तपशील
ऐका
कृषी
कीटक
कृषी ज्ञान
शेतकरी डॉक्टर
DeHaat Channel
25 Oct
Follow

पिकांमधील सुत्रकृमी (निमॅटोड) - प्रकार, लक्षणे आणि व्यवस्थापन (Nematodes in Crops - Types, Symptoms and Management)


नमस्कार शेतकरी बंधूंनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

सूत्रकृमी हे जमिनीमध्ये राहणारे अतिशय सुक्ष्म कृमी असून, यजमान झाडांच्या मुळांवर परिणाम करतात. सूत्रकृमी हे आपली सोंड मुळात आणि झाडाच्या जमिनीखालील भागात खुपसतात. त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यास पिकाचे आतोनात नुकसान होते. काही प्रजाती पाने आणि फुलातही सोंड खुपसून रस शोषतात. विविध पिकांवर सूत्रकृमीच्या प्रादुर्भावामुळे वाढ मंदावते. अन्नद्रव्ये कमतरता किंवा मरसारख्या रोगांप्रमाणे लक्षणे दिसून येत असल्यामुळे सूत्रकृमींचे निदान व उपाययोजनांना उशीर होतो. तोपर्यंत 12 ते 13 टक्क्यांपर्यंत नुकसान होऊन जाते. त्यामुळे सूत्रकृमींची शंका आल्यास त्वरित प्रयोगशाळेतून निदान करून घ्यावे. आजच्या या भागात आपण याच पिकाचे नुकसान करणाऱ्या सुत्रकृमींचे प्रकार, लक्षणे आणि व्यवस्थापन याविषयी जाणून घेणार आहोत.

सूत्रकृमींचे (निमॅटोड) प्रकार?

सूत्रकृमींच्या अनेक जाती असून, त्यातील काही जाती मुळांवर गाठी निर्माण करतात.

रूट नॉट निमॅटोड:

  • मुळांवर गाठी निर्माण करणाऱ्या जातींना इंग्रजीमध्ये 'रूट नॉट निमॅटोड' असे म्हणतात.
  • तसेच रूट नॉट निमॅटोड झालेली रोपे शेंडयाकरून वळताना दिसते.
  • रूट नॉट निमॅटोडचा प्रादुर्भाव होणारी पिके: भुईमूग, भेंडी, काजू, अननस, पालक, बीट, कोबी, फुलकोबी, नारळ, कोथिंबीर, काकडीवर्गीय फळ, हळद, गाजर, कडधान्य, आंबा, केळी, ऊस तसेच टोमॅटो, द्राक्ष, डाळिंब अशा वेगवेगळ्या पिकावर याचा प्रादुर्भाव दिसून येतो.

सिस्ट निमॅटोड:

  • सिस्ट निमॅटोडचा प्रादुर्भाव मुळावर होतो मात्र मुळावर गाठी तयार होत नाहीत.
  • सिस्ट निमॅटोडचा प्रादुर्भाव होणारी पिके: सोयाबीन, बटाटा, टोमॅटो, वांगी, मिरची, आणि ढोबळी मिरची.

रूट बरोईंग निमॅटोड:

  • झाडाच्या मुळांमध्ये होल करणारे निमॅटोड म्हणजे रूट बरोईंग निमॅटोड.
  • रूट बरोईंग निमॅटोडचा प्रादुर्भाव होणारी पिके: केळी, संत्र, आले, चहा, नारळ, मिरी आणि टोमॅटो

रेनीफॉर्म निमॅटोड:

  • रेनीफॉर्म निमॅटोडला मायक्रोस्कोप मध्ये पाहिल्यास किडनीच्या आकाराची याची मादी दिसून येते.
  • रेनीफॉर्म निमॅटोडचा प्रादुर्भाव होणारी पिके: कापूस, चवळी, अननस, केळी, भेंडी, नारळ, कोबी, मका, काकडी, टोमॅटो, मूळा, वांगी, पेरू, कलिंगड, खरबूज आणि आले

सूत्रकृमींचा (निमॅटोड) प्रसार कसा होतो?

  • सूत्रकृमीग्रस्त शेतात वापरलेली अवजारे दुसऱ्या शेतात वापरल्यास सूत्रकृमींचा प्रसार होतो.
  • वेगवेगळ्या शेतातून आणलेल्या रोपं व बियाणे यांमुळे देखील सूत्रकृमींचा प्रसार होतो.
  • सूत्रकृमीग्रस्त शेतातून पाणी दुसऱ्या ठिकाणी वाहत गेल्यास सूत्रकृमींचा प्रसार होतो.
  • वेगवेगळे पक्षी, कीटक देखील सूत्रकृमींच्या प्रसारासाठी पोषक ठरतात.

सूत्रकृमी (निमॅटोड) कसे ओळखायचे (Nematode Identification)?

  • सूत्रकृमींच्या प्रादुर्भावामुळे पिकांच्या मुळावर वैशिष्ट्यपूर्ण गोलाकार सूज येऊन गाठी तयार होतात, त्यास निमॅटोड गॉल्स असे संबोधले जाते. त्यावरून सूत्रकृमींचा प्रादुर्भाव ओळखणे सोपे असते.
  • लक्षणे दाखणाऱ्या झाडांभोवतीची माती बाजूला सारून ते झाड, रोपटे उपटून घ्यावे. त्याची मुळे पाण्यात स्वच्छ धुऊन घ्यावीत. मुळांवर गाठी आहेत का, हे पाहावे.
  • काही डाळवर्गीय पिकांच्या मुळावरील गाठी आणि सूत्रकृमींच्या गाठी यामध्ये शेतकऱ्यांचा गोंधळ होऊ शकतो. मात्र त्यांमधील फरक लक्षात घ्यावा.
  • डाळवर्गीय पिके उदा. हरभरा, मुग, मटकी, उडीद, तूर किंवा तेलबिया पिके उदा. सोयाबीन, भुईमूग यांच्या मुळावर असलेल्या गाठी सहजासहजी वेगळ्या होतात. त्या पूर्णपणे गोलाकार आणि काही प्रमाणात लालसर असतात. या गाठी नत्र स्थिरीकरण करणाऱ्या उपयुक्त जिवाणूंमुळे तयार होतात.
  • सूत्रकृमीच्या प्रादुर्भावामुळे तयार झालेल्या गाठी वरीलप्रमाणे सहजासहजी वेगळ्या होत नाहीत. या गाठी म्हणजे मुळाचीच जादा झालेली बाह्यवाढ होय. या गाठींचा रंग मुळांप्रमाणेच असतो.
  • मुळांवर अशा गाठी तयार झाल्या की मुळांची पाणी आणि अन्नद्रव्य वहनाची क्षमता कमी होते.
  • भाजीपाला पिकात अशा गाठींना तडे जाऊन त्या उघड्या पडतात. त्यामधून अन्य हानिकारक बुरशी, जिवाणूंचा शिरकाव होऊन रोग निर्माण झाल्याने गुंतागुंत वाढते.

सूत्रकृमींची (निमॅटोड) पिकावरील लक्षणे (Nematode Symptoms):

  • सूत्रकृमी मुळांच्या पेशीमधून रस शोषतात.
  • त्यामुळे मुळांवर जखमा होतात, तेथील पेशी मरतात.
  • पिकांना मुळाकडून पाणी व अन्नद्रव्याच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे मुळांची व पर्यायाने पिकांची वाढ खुंटते.
  • वनस्पतीच्या जमिनीवरील लक्षणांमध्ये पाने पिवळी पडलेली दिसतात.
  • जमिनीमध्ये पाण्याचा अंश पुरेसा असतानाही पीक सुकल्यासारखे दिसते किंवा झाड संपूर्ण सुकते.
  • सूत्रकृमींमुळे आढळणारी लक्षणे ही अन्नद्रव्यांच्या कमतरतेसारखीच असल्याने सहजासहजी लक्षात येत नाहीत.
  • सूत्रकृमींच्या प्रादुर्भावामुळे पिकात मरसदृश लक्षणे दिसतात.
  • जमिनीमध्ये मुबलक प्रमाणावर ओलावा असूनही पीक सुकून जाते.
  • प्रादुर्भावग्रस्त भाजीपाला पीक निरोगी पिकापेक्षा कमी वाढते. त्यास फुले, फळे कमी लागतात.
  • जास्त प्रादुर्भावाच्या स्थितीत असे पीक मरून जाते.
  • सूत्रकृमींचा प्रादुर्भाव उष्ण, बागायती, वालुकामय जमिनीत जास्त दिसून येतो.
  • सूत्रकृमींच्या अतिप्रादुर्भावामुळे पीक पूर्णतः मरून जाऊ शकते. मात्र मोठ्या वृक्षांमध्ये फारसे नुकसान दिसून येत नाही.
  • मोठ्या झाडामध्ये सूत्रकृमींचा प्रादुर्भाव शोधणेही कठीण असते.
  • प्रादुर्भाव ग्रस्त झाडाझुडपांची वाढ मंदावून उत्पादन कमी होते.
  • शोभिवंत वृक्षांमध्यै सूत्रकृमींच्या प्रादुर्भावामुळे वाढ खुंटते. फांद्या वरून खाली वाळू शकतात.
  • सूत्रकृमी विषयी तुलनेने जागरूकता कमी आहे. तसेच अन्नद्रव्यांच्या लक्षणाशी असलेल्या साधर्म्यामुळे प्रादुर्भाव लक्षात येण्यातच उशीर होतो. नियंत्रण थोडे कठीण होते.

पिकातील सूत्रकृमीचे (निमॅटोड) नियंत्रण (Nematode control):

  • उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोलवर नांगरट करावी.
  • पिकांची फेरपालट करावी.
  • पिकामध्ये झेंडूची लागवड हा सूत्रकृमींच्या व्यवस्थापनासाठी उत्तम उपाय आहे.
  • मिश्र पिकांची लागवड करावी.
  • धैंचा, ताग यासोबतच मूग, उडीद, चवळी या सारखी द्विदलवर्गीय किंवा हिरवळीची पिके घ्यावीत.
  • निम ऑइल 400 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून वर्षातून 2,3 वेळा मुळांना देऊन आळवणी करू शकता.
  • पॅसिलोमायसिस लिलियानस हे घटक असलेले (पॅसिनेमो - विजय अॅग्री इंडस्ट्री) 1 लिटर + ट्रायकोडर्मी व्हिरीडी 1 लिटर प्रमाणात 200 लिटर पाण्यात मिसळून याची आळवणी पिकाच्या मुळाजवळ करायची आहे किंवा
  • बायर कंपनीचं वेलम प्राईम 200 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून मुळाजवळ करायची आहे.
  • भाजीपाला पिकांमध्ये सूत्रकृमींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आदाम कंपनीचं निमिट्स याची 1 ग्रॅम प्रति झाडी अशी आळवणी करायची आहे. डाळिंबासारखं मोठं पीक असल्यास 10 ग्रॅम प्रति ड्रीपर याचा वापर करायचा आहे.
  • सूत्रकृमींचा प्रादुर्भाव नसलेल्या किंवा प्रतिकारक रोपांचा वापर करावा.

तुम्ही तुमच्या पिकातील सुत्रकृमींचे (निमॅटोड) व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. सूत्रकृमी म्हणजे काय?

सूत्रकृमी हे जमिनीमध्ये राहणारे अतिशय सुक्ष्म कृमी असून, यजमान झाडांच्या मुळांवर परिणाम करतात.

2. सूत्रकृमी पिकाचे काय नुकसान करतात?

सूत्रकृमी हे आपली सोंड मुळात आणि झाडाच्या जमिनीखालील भागात खुपसतात. त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यास पिकाचे आतोनात नुकसान होते.

3. सूत्रकृमींची पिकावरील सामान्य लक्षणे काय?

सूत्रकृमी मुळांच्या पेशीमधून रस शोषतात. त्यामुळे मुळांवर जखमा होतात, तेथील पेशी मरतात. पिकांना मुळाकडून पाणी व अन्नद्रव्याच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे मुळांची व पर्यायाने पिकांची वाढ खुंटते.

41 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor