कांदा पिकातील करपा व्यवस्थापन (Onion Blight Disease)
![](/_next/image?url=https%3A%2F%2Fdehaat-kheti-prod.s3.amazonaws.com%2Fdjango-summernote%2F2024-04-09%2Ff473ccd8-6a35-4055-aa2e-5def3d29593d.webp&w=3840&q=75)
नमस्कार शेतकरी बंधूंनो,
कांदा पिकविणाऱ्या राज्यात क्षेत्र व उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र अग्रस्थानी आहे. राज्यामध्ये प्रामुख्याने पुणे, नाशिक, धुळे, सातारा, सोलापूर, नगर या जिल्ह्यांमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड होते. तसेच मराठवाडा व विदर्भातील काही भागात कांद्याची लागवड केली जाते. बाजारात वर्षभर कांद्याला चांगली मागणी असते. दर्जेदार कांद्याला कायम चांगले दर मिळतात. दर्जेदार कांदा उत्पादन घेण्यासाठी सुधारित तंत्राचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे. रोपावस्थेपासून ते साठवणुकीपर्यंत कांदा पिकावर अनेक रोगांचा (Onion Disease) प्रादुर्भाव होतो. बदलत्या हवामानामुळे (Climate Change) पिकावर कीड-रोगांचा (Onion Pest Disease Management) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतो आहे. परिणामी कांद्याची उत्पादकता कमी होत चालली आहे. प्रतिकूल हवामानात कीड व रोगांच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे सुमारे 50 ते 80 टक्क्यांपर्यंत नुकसान होते. म्हणूनच आजच्या या भागात आपण कांदा पिकातील प्रमुख रोगांपैकी एका म्हणजेच करपा रोगाच्या व्यवस्थापनाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.
कांदा पिकात तीन प्रकारचे करपा रोग आढळून येतात. ते पुढीलप्रमाणे (Blight Disease in Onion):
- काळा करपा
- तपकिरी करपा
- जांभळा करपा
1) काळा करपा: (ॲन्थ्रॅक्नोज)
कोलीटोट्रीकम करप्यालाच काळा करपा रोग असे देखील म्हणतात व याचा प्रादुर्भाव खरीप हंगामामध्ये दिसून येतो. प्रामुख्याने जमिनीतून पाण्याचा निचरा न झाल्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो व पाने करपतात व कंद सडतो.
रोगकारक बुरशी: कोलीटोट्रायकम ग्लेओस्पोराइड्स
लक्षणे:
- सुरूवातीला पानाची बाह्य बाजू व देठाजवळ राखाडी रंगाचे ठिपके दिसतात. त्यावर बारीक गोलाकार आणि उठावदार ठिपके वाढू लागतात.
- पाने वाळतात. रोपाची मान लांबट होऊन पात वेडीवाकडी होते. पाने वेडीवाकडी झाल्यामुळे कांद्याची वाढ होत नाही.
- रोपांची पाने ही काळी पडून वाळतात. नंतर रोप मरते.
- दमट आणि उबदार हवामानात रोगाच्या बुरशीची वाढ झपाट्याने होते.
- कुजलेल्या रोपाचा भाग, रोपवाटिकेतील रोप आणि कांदा या मार्फत हा रोग पसरतो.
2) तपकिरी करपा:
स्टेम्फीलीयम करप्यालाच तपकिरी करपा रोग म्हणून ओळखले जाते व रब्बी हंगामात या करप्याचा प्रादुर्भाव दिसून येतो.
रोगकारक बुरशी: स्टेमफीलीयम व्हेसिकॅरीयम
लक्षणे:
- रोगाचा प्रादुर्भाव कांदा पिकावर तसेच बियाण्याच्या पिकावर होतो.
- पानाच्या बाहेरील भागावर पिवळसर, तपकिरी रंगाचे लांबट चट्टे दिसून येतात. चट्ट्यांचा आकार वाढत जाऊन पाने सुकू लागतात.
- फुलांच्या दांड्यावर प्रादुर्भाव झाल्यास दांडे मऊ होऊन वाकून मोडतात.
3) जांभळा करपा:
अल्टरनेरिया करप्यालाच जांभळा करपा रोग असे म्हणतात. खरीप हंगामातील दमट, ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे या प्रकारच्या करपा रोगाचा प्रादुर्भाव कांदा पिकावर मोठ्या प्रमाणावर होतो.
रोगकारक बुरशी: अल्टरनेरिया पोराय
लक्षणे:
- या प्रकारामध्ये सुरुवातीला कांद्याच्या पातीवर लहान, खोलगट असे पांढरे चट्टे पडतात व ही सुरुवात प्रथम शेंड्याकडून होते व खालच्या भागाकडे सरकत जाते.
- या चट्ट्याचा मधील भाग जांभळट लालसर रंगाचा होतो आणि कडा पिवळसर दिसायला लागतात. हवामान जर दमट असले तर या प्रकारचा करपा मोठ्या प्रमाणावर वाढतो व चट्याच्या ठिकाणी तपकीरी किंवा काळपट बुरशीची वाढ व्हायला लागते. त्यामुळे पात शेंड्याकडून जळु लागते.
- तसेच बीजोत्पादनासाठी जर कांदे लावले असेल तर अशा प्रकारच्या लावलेल्या कांद्याच्या पातीवर हा रोग आला तर याची सुरुवात दांड्यावर होते व गोंड्यात बी भरत नाही व दांडे खाली कोलमडतात.
- आधी सुरुवातीला जर हा रोग आला तर पात जळते व पिकाची वाढ होत नाही व कांदा न पोसल्यामुळे चिंगळी कांद्याचे प्रमाण वाढते.
- जेव्हा कांदा पोसत असतो तेव्हा जर हा रोग आला तर बुरशीचा प्रादुर्भाव थेट कांद्यापर्यंत पसरतो व त्यामुळे कांदा सडायला लागतो व असा कांदा चाळीत देखील टिकत नाही.
नियंत्रणाचे उपाय (प्रतिलिटर पाणी):
- मॅन्कोझेब 75% डब्ल्यूजी (देहात:DEM-45) 3 ग्रॅम किंवा
- कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यू पी (इफको-यामाटो) 1 ग्रॅम किंवा
- हेक्झाकोनॅझोल 5% इसी (टाटारॅलिस-कॉन्टाफ) 1 मिलि किंवा
- क्लोरोथॅलोनील 75% WP (सिजेंटा-कवच) 2.5 ग्रॅम किंवा
- पाइराक्लोस्ट्रोबिन 5% + मेतिराम 55% (पीआय इंडस्ट्रीज-क्लच) (संयुक्त बुरशीनाशक) 1 ग्रॅम फवारणी करावी.
- 10 ते 15 दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून फवारणी करावी.
- पिकांची फेरपालट करावी.
तुमच्या कांद्याच्या पिकात वरील पैकी कोणता करपा रोग झालेला? तुम्ही कशाप्रकारे नियंत्रण मिळवले? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. कांद्याची लागवड कधी करावी?
महाराष्ट्रात कांद्याची लागवड खरीप हंगामात जून -ऑगस्ट, रब्बी हंगामात सप्टेंबर -ऑक्टोबर आणि उन्हाळी हंगामात नोव्हेंबर - डिसेंबर या महिन्यात करतात.
2. कांदा बियाणे किती दिवसात उगवते?
कांद्याचे बियाणे 7 ते 8 दिवसात उगवते.
3. कांदा किती दिवसात तयार होतो?
कांद्याला बियाण्यापासून परिपक्व होण्यासाठी 90-100 दिवस लागतात, जे सुमारे चार महिने असतात. सेटमधून, कांदे सुमारे 80 दिवसांनी किंवा फक्त तीन महिन्यांच्या आत काढणीसाठी तयार होतात.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
![Get free advice from a crop doctor](/_next/image?url=%2F_next%2Fstatic%2Fmedia%2Fget-help.47979653.webp&w=384&q=75)
Get free advice from a crop doctor
![download_app](/_next/image?url=%2F_next%2Fstatic%2Fmedia%2Fdownload-app-bannerv2.c11782c9.webp&w=1920&q=75)