राज्य सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेची राज्यभर व्याप्ती वाढण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. तसेच या योजनेचे नाव बदलण्यात आले असून डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन असे करण्यात आहे.
नाशिक जिल्ह्यात दरवर्षी 500 हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणण्याचे उद्दिष्ट डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेच्या माध्यमातून निर्धारित करण्यात आले होते. आतापर्यंत 90 टक्के लक्ष्य पूर्ण झाले असल्याचे सांगितले आहे. यामुळे आता डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेचा राज्यभर विस्तार केला जात आहे.
कोणत्या शेतकऱ्यांची निवड केली जाते?
- या योजनेत सेंद्रिय शेतीबद्दल जागरूक असलेले शेतकरी
- आधीपासूनच सेंद्रिय शेती करत असलेले शेतकरी
- सेंद्रिय शेतीमध्ये सहभागी होणारे शेतकरी,
- सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण घेऊन योजनेत सहभागी होऊ इच्छिणारे शेतकरी,
- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या प्रवर्गातील त्या-त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रमाणात शेतकऱ्यांची निवड करण्यात येते.
- 30 टक्क्यांपर्यंत महिला शेतकऱ्यांची योजनेत निवड करण्यात येते.
या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान किती मिळणार?
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन या योजनेअंतर्गत एक कंपनी किंवा गट स्थापन करावा लागेल.
- त्यानंतर शेतकरी अनुदान मिळवण्यासाठी अर्ज करू शकता.
- शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून तीन वर्षापर्यंत सेंद्रिय शेतीसाठी 30 लाखांचे अनुदान मिळू शकते.
- दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति शेतकरी अनुदान गटाला देण्यात येते.
- तसेच सेंद्रिय शेतीसाठी केंद्र सरकारकडूनही शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान देण्यात येते.
- ज्यामध्ये जैविक कीटकनाशके, कंपोष्ट खत आणि सेंद्रिय खतांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना 31 हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत.
प्रत्येक गटाला तीन वर्षात 10 लाखांचे आर्थिक सहाय्य:
सेंद्रिय शेतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रत्येक गटाला तीन वर्षात टप्प्या-टप्प्याने दहा लाखांचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. यामध्ये सहाय्यकारी संस्थांमार्फत कार्यक्रम अंमलबजावणी, प्रादेशिक परिषदेद्वारे पी.जी.एस. प्रमाणीकरण, डीबीटीद्वारे शेतकऱ्यांना प्रोत्साहन, मूल्यवृद्धी, विपणन आणि प्रसिद्धी आदी बाबींसाठी प्रति हेक्टर प्रमाणे पहिल्या आणि तिसऱ्या वर्षी प्रत्येकी 16 हजार 500, तर दुसऱ्या वर्षी 17 हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तसेच मातीचे नमुने तपासणी, चर काढणे अथवा बांध घालणे, हिरवळीचे खत, कंपोस्ट डेपो लावणे आणि जीवामृत, अमृतपाणी, बिजामृत, दशपर्णी यासारख्या निविष्ठा खरेदीसाठीही अर्थसहाय्य दिले जाणार आहे.
गटाची स्थापना:
- डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेत एक गाव, एक गट अशी संकल्पना असणार असून गटातील सर्व शेतकऱ्यांचे मिळून 50 हेक्टर क्षेत्र असावे, अशी मर्यादा यात ठेवण्यात आली आहे.
- 10 हेक्टरचा एक गट हा कोकण विभागात आणि 25 हेक्टरचा एक गट उर्वरीत महाराष्ट्रात असावा.
- तसेच नवीन स्थापन होणाऱ्या 50 हेक्टर क्षेत्राच्या गटाची कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच आत्मा यंत्रणेकडे नोंदणी करावी लागेल.
शेतकरी गटांच्या मार्गदर्शनासाठी तज्ज्ञ प्रशिक्षकाची नियुक्ती:
सेंद्रिय शेती संदर्भात पीक संवर्धन, पीक संरक्षण, सेंद्रिय प्रमाणीकरणाविषयी प्रशिक्षण देणे व मार्गदर्शन करणे, सेंद्रिय प्रमाणीकरणासाठी आवश्यक माहिती अद्ययावत करणे, पीक पेरणी अहवाल, उपलब्ध शेतमाल व गुणवत्ता याबाबत अचूक माहिती सादर करण्यासह इतर बाबींविषयी गटातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षकाची नियुक्ती करप्यात आली आहे. हे तज्ज्ञ प्रशिक्षक शेतकरी गटाला उत्पादित शेतमालाच्या सेंद्रिय प्रमाणीकरणासाठी मार्गदर्शन व मदत करणार आहेत.
सेंद्रिय निविष्ठा निर्मिती ते सेंद्रिय प्रमाणीकरणसाठी आवश्यक बाबींचे मिळणार प्रशिक्षण:
सेंद्रिय शेतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या गटातील शेतकऱ्यांना सेंद्रिय निविष्ठा निर्मिती, सेंद्रिय खतांची निर्मिती करण्यासह मुलस्थानी जलसंधारण, पीक नियोजन, आंतरपीक लागवड, बीजप्रक्रिया, कीड व रोग व्यवस्थापन यासारख्या विविध बाबींचे प्रशिक्षण दरवर्षी दिले जाणार आहे. सेंद्रिय प्रमाणीकरण मानके, काढणी पश्चात तंत्रज्ञान, साठवणूक, मालाची प्रतवारी, विपणन व्यवस्थान आदी बाबींच्या प्रशिक्षणाचाही यामध्ये समावेश असणार आहे.
तुम्ही सेंद्रिय शेती अनुदान योजनेचा लाभ घेतला का? तुमची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवा. याशिवाय, तुम्ही देहातच्या कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवू शकता. अशाच इतर योजनांच्या माहितीसाठी देहातशी कनेक्टेड रहा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका. यासारख्या विविध योजनांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी योजना” चॅनेलला फॉलो करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. सेंद्रिय शेती योजने अंतर्गत प्रत्येक गटाला किती आर्थिक सहाय्य्य दिले जाते?
सेंद्रिय शेती योजने अंतर्गत प्रत्येक गटाला तीन वर्षात 10 लाखांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
2. सेंद्रिय शेती योजने अंतर्गत शेतीसाठी अनुदान देण्यामागच सरकारच उद्दिष्ट काय?
रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर थांबवून जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढावा, यासाठी राज्य सरकार सेंद्रिय शेतीसाठी अनुदान देत आहे.
3. सेंद्रिय शेती गटाच्या स्थापनेसाठी आवश्यक मुख्य गोष्ट काय आहे?
डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेत एक गाव, एक गट अशी संकल्पना असणार असून गटातील सर्व शेतकऱ्यांचे मिळून 50 हेक्टर क्षेत्र असावे, अशी मर्यादा ठेवण्यात आली आहे.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor