जायफळ लागवड (Nutmeg Cultivation)
नमस्कार शेतकरी बंधूंनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
जायफळ हे एक उंच वाढणारे मसाल्याचे सदापर्णी झाड आहे. ईस्ट इंडिया कंपनीने हे झाड भारतात आणले होते. जायफळाची लागवड ही प्रामुख्याने केरळ,तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील कोकण विभागामध्ये होते. भारताचा विचार केला तर भारतात जायफळ लागवडी खालील क्षेत्र हे 5350 हेक्टर असून त्यापासून दोन हजार 890 टन एवढे उत्पादन मिळते. जायफळामध्ये पपई व कोकम या प्रमाणेच नर व मादी झाडे वेगवेगळी असतात. जायफळ बागेमध्ये सुमारे 50 टकके झाडे मादी 45 टक्के नर व 5 टक्के संयुक्त फूले असणारे झाडे निघतात. नराच्या झाडास गुच्छाने फुले लागतात तर मादी झाडास एक एकटी फूले लागतात. आज आपण याच मसाल्याच्या विशेष अशा जायफळ पिकाच्या लागवडीविषयी जाणून घेणार आहोत.
जायफळाविषयी:
- जायफळाची फळे चिकुच्या आकाराची पण गुळगुळीत व पिवळसर रंगाची असतात.
- फळांच्या टरफलांच्या आतील अंगास गुलाबी रंगाची जाळी असते. या जाळीस जायपत्री म्हणतात.
- फळांच्या टरफलांचा उपयोग लोणचे, चटणी, मुरंबा इत्यादि साठी करतात.
- जायफळाचा उपयोग मिठाई स्वादिष्ट करण्यासाठी तसेच जायफळ व जायपत्रीचा उपयोग मसाल्यात केला जातो.
जायफळ पिकासाठी योग्य हवामान (Suitable Temperature for Nutmeg):
- जायफळ हे उष्ण कटिबंधातील पीक असून या पिकास दमट हवामान व 2500 ते 4000 मिमि पर्यंतचा पाऊस चांगलाच मानवतो.
- पावसाची व्यवस्थित विभागणी असेल अशा 1500 ते 3000 मिमि पर्यंत पाऊस पडणा-या प्रदेशात जायफळाचे पीक चांगले येते.
- अति थंड म्हणजे 10 से.ग्रे. किंवा त्याखाली तसेच अतिउष्ण म्हणजेच 40 से.ग्रे. पेक्षा अधिक तापमान या पिकास मानवत नाही.
- समुद्रसपाटीपासुन 750 मीटर उंची पर्यंत हे पीक घेतले जाते.
जायफळ पिकासाठी योग्य जमीन (Suitable Soil for Nutmeg):
- किनारपट्टीच्या रेताड, गाळमिश्रीत रेताड, वरकस अशा विविध प्रकारच्या परंतु उत्तम निचऱ्याच्या जमिनीत जायफळाची लागवड होवू शकते.
- पोयटयाची आणि पालापाचोळा कुजून तयार झालेली जमीन जायफळाच्या पिकास अधिक मानवते.
- या झाडाला सावलीची आवश्यकता असल्यामुळे जायफळाच्या पिकात आंतरपीक म्हणून नारळ, सुपारीचे पीक घेतले जाते. या पिकांमुळे जायफळाला आवश्यक असणारी सावली तसेच पश्चिमी वाऱ्यापासून आवश्यक असणारे संरक्षण मिळते.
जायफळाच्या या आहेत काही सुधारित जाती:
- कोकण सुगंधा
- कोकण स्वाद
- कोकण श्रीमंती
- कोकण संयुक्ता
पूर्वमशागत:
- नारळाची लागवड 7.5 × 7.5 मिटर अंतरावर असल्यास, पावसाळयापुर्वी प्रत्येक दोन नारळाच्या मध्यभागी व सुपारीच्या बागेत चार सुपारीच्या झाडांच्या चौफूलीवर 90 सेमी लांबी रूंदी व खोलीचे खड्डे भरताना प्रत्येक खड्ड्यात 50 किलो शेणखत / कंपोस्ट खत घालावे.
अभिवृध्दी:
- जायफळाची अभिवृध्दी बी पासुन तसेच कलमे करून ही करता येते. परंतु प्रामुख्याने जायफळाची अभिवृध्दी बियांपासुन रोपे तयार करुन केली जाते.
- बियांपासून तयार केलेली रोपे ही नराची की मादीची आहेत हे कळत नाही.
- रोप लावल्यानंतर त्याला जवळजवळ 6 ते 7 वर्षानंतर फुले येऊ लागतात. त्यानंतर झाड नक्की नराचे आहे की मादीचे हे कळते. जायफळाच्या फक्त मादी झाडासचं फळे धरतात.
- रोपे तयार करण्यासाठी जायफळाचे ताजेच बी वापरावे.
- बी रुजविण्यासाठी 15 सेमी उंच, 1 ते 1.5 मिटर रूंद व आवश्यक त्या लांबीच गादीवाफे तयार करावेत.
- गादी वाफे तयार करण्यासाठी माती व वाळू यांचे योग्य मिश्रण वापरावे. तयार केलेल्या गादी वाफ्यावर जायफळाचे बी रूजण्यास सुरुवात होते.
- सुमारे 10 ते 15 दिवसांनी रोपे प्लॅस्टीकच्या पिशव्या लावण्यास योग्य होतात. सुमारे 1 वर्षाची रोपे लागवडी योग्य असतात.
- जायफळाची अभिवृध्दी कलमे करून देखील करत येते.
- भेटकलम, मृदकाष्ट कलम अशा कलमाच्या पध्दती वापरुन आपल्याला जायफळाची अभिवृध्दी करता येते.
- जायफळाची कलमे लावल्यामुळे बरेच फायदे होवू शकतात सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढी मादीची आणि नराची झाडे लावता येतात.
- मादी झाडाची काडी वापरुन बांधेल्या कलमांपासुन मादी झाड मिळते तर नर झाडाची काडी वापरून बांधलेल्या कलमांपासुन नराचे झाड मिळते.
- दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे कलमाला फुले लवकर म्हणजे तिसऱ्या वर्षी लागतात. त्यामुळे लवकर उत्पन्न मिळते.
- ज्या मादी झाडाच्या काडया कलमे बांधण्यासाठी वापरलेल्या असतात त्या झाडांसारखीच तयार केलेली कलमे उत्पादनाला असतात.
- थोडक्यात जायफळाची अभिवृध्दी कलमाने केल्यास आपणास पाहिजे त्या गुणधर्माचे झाड निर्माण करता येते.
- जायफळाची कलमे लावून जरी आपण लागवड केली तरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बागेतील दर दहा मादी झाडांच्या कलमामागे कमीत कमी एक नराचे कलम असणे आवश्यक आहे.
- जर फक्त मादी झाडांचीच कलमे लावली तर फक्त फूले येतील पण नर झाड नसल्याने फलधारणा होणार नाही.
जायफळाची लागवड (Nutmeg Cultivation):
- जून महिन्यात तयार केलेल्या खड्ड्यांच्या मध्यभागी जोमाने वाढणारे रोप / कलम लावून त्याच्या भोवतालची माती पायाने दाबून घट्ट करावी.
- रोपांची लागवड करावयाची झाल्यास रोपे निरोगी, सशक्त तसेच रोपांचे वय 1 ते 2 वर्ष असावे.
- कलम लागवडीत कलमांचा जोड व्यवस्थित आहे का तसेच कलम बांधलेले प्लॅस्टीक अगर सुतळी सोडून टाकली आहे का याची खात्री करावी. तसेच कलमांचा जोड जमिनीवर राहील याची दक्षता घ्यावी.
जायफळ पिकातील खत व्यवस्थापन (Nutmeg Fertilizer Management):
- जायफळाच्या झाडास पहिल्या वर्षी 10 किलो शेणखत / कंपोस्ट, 20 ग्रॅम नत्र (45 ग्रॅम युरिया), 10 ग्रॅम स्फूरद ( 65 ग्रॅम सुपर फॉस्पेट ) आणि 50 ग्रॅम पालाश ( 85 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे. ही खताची मात्रा दरवर्षी अशाच प्रमाणात वाढवावी. मात्र 8 ते 10 वर्षानंतर प्रत्येक झाडास 50 किलो शेणखत / कंपोस्ट, 500 ग्रॅम नत्र ( 1 किलो युरिया ), 250 ग्रॅम स्फूरद (640 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट ), 1 किलो पालाश, 1.6 किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे.
जायफळ पिकातील पाणी व्यवस्थापन (Nutmeg Water Management):
- जायफळ हे बागायती पीक आहे म्हणूनच जमिनीचा प्रकार आणि हंगामानुसार पाण्याच्या पाळया दयाव्यात.
- जमीन कोरडी होणार नाही आणि जास्त पाणी दिल्याने चिखल होणार नाही याची काळजी घ्यावी.
- रेताड जमिनीत उन्हाळयात प्रत्येक दोन दिवसाआड पाणी द्यावे.
- आवश्यकता भासल्यास दोन ते तीन वर्ष तरी जायफळ रोपांना / कलमांना सावलीच्या जागेत ठेवणे योग्य ठरते.
काढणी व उत्पादन:
- जायफळाला फूले आल्यानंतर फळधारणा ते काढणी पर्यंत 8 ते 10 महिन्याचा कालावधी लागतो.
- जायफळाला वर्षभर फूले येत असतात. परंतु जुलै-ऑगस्ट आणि फेब्रूवारी-मार्च या कालावधीत फळांची जास्त काढणी केली जाते.
- पुर्ण पक्व झालेल्या फळांचा रंग पिवळा होतो. तसेच टरफलास देठाच्या विरुध्द बाजुस तडा जातो. अशी फळे काढावी किवा पडल्यानंतर गोळा करावीत की, टरफले वेगळी करुन जायपत्री अलगद काढावी.
- जायपत्री व बिया उन्हात वाळवाव्यात. परंतु बरीचशी जायफळे पावसाळयात तयार होत असल्याने उन्हात वाळविता येत नाहीत. अशा वेळी बिया व जायपत्री मंद उष्णतेवर वाळवाव्यात. जायपत्री 6 ते 8 दिवसात तर जायफळे 15 दिवसात वाळवतात.
- पुर्ण वाढीच्या मादी झाडापासून 500 ते 800 फळे मिळतात. पंचवीस वर्षापर्यंत उत्पन्न वाढत जाते.
- पंचवीस वर्षाच्या झाडापासून दोन ते तीन हजार फळे मिळतात.
- जायफळाच्या झाडापासून 60 ते 70 वर्ष किफायतशिर उत्पन्न मिळते.
अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य हवामानानुसार जायफळाची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या जायफळ पिकाच्या लागवडीकरता कोणते तंत्र वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “बागायती पिके” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. जायफळ पिकास कोणते हवामान योग्य आहे?
जायफळ हे उष्ण कटिबंधातील पीक असून या पिकास दमट हवामान व 2500 ते 4000 मिमि पर्यंतचा पाऊस चांगलाच मानवतो.
2. जायफळ लागवडीसाठी योग्य जमीन कोणती?
जायफळ लागवडीसाठी पोयटयाची आणि पालापाचोळा कुजून तयार झालेली जमीन उत्तम मानली जाते.
3. जायफळाची लागवड महाराष्ट्रात कुठे केली जाते?
जायफळाची लागवड महाराष्ट्रात कोकण विभागात केली जाते.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor