तपशील
ऐका
रोग
भेंडी
कृषी ज्ञान
कृषी ज्ञान
DeHaat Channel
10 Jan
Follow

भेंडी पिकाला लागणारे रोग (Okra crop Diseases and Management)


नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी-जास्त प्रमाणात भेंडीची लागवड केली जाते. भेंडीचे पीक उष्णकटिबंधीय तसेच उप-उष्णकटिबंधीय प्रदेश आणि उष्ण भागात घेतले जाते. भेंडी परदेशात निर्यातीसाठी उत्कृष्ट बाजारपेठ देते. भेंडीला बाजारात वर्षभर चांगली मागणी असल्यामुळे या पिकापासून किफायतशीर उत्पन्न मिळविता येते. तथापि, पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी, पिकाची काळजी घेणे हा एक महत्त्वाचा घटक आहे. भेंडीचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या देशांमध्ये भारत अग्रेसर आहे. महाराष्ट्रात भेंडी पिकावर विविध प्रकारच्या किडी व रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यामध्ये मर, भुरी, मोझॅक, केवडा, पानांवरील ठिपके इत्यादी रोगांचा समावेश आहे. आजच्या आपल्या या लेखात आपण याच रोगांविषयीची लक्षणे आणि व्यवस्थापन याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

मर रोग:

मर रोगाची लक्षणे (Wilt Disease Symptoms):

  • हा रोग भेंडी पिकाला दोन प्रकारे प्रभावित करतो. प्रथम, वनस्पती जमिनीतून बाहेर येण्यापूर्वी, दुसरे म्हणजे, जमिनीच्या पृष्ठभागावर असलेल्या देठाचा भाग काळा होतो आणि पडतो, नंतर रोप सुकते.
  • वातावरणात आर्द्रता जास्त असल्यास हा रोग अधिक वाढतो. त्यामुळे पिकावर योग्य वेळी प्रक्रिया करावी.
  • प्रथम पाने पिवळसर होतात आणि सुकतात. मर रोगग्रस्त पीक शेवटी पूर्णपणे मरून जाते.
  • रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास पिकाची संख्या कमी होऊन पीक विरळ होते. परिणामी उत्पादनात घट होते.

मर रोगाचे व्यवस्थापन (Wilt Disease Management):

  • एकाच शेतात सतत भेंडीचे पीक घेणे टाळावे.
  • मर रोगग्रस्त जमिनीत भेंडीचे पीक घेऊ नये.
  • पिकाला जास्त पाणी देऊ नये कारण त्यामुळे आर्द्रता वाढते. भेंडीच्या बियाण्यावर ट्रायकोडर्मा व्हिरिडी ४ ग्रॅम प्रति किलोने बियाण्याची प्रक्रिया करावी.
  • 2 लिटर ट्रायकोडर्मा विरिडी 200 लिटर पाण्यात मिसळून एकरी माती भिजवावी.
  • कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यूपी (क्रिस्टल-बाविस्टीन) 500 ग्रॅम प्रति एकर 150 लिटर पाण्यात मिसळून ड्रेंचिंग करावे.
  • अधिक समस्या असल्यास कॉपर ऑक्सिक्लोराईड 50% डब्ल्यूपी (क्रिस्टल-bluecopper) 500 ग्रॅम प्रति एकर 150 लिटर पाण्यात मिसळून फवारणी/ड्रेंचिंग करावे.
  • मर रोगाच्या नियंत्रणासाठी रोग प्रतिकारक्षम वाणांची निवड करावी.
  • रोगग्रस्त रोपे मुळासकट उपटून शेताबाहेर उपटून फेकून द्यावीत.

भुरी रोग:

भुरी रोगाची लक्षणे (Powdery Mildew Symptoms):

  • पानांच्या वरील बाजूस पांढऱ्या रंगाचे डाग दिसून येतात.
  • वाढत्या प्रसारासोबत हे डाग मोठे व पिवळ्या रंगाचे होत जातात व पाने गळतात.
  • हा रोग देठ, खोड आणि भेंडीवरही पसरतो. यामुळे रोपांची वाढ खुंटते.
  • दमट हवामानात या रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो.
  • भुरी रोग झाल्यास पाने मोठ्या संख्येने गळण्यास सुरुवात होते.

भुरी रोगाचे व्यवस्थापन (Powdery Mildew Management):

  • हेक्साकोनाजोल 5% ईसी (टाटा - कॉन्टाफ) 200 मिली/200 लीटर पाणी किंवा
  • मायक्लोब्युटानिल 10% डब्ल्यू पी (Dow - systhane) 80 ग्रॅम/200 लीटर पाणी किंवा
  • अझॉक्सीस्ट्रोबिन 11% + टेबुकोनाझोल 18.3% डबल्यु/डबल्यु (देहात - ॲझिटॉप) 200 मिली/200 लीटर पाणी किंवा
  • डायफेनोकोनाझोल 25% ईसी (सिजेंटा - स्कोर) 100 मिली/200 लीटर पाणी किंवा
  • टेट्राकोनाझोल 3.8% ईडबल्यु (पेप्टेक बायोसाइंसेज - PBL) 150 मिली/ 200 लीटर पाण्यातून एकरी फवारणी करावी.

मोझॅक रोग:

मोझॅक रोगाची लक्षणे (Mosaic Disease Symptoms):

  • मोझॅक प्रथम सर्वात लहान पानांवर दिसतो.
  • पीक, संक्रमणाची वेळ आणि हवामान परिस्थिती याप्रमाणे लक्षणे बदलतात.
  • एकुणच पानांवर ठिगळासारखे किंवा विखुरलेले उंचवटलेले ठिपके, मस्से येतात आणि विविध पद्धतीने पाने विकृत होतात.
  • भेंडीच्या फळांवरील रंग समान नसतो हे आणखी एक लक्षण आहे.
  • पानावरील उंचवटलेले ठिपके कालांतराने करपट डागात रूपांतरित होतात.
  • पानांना नुकसान झाल्याने, या विषाणूच्या संक्रमणाबरोबर वाढीचा दर आणि उत्पादन देखील कमी होते.

मोझॅक रोगाचे व्यवस्थापन (Mosaic Disease Management):

  • या रोगाच्या लक्षणांकरीता तसेच माव्यांच्या उपस्थितीकरीता शेताचे नियमित निरीक्षण करा.
  • यजमान नसलेल्या पिकांबरोबर पीक फेरपालट केल्यास विषाणूंना टाळण्यात मदत होईल.
  • आधीच्या पिकाचे अवशेष काढुन टाका.
  • मित्र किड्यांना नुकसान होऊ नये म्हणुन कीटनाशकांचा वापर सीमित ठेवा.
  • जमिनीवर प्लास्टिक अच्छादन वापरून माव्यांना पळवुन लावुन रोगामुळे होणारे नुकसान कमी करावे.
  • प्रत्येक ओळीत पडदे बांधल्यास माव्यांचा प्रतिबंध होईल.
  • थायामेथोक्सम 25% डब्ल्यूजी (देहात-Asear) ची 100 ग्रॅम 200 लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने प्रति एकर फवारणी करावी किंवा
  • फिप्रोनिल 5% एससी (धानुका-फॅक्स) - 400 मिली प्रति एकर किंवा
  • जिओलाइफ नो व्हायरस 400 मिली प्रति एकर किंवा
  • फिप्रोनिल 40% + इमिडाक्लोप्रिड 40% डब्ल्यूजी (देहात - डेमाफीप) 100 ग्रॅम प्रति एकर प्रमाणात 200 ली पाण्यात मिसळून फवारणी करावी

केवडा रोग:

केवडा रोगाची लक्षणे (Downy Mildew Symptoms):

  • केवडा हा एक बुरशीजन्य रोग आहे ज्यामुळे पानांवर पिवळसर बुरशीची वाढ होते व पाने कोमेजतात.
  • केवडा रोगाचा शिरकाव हिरव्या भागावरील त्वचारंध्रा किंवा जखमेतून होत असतो.
  • हा रोग पावसाच्या मदतीने निरोगी भागावर पसरून रोगाचा प्रसार करतो.
  • भौतिक गुणधर्म हरवलेल्या जमिनीमध्ये तसेच आद्रतायुक्त हवामानात डाऊनी या रोगाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होतो.
  • या रोगामुळे पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान होते.
  • या रोगाला दमट वातावरण अनकूल असते.
  • या रोगामुळे ग्रस्त भाग निकामी होतो या रोगाला पोषक हवामान असल्यास रोगाचे नियंत्रण करणे अवघड होते.
  • या रोगाची लक्षणे पिकाच्या सर्व भागांवर आढळतात.
  • हिरव्या पानांवर सुरवातीस लहान तेलकट डाग पडतात.
  • पानाच्या खालील भागावर ठिपका असलेल्या ठिकाणी बुरशीची वाढ दिसते.

केवडा रोगाचे व्यवस्थापन (Downy Mildew Management):

  • मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी (देहात DEM-45) 400 ग्रॅम/ 200 लीटर किंवा
  • रोगाचा प्रादुर्भाव दिसताच, मेटॅलॅक्सिल एम 4.0 % + मॅन्कोझेब 64 % डब्ल्यू/डब्ल्यू (सिजेंटा-रिडोमिल गोल्ड) 400 ग्रॅम/ 200 लिटर पाण्यातून फवारावे किंवा
  • सायमोक्सॅनिल 8% + मॅन्कोझेब 64% डबल्यु पी (ड्युपॉन्ट-करझेट एम 8) 600 ग्रॅमची/ 200 लीटर पाण्यातून एकरी किंवा
  • प्रोपीनेब 70% डब्ल्यूपी (बायर-अँट्राकोल) 600 ग्रॅमची/ 200 लीटर पाण्यातून एकरी फवारणी करावी.

पानांवरील ठिपके:

पानांवरील ठिपके (Leaf Spot) रोगाची लक्षणे:

  • सुरवातीला, हिरव्या अस्पष्ट रंगाचे ठिपके पानांच्या खालच्या बाजुला दिसतात.
  • विशेषकरुन जुन्या पानांवर, जी जमिनीच्या जवळ असतात ती रोगाने पहिल्यांदा प्रभावित होतात.
  • फिकट तपकिरी ते राखाडी बुरशीची वाढ प्रभावित पानांच्या पृष्ठभागावर दिसते.
  • जसा रोग वाढत जातो, हे ठिपके वाळतात आणि पानांच्या वरच्या पृष्ठभागावर देखील दिसु लागतात.
  • संक्रमित पाने अखेरीस वाळून गळतात.
  • फांद्या आणि भेंडीवरही अशीच लक्षणे दिसतात.
  • गंभीर संक्रमणात झाडाची संपूर्ण पानगळ होते.

पानांवरील ठिपके (Leaf Spot) रोगाचे व्यवस्थापन:

  • शिफारशीत अंतरावरच लागवड करावी.
  • पाणी साठू देऊ नये. पाण्याचा योग्य निचरा करावा.
  • पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा.
  • भोवतालचा परिसर तणमुक्त ठेवावा.
  • कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यू पी (बाविस्टीन) 2.5 ते 5 ग्रॅम प्रतिकिलोने किंवा
  • पेरणीपूर्वी बियाण्यास (कार्बॉक्सिन 37.5% + थायरम 37.5%) मिश्र घटक 3 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
  • मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी (देहात DEM-45) 400 ग्रॅम प्रति एकर 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • अझॉक्सीस्ट्रोबिन 11% + टेब्युकोनाझोल 18.3% एससी (देहात-Azytop) ३०० मिलीची २00 लिटर पाण्यातून फवारणी केल्यास पिकाला रोगापासून वाचविता येऊ शकते किंवा
  • मायक्लोब्युटानिल 10% डब्ल्यू पी (नागार्जुन - इंडेक्स) 100 -150 ग्रॅम/एकरी फवारणी करावी किंवा
  • रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास टेबुकोण्याझोल 10% डब्लूपी + सल्फर 65% डब्लूजी (हरू - सुमिटोमो ) 400 ग्रॅम प्रति 200 ली पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी.

फवारणी करताना घ्यावयाची काळजी:

  • फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
  • फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
  • शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
  • फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
  • औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
  • फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
  • तणनाशकांचा पंप फवारणीसाठी शक्यतोवर वापरू नाही.
  • एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये. त्यामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढते.
  • कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
  • फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
  • फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.

तुम्ही तुमच्या भेंडी पिकामधील रोगांचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. भेंडी पिकासाठी उपयुक्त हवामान कोणते?

भेंडी हे उष्ण व दमट हवामानात येणारे पीक आहे. समशीतोष्ण व भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान हे भेंडी पिकासाठी उपयुक्त असते.

2. भेंडी पिकामध्ये आढळणाऱ्या प्रमुख किडी व रोग कोणते?

भेंडी पिकामध्ये मावा, पांढरी माशी, तुडतुडे, फळे पोखरणारी अळी, भुरी आणि केवडा हे प्रमुख रोग व किडी आढळून येतात.

3. भेंडीचे पीक कोणत्या भागात घेतले जाते?

भेंडीचे पीक उष्णकटिबंधीय तसेच उप-उष्णकटिबंधीय प्रदेश आणि उष्ण भागात घेतले जाते.

37 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor