दूध उत्पादनाला दमदार 'पंढरपुरी म्हैस' ('Pandharpuri buffalo' is strong for Milk production)
नमस्कार पशुपालकांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे.
म्हशीचा विकास आणि उत्पत्ती ही आशिया खंडातील आहे. त्यामुळे जगातील एकूण म्हशींपैकी 95 टक्के पेक्षा जास्त म्हशी आशिया खंडात आढळतात. त्यांचा एकूण दूध उत्पादनातील वाटा 55 ते 57 टक्के आहे. म्हशीचे वर्गीकरण करताना चिखलात लोळणाऱ्या (Swamp Buffalo) आणि पाण्यात डुंबणाऱ्या (Water Buffalo) अशा दोन वर्गात प्रामुख्याने केले जाते. इंडोनेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, चीन आणि मलेशिया या देशातील म्हशी या दलदलीच्या ठिकाणी चिखलात लोळणाऱ्या म्हशी म्हणून ओळखल्या जातात. आपल्या देशातील सोबत श्रीलंका, नेपाळ, पाकिस्तान आणि बांगलादेशातील बऱ्यापैकी दूध देणाऱ्या म्हशी या पाण्यात डुंबणाऱ्या सदरात मोडतात. आपल्या देशात एकूण 20 मान्यता प्राप्त म्हशीच्या प्रजाती आहेत. इतर अनेक म्हशीच्या प्रजाती या स्थानिक भागात आढळतात.
मान्यता प्राप्त म्हशींमध्ये उत्तर भारतात मुर्दाड, निलीरावी, भदावरी, पश्चिम भारतामध्ये जाफराबादी, सुरती, मेहसाणा मध्य भारतात नागपुरी, पंढरपुरी, मराठवाडी, जेरांगी, कालाहंडी, संबळपूर आणि दक्षिण भारतामध्ये तोडा, साउथ कॅनरा, गोदावरी या प्रजातींचा समावेश आहे. महाराष्ट्रामध्ये पूर्णाथडी, पंढरपुरी, मराठवाडी, नागपुरी यासह मुहा, मेहसाणा, सुरती, जाफराबादी या प्रजाती दिसतात. आजच्या या भागात आपण यापैकी विशेष अशा चाऱ्याचा खर्च कमी असूनही दूध उत्पादनात दमदार 'पंढरपुरी म्हशी' विषयी जाणून घेणार आहोत.
पंढरपुरी म्हशीची वैशिष्टे:
- साधारण 150 वर्षांपासून पंढरपूर भागातील गवळी समाज पंढरपुरी म्हैस सांभाळत आहे.
- साधारण कोरड्या हवामानास अनुकूल व जादा दूध देणारी ही स्थानिक जात आहे.
- 16 ते 47 अंश सेल्सिअस तापमानात तग धरणारी आणि कमी पर्जन्यमान असलेल्या भागात होत असलेल्या ज्वारी, बाजरी, मका या पिकाच्या चाऱ्यावर जादा दूध उत्पादन देणारी ही म्हैस आहे.
- ही प्रजाती सोलापूरसह सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात दिसते.
- पंढरपुरी म्हैस आकाराने मध्यम असून चेहरा लांबट व निमुळता असतो. रंग काळा असून काही वेळा राखाडी देखील आढळतो.
- शिंगे लांब खांद्याच्या पलीकडे तलवारीच्या आकाराची असतात.
- सरासरी लांबी 100 सेंटीमीटर पर्यंत आढळते. कानाची लांबी 19 ते 24 सेंटीमीटरपर्यंत असते.
- कास पोटाला चिकटलेली, सड लंबगोलाकार असतात.
- कास देखील फिकट काळसर रंगाची असते, ठेवण देखील उत्तम असते.
- प्रौढ म्हशीचे वजन 380 ते 400 किलो आणि रेड्याचे वजन 450 ते 500 किलोपर्यंत असते.
- रेड्या 30 ते 35 महिन्यात माजावर येतात आणि 43 ते 46 महिन्यात वितात. पुढे 3 ते 3.5 महिन्यात पुन्हा गाभण जातात.
- कमी व निकृष्ट चाऱ्यावर चांगले दूध देतात. निकृष्ट वाळलेल्या वैरणीवर देखील दूध उत्पादनामध्ये खंड पडत नाही.
- दूध काढण्याच्या सवयी बाबत फार काटेकोर नाहीत. त्यासाठीच कोल्हापूर शहरात दूध कट्ट्यावर त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. घरातील कोणीही दूध काढू शकते.
- काटक व रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्याने आजारी पडत नाहीत. पडल्यास तत्काळ उपचाराने बऱ्या होतात.
- कृत्रिम रेतनाच्या माध्यमातून गर्भधारणेचे प्रमाण देखील खूप चांगले आहे. उत्तम व्यवस्थापन ठेवल्यास दिवसाला 12 ते 15 लिटर दूध देण्याची क्षमता आहे.
तुम्ही 'पंढरपुरी म्हशीचे' पालन करता का? तुम्हाला 'पंढरपुरी म्हशी' विषयी काय माहिती आहे? याविषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. म्हशीचे वर्गीकरण कोणत्या दोन वर्गात केले जाते?
म्हशीचे वर्गीकरण करताना चिखलात लोळणाऱ्या (Swamp Buffalo) आणि पाण्यात डुंबणाऱ्या (Water Buffalo) अशा दोन वर्गात प्रामुख्याने केले जाते.
2. महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त म्हशी कोणत्या?
महाराष्ट्रातील पूर्णाथडी, पंढरपुरी, मराठवाडी, नागपुरी यासह मुहा, मेहसाणा, सुरती, जाफराबादी या मान्यताप्राप्त म्हशी आहेत.
3. पंढरपुरी म्हैस ही प्रजाती मुख्यतः कोणत्या जिल्ह्यात आढळते?
पंढरपुरी म्हैस ही प्रजाती सोलापूरसह सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आढळते.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor