तपशील
ऐका
पशुपालन
पशु ज्ञान
DeHaat Channel
5 Dec
Follow

जनावरांमधील दुग्धज्वर - काळजी आणि उपाय

नमस्कार पशुपालक मित्रांनो,

हिवाळ्यात गायी म्हशी विण्याचे प्रमाण जास्त असते. व्यायलेल्या जनावरांना या काळात आहारातील पोषणतत्त्वांच्या कमतरतेमुळे विविध चयापचयाचे आजार होतात. यामध्ये प्रामुख्याने आढळणारा आजार म्हणजे दुग्धज्वर. हा आजार प्रामुख्याने जास्त दूध देणाऱ्या संकरित गाई आणि म्हशींमध्ये आढळून येतो. साधारणपणे व्यायल्यानंतर पहिल्या ७२ तासांपर्यंत हा आजार जास्त प्रमाणात आढळून येतो. आजच्या या लेखात आपण जनावरांमध्ये दुग्धज्वर झाल्यावर घ्यायच्या काळजी आणि उपायांविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

दुग्धज्वर होण्याची कारणे:

  • कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे प्रामुख्याने जास्त दूध उत्पादन देणाऱ्या संकरित गाई व म्हशींमध्ये आढळून येणारा हा महत्त्वाचा आजार आहे.
  • आजाराचा प्रादुर्भाव साधारणपणे व्यायल्यानंतर पहिल्या 72 तासांपर्यंत जास्त प्रमाणात आढळून येतो.
  • उच्च दूध उत्पादकता असणाऱ्या संकरित गायींमध्ये या आजाराचे प्रमाण 5 ते 7 टक्के एवढे आढळून येते. जवळपास 50 टक्के गायींमध्ये सुप्त प्रकारचा दुग्धज्वर आढळून येतो.
  • साधारणपणे 5 ते 10 वर्षे वयोगटातील तिसऱ्या ते सातव्या वितामधील गायींमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळून येतो.
  • विदेशी गायींच्या प्रजातीमध्ये या आजाराचा सर्वांत जास्त प्रादुर्भाव जर्सी गोवंशामध्ये आढळतो.
  • दुग्धज्वर हा आजार दृश्य (ज्यामध्ये आजाराची लक्षणे दिसून येतात) व सुप्त (ज्यामध्ये आजाराची लक्षणे दिसत नाहीत) प्रकारात आढळून येतो.
  • आजारी गायी-म्हशींमध्ये अवघड प्रसूती, मायांग बाहेर येणे, झार अडकणे, स्तनदाह, कितन बाधा, पोट सरकणे, प्रतिकारशक्ती कमी होणे यांसारख्या समस्या दिसतात. यामुळे आर्थिक नुकसान होते.
  • व्यायलेल्या जनावरांत चिकामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शिअम श्रवल्यामुळे रक्तातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी होते. हे प्रमाण हाडांतून रक्तामध्ये सोडण्यात येणाऱ्या कॅल्शिअमच्या प्रमाणापेक्षा जास्त असल्याने रक्तातील कॅल्शिअम कमी होते. अशा जनावरांना दुग्धज्वर हा आजार होतो.
  • सर्वसाधारणपणे 10 किलो चीक देणाऱ्या गायीच्या शरीरातून जवळपास 23 ग्रॅम कॅल्शिअम चिकामध्ये श्रवले जाते जे एकूण रक्तात असणाऱ्या कॅल्शिअमच्या 9 पट जास्त असते. म्हणून अशावेळी रक्तातील कॅल्शिअम कमी होते. जनावरे दुग्धज्वर आजारास बळी पडतात.

गायी-म्हशींमध्ये दुग्धज्वर आजाराची लक्षणे ही प्रामुख्याने तीन टप्प्यांत दिसून येतात.

पहिला टप्पा

  • ही अवस्था थोड्या वेळासाठी दिसते.
  • आजारी जनावरामध्ये हालचाल वाढलेली आढळून येते, डोके व पायांची हालचाल करणे, थरथर कापणे, तोंडातून लाळ गळणे अशी लक्षणे दिसून येतात.
  • खाणे मंदावते, जनावर एका जागी उभे राहते, दात खाते व जीभ बाहेर काढते.
  • हा टप्पा अतिशय छोटा असल्याने बऱ्याचदा पशुपालाकास माहित पडत नाही.

दुसरा टप्पा

  • आजाराच्या दुसऱ्या टप्प्यात जनावर पोटावर बसते व सुस्त होते, मान पोटाकडे वळवून बसून राहते, उठता येत नाही, नाकपुड्या कोरड्या पडतात, शरीर थंड पडते व शरीराचे तापमान कमी होते (97-101 अंश फॅरनहाइट).
  • ओटी पोटाची हालचाल कमी झाल्यामुळे पोट फुगते, गुदद्वार ढिले पडते, डोळे सुकतात व डोळ्यांची हालचाल मंदावते.
  • शेवटच्या टप्प्यातील गाभण जनावरांत प्रामुख्याने म्हशीमध्ये कॅल्शिअम कमी होऊन मायांग बाहेर येते.
  • गाभण जनावरांत विण्याच्या काळात हा आजार झाल्यास, गर्भाशयाची हालचाल मंदावल्यामुळे गाय व नवजात वासरू यांच्या सर्व बाबी योग्य असूनही नैसर्गिक प्रसूती होत नाही. अशा गायींना कॅल्शिअम सलाईन दिल्यास रक्तातील कॅल्शिअमचे योग्य प्रमाण होते व गाय नैसर्गिक प्रसूतीसाठी सक्षम बनते.

तिसरा टप्पा

  • दुसऱ्या टप्प्यात योग्य उपचार न झाल्यास जनावर या आजाराच्या तिसऱ्या टप्प्यात जाते. यामध्ये जनावर आडवे पडते व सर्व अंग सैल पडते, गुदद्वार बाहेर येते, जनावर बेसावध असते, शरीराचे तापमान अजून कमी होते, हृदयाचे ठोके क्षीण होऊन वाढलेले आढळतात.
  • तिसऱ्या टप्प्यातील आजाराच्या या अवस्थेत तत्काळ उपचार न मिळाल्यास अशी जनावरे दगावू शकतात.

उपाय:

  • विण्यापूर्वी 2-3 दिवस व व्यायल्यानंतर 3 दिवस दुधाळ जनावर निरीक्षणाखाली ठेवल्यास पशुपालकाला आजाराचे निदान तत्काळ करून वेळेतच पशुवैद्यकाकडून उपचार करून घेता येतील.
  • भाकड काळातील 2 ते 3 आठवड्यांत आहारातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी ठेवल्यास हाडांतून कॅल्शिअम रक्तात वहनाचे कार्य सुरळीत राहते. त्यामुळे व्यायल्यानंतर चिकामध्ये कॅल्शिअम स्रवले तरीसुद्धा हाडातील कॅल्शिअम रक्तात निरंतर येत राहिल्याने अशी जनावरे दुग्धज्वर आजारास बळी पडत नाहीत.
  • अमोनिअम क्लोराईड, कॅल्शिअम क्लोराईड, कॅल्शिअम सल्फेट, मॅग्नेशिअम सल्फेट इत्यादी घटक पोटातील आम्लता वाढवून हाडातील कॅल्शिअम रक्तामध्ये स्रवण्याचे कार्य निरंतर ठेवून जास्त उत्पादकता असलेल्या गायी-म्हशींना दुग्धज्वर आजारापासून वाचविण्यासाठी मदत करतात. साधारणपणे विण्यापूर्वी 15 ते 21 दिवस जर हे घटक आहारातून दिले तर हा आजार होत नाही.
  • कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी आपण जनावरांच्या आहारात दररोज 100 मिली 'देहात वेटनोकल गोल्ड' देखील समाविष्ट करू शकता.
  • या आजराची लक्षणे दिसताच पशुवैद्यकाचा सल्ला घ्या.

या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. या गोष्टींचे पालन करून तुम्ही तुमच्या जनावरांमधील दुग्ध ज्वर रोगावर वेळीच नियंत्रण मिळवू शकाल. याशिवाय, तुम्ही https://bit.ly/44aXZqb येथे दिलेल्या लिंकवर क्लिक करून, टाइम स्लॉट निवडून व्हिडिओ कॉलद्वारे पशुवैद्यकांचा मोफत सल्ला देखील मिळवू शकता.

42 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor