तपशील
ऐका
अंजीर
बागायती पिके
DeHaat Channel
10 Feb
Follow

अंजीर बहार व्यवस्थापन (Fig Bahar Management)


नमस्कार मंडळी,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

अंजीराची लागवड महाराष्‍ट्रात व्यापारीदृष्ट्या केली जाते. सध्‍या महाराष्‍ट्रात एकूण 417 हेक्‍टर क्षेत्र अंजीर लागवडीखाली असून त्यापैकी 312 हेक्‍टर पेक्षा अधिक क्षेत्र एकट्या पुणे जिल्‍हयात आहे. अंजीर हे कमी पाण्‍यावर येणारे काटक फळझाड आहे. सातारा व पुणे जिल्‍हयाच्‍या शिवेवरील नीरा नदीच्‍या खो-यातील खेड-शिवारापासून जेजूरीपर्यंतचा 10-12 गावांचा परिसर हाच महाराष्‍ट्रातील अंजीर उत्‍पादनाचा प्रमुख भाग आहे. औरंगाबादजवळील दौलताबाद भाग, नाशिक आणि पूर्ण खानदेश जिल्‍हयात या फळझाडाची थोडीफार लागवड होते. आज आपण याच अंजीर बागेच्या बहार व्यवस्थापनाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

आता जाणून घेऊया अंजीर बागेच्या बहाराविषयीची माहिती:

  • अंजीर बागेला वर्षातून दोनदा फळांचा बहार येतो. बहार धरल्‍यापासून 4 महिन्यात फळे काढणीसाठी तयार होतात.
  • पावसाळ्यात येणाऱ्या म्हणजेच जुलै, ऑगस्ट मध्ये येणाऱ्या बहराला खट्टा बहार म्हणतात त्याची फळे ही बेचव असतात ज्याचा उपयोग जेली बनवण्यासाठी करता येतो.
  • फळांचा मिठा बहार हा मार्च एप्रिल मध्ये येतो जो खूप गोड असतो. फळांचा दर्जा चांगला असल्यामुळे बाजारभाव देखील चांगला मिळतो.
  • चौथ्या वर्षापासून फळांचे उत्‍पादन घेण्‍यास सुरवात करावी.
  • झाडे सात ते आठ वर्षाची झाल्‍यानंतर फळांचे उत्‍पादन मोठ्या प्रमाणात येते.

अंजीराच्या दर्जेदार उत्पादनाकरिता बहाराचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असते. ते कसे ते पुढे जाणून घेऊया:

  • खट्टा बहराचे नियोजन करताना बागेस मार्च ते मे पूर्ण विश्रांती दिली जाते. ज्या भागामध्ये उन्हाळ्यात पाणी उपलब्ध नसते, त्या भागात खट्टा बहराचे नियोजन करता येते. कमी पाण्यावर देखील यशस्वीरित्या हा बहार घेता येतो.
  • अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी प्रत्येक वर्षी अंजिराची छाटणी करणे अत्यंत जरूरीचे आहे. कारण, अंजिराच्या नवीन येणाऱ्या फुटींवरच दर्जेदार विक्रीयोग्य फळधारणा होते.
  • जून महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यापर्यंत अंजीर बागेची हलकी छाटणी केली जाते.
  • प्रत्येक फांदीचा जोर पाहून शेंड्याकडून छाटणी केली जाते. त्यामुळे फांदीच्या राहिलेल्या भागावरील नव्या फुटीवर फळे येतात.
  • छाटणीनंतर हायड्रोजन सायनामाईड या संजीवकाची फवारणी केल्यास पंधरवड्यात अधिक डोळे फुटून भरपूर नवीन वाढ मिळते.
  • पुणे जिल्ह्यातील पुरंदर भागामध्ये छाटणी न करता सुप्तावस्थेत गेलेल्या झाडांची हाताने पानगळ केली जाते. त्यानंतर संजीवकाची फवारणी करून बहार धरला जातो.
  • जून-जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्यानंतर झाडाच्या वयानुसार व जमिनीच्या मगदुराप्रमाणे खताची मात्रा द्यावी. या बहाराची फळे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यापासून काढणीस तयार होतात.

अन्नद्रव्य व्यवस्थापन:

  • झाडांची चांगली जोमाने वाढ होण्यासाठी लागवडीच्या सुरवातीच्या काळात नियमित खतमात्रा द्याव्यात. सर्वसाधारणपणे खट्टा बहारासाठी जून-जुलै महिन्यात खतमात्रा द्यावी.
  • पाच वर्षाच्या झाडास शेणखत 50 किलो, नत्र 1.125 किलो (युरिया 2.441 किलो), स्फुरद 0.325 किलो (सिंगल सुपर फॉस्फेट 2.031 किलो) आणि पालाश 0.415 किलो (म्युरेट ऑफ पोटॅश 0.693 किलो) प्रति झाड प्रति वर्ष प्रमाणे द्यावे (नत्राची अर्धी मात्रा तर संपूर्ण स्फुरद आणि पालाश बहार धरताना व उर्वरित 50 टक्के नत्र बहार धरल्यानंतर एक महिन्याने).
  • अंजीर बागेस सेंद्रिय खते वापरणे अत्यंत गरजेचे असते. त्यासाठी 5 किलो निंबोळी पेंड प्रति झाड प्रति वर्ष प्रमाणे द्यावी.
  • बागेत सेंद्रिय पदार्थांचा तसेच जिवाणू संवर्धक, हिरवळीचे खत, गांडूळ खत, योग्य आच्छादन आणि पिकांच्या अवशेषांचा वापर बहर धरण्यापूर्वी महत्त्वाचा आहे.
  • या पिकास नत्र, स्फुरद, पालाश सोबतच मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, गंधक, बोरॉन, जस्त, मोलाब्द, मंगल, ताम्र, लोह इत्यादी सूक्ष्म अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात, योग्य वेळी व गरजेनुसार द्यावीत.

पाणी व्यवस्थापन:

  • जमिनीच्या मगदरानुसार भारी जमिनीत 5 ते 6 आणि हलक्या जमिनीमध्ये 3 ते 4 दिवसांनी संरक्षित पाणी द्यावे. फळवाढीच्या काळात पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी.
  • फळे पक्व होण्याच्या काळात पाणी योग्य प्रमाणात द्यावे.
  • खोडाभोवती मोठी आळी किंवा वाफे करून बागेस पाणी द्यावे. पाणी देताना बुंध्यापाशी पाणी साचून राहणार नाही, याकडे लक्ष द्यावे.
  • पाणी देण्याकरिता ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास पाण्याची 50 ते 70 टक्के बचत होते. तसेच तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.

झाडांची योग्य ती काळजी घेतल्यास अंजीराच्या एका झाडापासून 25 ते 40 किलो फळे मिळतात. तुम्ही तुमच्या अंजीर पिकातील बहार व्यवस्थापनासाठी काय करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “बागायती पिके” चॅनेलला फॉलो करा. ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. अंजीर पिकास कोणते हवामान उपयुक्त आहे?

अंजीर पिकाच्या वाढीस उष्‍ण व कोरडे हवामान चांगले मानवते.

2. अंजीर लागवडीसाठी योग्य जमीन कोणती?

अगदी हलक्‍या माळरानापासून मध्‍यम काळया व तांबडया जमिनीपर्यंत अंजीर लागवड शक्‍य आहे. भरपूर चुनखडी असलेल्‍या तांबूस काळया जमिनीत अंजीर उत्‍तम वाढते. चांगला निचरा असलेली एक मीटर पर्यंत खोल असलेली कसदार जमीन अंजीरासाठी उत्‍तम आहे.

3. अंजीर पिकावर कोणते रोग आढळून येतात?

अंजीर पिकावर प्रामुख्याने तांबेरा व भुरी रोग आढळून येतात.

36 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor