तपशील
ऐका
पशुपालन
पशु ज्ञान
DeHaat Channel
23 Jan
Follow

जनावरांमधील वंध्यत्व निर्मूलन योजना

नमस्कार पशुपालकांनो,

देशातील दूध उत्पादनात अग्रेसर असलेल्या इतर राज्यांच्या तुलनेत राज्यातील दूधाळ गायी- म्हशींची दूध उत्पादनक्षमता कमी आहे. तसेच, दूध उत्पादनात नसलेल्या म्हणजेच भाकड जनावरांची संख्या सुध्दा मोठया प्रमाणात आहे. दुधाळ जनावरे भाकड राहण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांच्यामध्ये असलेले वंध्यत्व. सर्वसाधारणपणे 40 ते 60 टक्के दुधाळ जनावरांमध्ये वंध्यत्व किंवा माजावर न येणे या समस्या दिसून येतात. राज्यातील दूधाचे उत्पादन वाढविण्याकरीता गायी-म्हशींची प्रजननक्षमता वाढविणे गरजेचे आहे. यासाठी प्रामुख्याने गायी-म्हशींची वाढ आणि त्यांचे शारीरिक वजन अपेक्षित मापदंडानुसार होणे आवश्यक आहे.

शारीरिक वजनवाढ आणि पशुप्रजननाचा थेट संबंध असून, अपेक्षित शारीरिक वजनवाढ असणाऱ्या पशुधनामध्ये उच्च प्रजननक्षमता दिसून येते. सर्वसाधारणपणे कालवडी 250 कि. ग्रॅ. तर पारड्या 275 कि. ग्रॅ. शारीरिक वजन गाठल्यानंतर पहिला माज दर्शवितात. सर्व पशुपालकांनी पशुधनाचे शारीरिक वजन नियंत्रित करण्यासाठी वजनवाढीची साप्ताहिक नोंद त्यांच्याकडे ठेवणे गरजेचे आहे. ज्या पशुधनामध्ये सलग तीन आठवडे शारीरिक वजन नोंदीतून शरीरीक वजन घट दिसून येते, अशा पशुधनामध्ये प्रजननाची कमतरता आणि वंध्यत्वाची बाधा असण्याची दाट शक्यता असते. प्रत्येक पशुपालकाकडे पशुधनाचे वजन मोजण्यासाठी टेपची गरज आहे. सर्व पशुवैद्यकीय दवाखाने/चिकित्सालयांमध्ये साध्या मोजपटीने जनावरांचे शारीरिक वजन नोंद करण्याचे पुढीलप्रमाणे सुत्र दर्शनिय ठिकाणी लावण्यात यावे.

शरीर वजन (कि.ग्रॅ) = छातीचा घेर इंचात X लांबी इंचात / 600

पशुपालन व्यवसायात 'वर्षाला एक वासरू' या संकल्पनेवर पशुपालकांनी आपल्या गोठ्यातील जनावरांचे व्यवस्थापन केले पाहिजे. जनावरांमध्ये वंध्यत्व ही एक खुप मोठी समस्या आजकाल दिसून येत आहे. हा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या परवडणारा ठेवण्यासाठी आपल्या गोठ्यातील जनावरे सुदृढ आणि प्रजननक्षम असणे गरजेचे आहे. विविध कारणांमुळे जनावरांमध्ये वांझपणा किंवा वंधत्व आढळून येते. जनावरांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम झाल्यास दूध उत्पदनावर विपरीत परिणाम होतो. योग्य जनावरांची निवड, गोठ्याचे व्यवस्थापन, संतुलित आहार, पिण्यासाठी शुद्ध व निर्जंतुक पाणी, लसीकरण, जंतनाशकाचे नियोजन, इ. सर्वसमावेशक बाबींचा विचार प्रजनन व्यवस्थापनात करणे आवश्यक असते.

जनावरांमधील वंध्यत्वाचे प्रकार:

  1. कायमचे वंध्यत्व:

कायमचे वंध्यत्व हे आनुवांशिक, गर्भाशयातील विकृती, जन्मजात गर्भाशयातील रचनात्मक दोष, सदोष बीजांडे, सदोष गर्भाशयमुख यामुळे असते. अशी जनावरे प्रजननासाठी कायमची सक्षम नसतात. त्यावर कोणत्याही प्रकारचा उपचार उपलब्ध नाही.

  1. तात्पुरते वंध्यत्व:

तात्पुरते वंध्यत्व हे कुपोषण, गर्भाशय संसर्ग, अनियमित लैंगिक चक्र, मादीमधील बीजांड दोष, बीजकोषाचा आकार, संप्रेरकांमधील असंतुलन, व्यवस्थापनातील चुका, पशुखाद्याचे तसेच माजाचे अयोग्य व्यवस्थापन आणि नैसर्गिक किंवा कृत्रिम रेतनाचे अयोग्य व्यवस्थापन इ. कारणे असू शकतात.

जनावरांमधील वंध्यत्वाची कारणे:

  • अनुवांशिक कारणांमुळे येणारे वंधत्व हे कायमस्वरूपी या प्रकारातील वंधत्व आहे, ही जनावरे गाभण राहत नाही.
  • नर वासरासोबत जुळी जन्माला आलेल्या कालवडीमध्ये ९९ टक्क्यापर्यंत वंध्यत्व निर्माण होण्याची शक्यता असते.

वंध्यत्वावरील उपाययोजना:

  • समतोल आहार
  • योग्य वजनवाढ
  • पशुवैद्यकांकडून तपासणी
  • बैलाचा प्रजनन इतिहास
  • प्रसुतीपूर्व आणि प्रसुतीनंतरचा महिना
  • वाहतूक टाळावी

तुम्ही तुमच्या जनावरांच्या वंध्यत्व निर्मूलनासाठी कोणत्या उपाययोजना करता? याविषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.


51 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor