कोकम पिकाची शेती (Mangosteen cultivation)
नमस्कार शेतकरी बंधूंनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
कोकणामध्ये विविध प्रकारची झाडे आढळतात. आंबा, काजू, नारळ, सुपारी या झाडांच्या कोकणात मोठ्याप्रमाणात बागा आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आढळणारे सदाहरित फळझाड म्हणजे कोकम. कोकमाची लागवड केल्यास अधिक उत्पादन मिळते. या पिकास फळ प्रक्रियेमध्ये वाव असल्याने याच्या लागवडीस फळ प्रक्रिया उद्योगामध्ये मोठया प्रमाणात मागणी आहे. कोकमाचे फळ कच्चे असताना तसेच पिकून लाल रंगाचे झाल्यावर त्याचे विविध पदार्थ करून, साठवून वर्षभर विविध अन्नपदार्थांत वापरतात. यामुळेच कोकमाची मागणी भविष्यात मोठ्याप्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. तसेच कोकमाच्या रोपांपासून वाढणारे झाड सरळ वाढते मात्र त्यामध्ये 50 टक्के नर आणि 50 टक्के मादी झाडे निपजतात. त्यामुळे लागवड केल्यानंतर 50 टक्के झाडांपासूनच किफायतशीर उत्पादन मिळते. आंबा, काजू, नारळ, सुपारी झाडांच्या बागेसारखी कोकमाची सलग लागवड क्वचितच पहावयास मिळते. यामुळेच कोकणात मोठया प्रमाणात उपलब्ध असलेल्या पडीक जमिनीवर देखील कोकम लागवड करता येऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया याच विशेष पिकाच्या म्हणजेच कोकमाच्या लागवडीविषयीची सविस्तर माहिती.
कोकम लागवडीचे फायदे (Benefits of Kokum Cultivation):
- लागवड योग्य पडीक जमिन लागवडीखाली येईल.
- फळप्रक्रिया उदयोगास चालना मिळून नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
- कृषी उत्पन्न वाढल्याने विकासास चालना मिळेल.
कोकम लागवडीसाठी योग्य जमीन व हवामान (Suitable Soil and Temperature for Kokum Cultivation):
- कोकम लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन उपयुक्त आहे.
- तसेच कोकमाच्या चांगल्या वाढीसाठी उष्ण व दमट हवामान योग्य मानले जाते.
कोकम लागवडीसाठी सुधारीत जाती (Kokum Varieties):
- कोकण अमृता
- कोकण हातीस
कशी करावी कोकमाची लागवड (Kokum Cultivation):
- लागवडीसाठी मे महिन्यात 6x6 मीटर अंतरावर 60x60x60 सेमी आकाराचे खड्डे काढावेत आणि पावसाळयापुर्वी चांगली माती, 1 घमेले कुजलेले शेणखत व एक किलो सुपर फॉस्पेट यांच्या मिश्रणाने भरून घ्यावेत.
- रोपांचे अथवा कलमांचे वाळवीपासून सरंक्षण करण्यासाठी 50 ग्रॅम 2 टक्के फॉलीडॉल पावडर प्रत्येक खड्डयात टाकावी आणि पावसाच्या सुरूवातीला प्रत्येक खड्डयात एक वर्षाची निरोगी, जोमदार वाढणारी रोपे किंवा कलमे लावावीत.
- विषेशतः कलमे लावल्यानंतर ताबडतोब त्याला काठीचा आधार दयावा. आधार देवून सरळ वाढू दिल्याने कलम उभे सरळ वाढते, लवकर उत्पन्न देते आणि रोपांपेक्षा लवकर उत्पन्न मिळू शकते.
- कलमाच्या जोडाखाली पहिली दोन वर्षे वारंवार फुटवा वाढतो. तो काढून टाकावा अन्यथा फुटवा वाढून कलम मरण्याची शक्यता असते.
- लागवडीच्या पहिल्या वर्षी कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी कलमे अगर रोपांना सावली द्यावी.
- बागेमध्ये साधारणतः 10 टक्के नर झाडे लावावीत.
- लागवडीनंतर प्रत्येक झाडास पहिली किमान दोन वर्षे 10 लिटर प्रती दिन ठिबक सिंचनाद्वारे पाणी दयावे.
- झाडांभोवतीचे वाळलेले गवत वेळोवेळी काढून टाकावे.
- रोपांपासून लागवड केलेल्या बागांना 6 वर्षांनी मोहोर येऊन मादी झाडापासून उत्पन्न मिळू लागते.
खत व्यवस्थापन (Fertilizer Management):
कोकमापासून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी पहिल्या वर्षापासून खते देणे आवश्यक आहे. खते ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये दयावीत. खताची मात्रा पहिल्या वर्षांपासून त्याचप्रमाणात 10 वर्षापर्यंत वाढवावी आणि 10 व्या वर्षी आणि पुढे तीच कायम ठेवावी. खताची मात्रा पुढीलप्रमाणे आहे.
- पहिल्या वर्षी शेणखत/ नत्र 2 किलो / 100 ग्रॅम, स्फुरद 150 ग्रॅम आणि पालाश 50 ग्रॅम याप्रमाणात द्यावे.
- दुसऱ्या वर्षी शेणखत/ नत्र 20 किलो / 1 किलो, स्फुरद 1.5 किलो आणि पालाश 500 ग्रॅम याप्रमाणात द्यावे.
काढणी, उत्पन्न आणि उपयोगः
- कोकम पिकामध्ये फळधारणा 5 व्या वर्षापासून सुरू होते.
- ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये फुले लागतात आणि मार्च ते मे मध्ये फळे तोडणीस तयार होतात.
- हिरव्या रंगाची फळे फोडून वाळवतात त्यांचा उपयोग मोठया प्रमाणात अन्नपदार्थ साठविण्यासाठी आणि आंबटपणा आणण्यासाठी करतात.
- फळे पिकल्यावर गर्द लाल किंवा काळसर लाल रंगाची होतात. त्यांचा उपयोग आमसुले, कोकम आगळ आणि कोकम सरबत इत्यादीसाठी केला जातो. कोकमाच्या बियांमध्ये घनस्वरूपात असलेले तेल असते त्याला कोकम बटर असे म्हणतात.
- कोकम बटरचा उपयोग सौंदर्य प्रसादने तसेच औषधांमध्ये, क्रिममध्ये केला जातो.
- पुर्ण वाढलेल्या कोकम झाडापासून 140 ते 150 किलो फळे मिळतात.
कोकम लागवडीसाठी महत्वाचे मुद्दे:
- कोकम झाडाचे वय वाढते तसे उत्पन्न वाढते - त्यामुळे त्याला नियमीत खताची मात्रा दयावी. खत दिल्यामुळे फळे नियीमत मिळतात, फळांचा दर्जा चांगला राहतो.
- कोकमाच्या झाडाला भरपूर सुर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्यावी. त्याच्यावर सावली करणारी आजूबाजूची झाडे कमी केल्यास फळधारणा वाढते, फळे आकाराने मोठी होतात.
- कोकमाच्या झाडावरील मेलेल्या फांदया, कमकुवत फांदया कापून नष्ट कराव्यात. मात्र कोकमामध्ये जमिनीकडे वाढणाऱ्या फांदयावर फुले आणि फळे लागतात अशा फांदया तोडू नयेत.
अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य हवामानानुसार कोकमाची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या कोकम पिकाच्या लागवडीकरता कोणते तंत्र वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “बागायती पिके” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. कोकम लागवडीसाठी योग्य जमीन कोणती?
कोकम लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन योग्य मानली जाते.
तसेच कोकमाच्या चांगल्या वाढीसाठी उष्ण व दमट हवामान योग्य मानले जाते.
2. कोकम लागवडीचे फायदे काय?
कोकम लागवडीचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत:
- लागवड योग्य पडीक जमिन लागवडीखाली येईल.
- फळप्रक्रिया उदयोगास चालना मिळून नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
- कृषी उत्पन्न वाढल्याने विकासास चालना मिळेल.
3. कोकम पिकाच्या चांगल्या लागवडीसाठी कोणते हवामान योग्य मानले जाते?
कोकमाच्या चांगल्या वाढीसाठी उष्ण व दमट हवामान योग्य मानले जाते.
4. कोकम पिकामध्ये फळधारणा कधीपासून सुरु होते?
कोकम पिकामध्ये फळधारणा 5 व्या वर्षापासून सुरू होते.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor