काकडी लागवड तंत्रज्ञान
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
वेलीवर्गीय पिकांमध्ये काकडीला स्वत:चे महत्त्वपूर्ण स्थान आहे. काकडी हे भारतीय पिक असल्याने सर्व देशभर याची लागवड केली जाते. कोकणासारख्या अतिपर्जन्याच्या प्रदेशात देखील पावसाळी हंगामात काकडीचे भरपूर उत्पादन निघते. महाराष्ट्रामध्ये अंदाजे 3711 हेक्टरवर या पिकाची लागवड होते. आजच्या या लेखात आपण याच महत्वपूर्ण पिकाच्या लागवड तंत्रज्ञानाविषयी जाणून घेणार आहोत.
हवामान आणि जमीन:
- काकडी हे उष्ण आणि कोरडया हवामानात वाढणारे पीक आहे.
- काकडी लागवडीसाठी मातीचा पीएच(सामू) 6-7 दरम्यान असावा.
- पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन या पिकास योग्य असते.
लागवडीचा हंगाम:
- काकडीची लागवड खरीप आणि उन्हाळी हंगामात होते.
- खरीप हंगामासाठी काकडीची लागवड जून, जूलै महिन्यात व उन्हाळी हंगामामध्ये जानेवारी महिन्यात करावी.
काकडीच्या जाती:
- एफ१ सलोनी (शाईन)
- वंडर स्ट्राइक (शाईन)
- मालिनी (सेमिनीस)
- पद्मिनी (सेमिनीस)
- क्रिप्सी (पिरॅमिड सीड्स)
बियाण्याचे प्रमाण:
- या पिकाकरीता एकरी 1 ते 1.6 किलो बियाणे लागते.
पुर्वमशागत व लागवड:
- शेतात उभी आडवी नांगरणी करुन ढेकळे फोडून काढावी.
- शेतात चांगले कुजलेले 30 ते 50 गाडया शेणखत टाकावे. नंतर वखरणी करावी.
- उन्हाळी हंगामासाठी 60 ते 75 सेमी अंतरावर सऱ्या पाडून घ्याव्यात.
- खरीप हंगामात कोकण विभागात काकडीची लागवड करावयाची असल्यास दर 3 मीटर अंतरावर 60 सेमी रूंदीचे 30 सेमी खोलीचे चर खोदून, चरांच्या दोन्ही बाजूंना 90 सेमी अंतरावर 30 × 30 × 30 सेमी आकाराचे खड्डे तयार करावेत.
- प्रत्येक खड्ड्यामध्ये 2 ते 4 किलो शेणखत मिसळावे. प्रत्येक ओळीत 3 ते 4 बिया योग्य अंतरावर लावाव्यात.
खते व पाणी व्यवस्थापन:
- लागवडीच्या तयारीच्या 15-20 दिवसांपूर्वी 8-10 टन प्रति एकरी शेणखत टाकावे.
- काकडी पिकास 50 किलो नत्र 50 किलो पालाश 50 किलो स्फूरद लागवडीपूर्वी द्यावे. व लागवडीनंतर 1 महिन्याने नत्राचा 50 किलोचा दुसरा हप्ता द्यावा व पावसाळयात 8 ते 10 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे व उन्हाळयात 4 ते 5 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
आंतरमशागत:
- काकडीच्या वेलांना आधार दिल्यास फळांची प्रतीक्षा सुधारते परंतू ते खर्चिक असल्याकारणाने महाराष्ट्रामध्ये काकडीचे पीक जमिनीवर घेतले जाते.
- लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी पिकातील गवत काढून टाकावे.
- फळे लागल्यानंतर फळांचा संपर्क मातीशी येऊ नये म्हणून फळांखाली वाळलेल्या काट्या घालाव्यात.
काढणी व उत्पादन:
- फळे कोवळी असतानाच काढणी करावी म्हणजे बाजारात चांगला भाव मिळतो.
- काकडीची तोडणी दर दोन ते तीन दिवसांच्या अंतराने करावी.
- जाती व हंगामानुसार काकडीचे एकरी 80 ते 120 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते.
तुम्ही काकडी पिकाची लागवड कशी करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor