तपशील
ऐका
डाळिंब
फलोत्पादन
कृषी ज्ञान
बागायती पिके
DeHaat Channel
1 July
Follow

डाळिंबाची आधुनिक लागवड (Pomegranate Cultivation Method)

नमस्कार शेतकरी मित्रहो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

डाळिंब हे भारतातील एक महत्त्वाचे फळ पीक आहे. डाळींबाची लागवड फार प्राचीन काळापासून म्‍हणजे इ.स. पुर्व 3500 वर्षापूर्वी झाल्‍याचा उल्‍लेख आढळून येतो; डाळींबाचे उगमस्‍थान इराण आहे. डाळिंबाच्या लागवडीत भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. भारतात, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू राजस्थान ही प्रमुख डाळिंब उत्पादक राज्ये आहेत. महाराष्ट्रात रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड सुरु होण्‍यापूर्वी सन 1989-90 मध्‍ये डाळिंब पिकाखाली 7700 हेक्‍टर क्षेत्र होते. डाळिंब पिकाची लागवड अहमदनगर, पुणे, सांगली, सोलापूर, वाशिम या जिल्ह्यात प्रामुख्‍याने होत असून इतर जिल्ह्यातही मोठया प्रमाणावर होत आहे. सद्यस्थितीत महाराष्‍ट्रामध्‍ये डाळिंब पिकाखाली 73027 हेक्‍टर क्षेत्र असून त्‍यापैकी सुमारे 41000 हेक्‍टर क्षेत्र उत्‍पादनाखाली आहे. अवर्षण प्रवण भागामध्‍ये हलक्‍या जमिनीत व कमी  पावसावर तग धरणारे हे झाड असल्यामुळे या पिकाच्‍या लागवडीखालील क्षेत्रात मोठी वाढ होत आहे. म्हणूनच आजच्या या भागात आपण या पिकाच्या लागवडीविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

हवामान (Climate):

  • डाळींबाचे पिकास थंड व कोरडे हवामान उपयुक्‍त आहे.
  • उन्‍हाळयातील कडक ऊन आणि कोरडी हवा तसेच हिवाळयातील कडक थंडी डाळिंबाच्‍या वाढीस योग्‍य असते.
  • फुले लागल्‍यापासून फळे होईपर्यंतच्‍या काळात भरपूर उन व कोरडे हवामान असल्‍यास चांगल्‍या प्रकारची गोड फळे तयार होतात.
  • कमी पावसाच्‍या प्रदेशात जेथे थोडीफार ओलीताची सोय आहे तेथे डाळींबाच्‍या लागवडीस भरपूर वाव आहे.

जमीन (Soil):

  • डाळिंबाचे पिक कोणत्‍याही जमिनीत घेता येते.
  • अगदी निकस, निकृष्‍ठ जमिनीपासून भारी, मध्‍यम काळी व सुपीक जमिन डाळींबाच्‍या लागवडीसाठी चांगली असते, मात्र पाण्‍याचा चांगला निचरा होणारी गाळाची किंवा पोयटयाची जमीन निवडल्‍यास उत्‍पन्‍न चांगले मिळते.
  • त्‍याचप्रमाणे हलक्‍या, मुरमाड माळरान किंवा डोंगर उताराच्‍या जमिनीसुध्‍दा या पिकाला चालतात. मात्र जमिनीत पाण्‍याचा निचरा होणे आवश्‍यक आहे.
  • चुनखडी आणि थोडया विम्‍लतायुक्‍त (अल्‍कलाईन) जमिनीतही डाळिंबाचे पीक येऊ शकते.
  • डाळिंब शेतीसाठी 6.5 ते 7.5 दरम्यान पीएच श्रेणी असलेली माती आदर्श आहे

डाळिंबाच्या जाती:

  • फुले भगवा सुपर
  • भगवा
  • आरक्ता
  • मृदुला
  • सोलापूर-६

लागवड पद्धती:

  • डाळिंब लागवडिकरिता निवडलेली जमिन उन्‍हाळयामध्‍ये 2 ते 3 वेळेस उभी आडवी नांगरटी करुन कुळवून सपाट करावी.
  • खड्डा तयार करणे आणि लागवड करणे (Pit Preparation And Planting)
  • 90 दिवस जुनी डाळिंबाची रोपे खड्ड्यांमध्ये मुख्य शेतात लावण्यासाठी वापरली जातात.
  • 60 सेमी x 6o सेमी x 60 आकाराचा खड्डा तयार केला जातो.
  • रोपांमधील अंतर 4.5 X 3.0 मीटर आणि ओळींमधील 3.9 ते 4.5 मीटर ठेवावे.
  • पावसाळ्यात शेणखत (10 किलो), सिंगल सुपरफॉस्फेट (500 ग्रॅम), निंबोळी पेंड (1 किलो) यांनी खड्डे भरावेत.
  • डाळिंब लागवडीसाठी योग्य वेळ म्हणजे पावसाळ्यात (जुलै-ऑगस्ट) जेव्हा झाडांच्या योग्य वाढीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा उपलब्ध असतो.
  • सर्वसाधारणपणे डाळिंबाची लागवड ही पावसाळयात करावी.
  • डाळिंबाची तयार केलेली कलमे प्रत्‍येक खडयात एक याप्रमाणे लावावीत.
  • कलमाच्‍या आधारासाठी शेजारी काठी पुरुन आधार द्यावा.
  • कलम लावल्‍यानंतर त्याला बेताचे पाणी द्यावे.
  • लागवडीनंतर सुरुवातीच्‍या काळात आवश्‍यकतेनुसार पाणी द्यावे.
  • एकरी 296 झाडांची लागवड करावी.

डाळिंब शेतीमध्ये खत व्यवस्थापन (Fertilizer Management In Pomegranate Farming):

  • कमी सुपीक जमिनीतही डाळिंबाची लागवड करता येते. तरीही फळांच्या चांगल्या उत्पादनासाठी आणि दर्जेदारपणासाठी रासायनिक खतांचा शिफारशीत डोस खड्ड्यात टाकावा.
  • खत आणि खतांचा डोस जमिनीच्या सुपीकतेच्या प्रकारानुसार, व प्रदेशानुसार बदलतो.
  • उत्तम वाढ आणि विकासासाठी रासायनिक खते खालील शिफारशींनुसार द्यावीत.
  • शेणखत 50-60 किलो
  • युरिया एका वर्षाच्या वनस्पतीसाठी 10-20 ग्रॅम तर पाच वर्ष आणि त्यावरील वनस्पतींसाठी 50-60 ग्रॅम द्यावे.
  • एसएसपी एका वर्षाच्या वनस्पतीसाठी 150-300 ग्रॅम तर पाच वर्ष आणि त्यावरील वनस्पतींसाठी 900-1200 ग्रॅम द्यावे.
  • एमओपी एका वर्षाच्या वनस्पतीसाठी 90-120 ग्रॅम तर पाच वर्ष आणि त्यावरील वनस्पतींसाठी 150-200 ग्रॅम द्यावे.
  • आंबे बहार खते डिसेंबरमध्ये आणि मृग बहार फळांसाठी मे महिन्यात खते द्यावीत.

पाणी व्यवस्थापन:

  • डाळींब पिकास फुले येण्‍यास सुरुवात झााल्‍यानंतर फळे उतरुन घेईपर्यंतच्‍या काळात नियमित व पुरेसे पाणी देणे महत्‍वाचे आहे.
  • पाणी देण्‍यात अनियमितपणा झाल्‍यास फुलांची गळ होण्‍याची शक्‍यता असते.
  • फळांची वाढ होत असतांना पाण्‍याचा ताण पडून नंतर एकदम भरपूर पाणी दिल्‍यास फळांना तडे पडतात व प्रसंगी अशी न पिकलेली फळे गळतात.
  • पावसाळयात पाऊस न पडल्‍यास जरुरीप्रमाणे पाणी द्यावे व पुढे फळे निघेपर्यंत 8 ते 10 दिवसांच्‍या अंतराने पाण्‍याची पाळी द्यावी.
  • फळाची तोडणी संपल्‍यानंतर बागांचे पाणी तोडावे.

बहार धरणे:

  • डाळींबाच्‍या झाडास तीन बहार येतात.
  • आंबिया बहार. मृग बहार, हस्‍तबहार यापैकी कोणत्‍याही एका बहाराची फळे घेणे फायदेशिर असते.
  • आंबियाबहार धरणे अधिक चांगले कारण फळांची वाढ होताना व फळे तयार होताना हवा उष्‍ण व कोरडी राहते. त्‍यामुळे फळास गोडी येते.
  • फळांवर किडीचा व रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो.
  • पाण्‍याची कमतरता असल्‍यास मृगबहार धरावा.
  • आंबिया बहार जानेवारी-फेब्रूवारी कालावधीत येतो तर या बहाराची फळे जून-ऑगस्‍ट मध्ये तयार होतात.
  • मृग बहार जून-जूलै कालावधीत येतो तर या बहाराची फळे नोव्हेंबर-जानेवारी मध्ये तयार होतात.
  • हस्‍तबहार सप्टेंबर-ऑक्टोबर कालावधीत येतो तर या बहाराची फळे फेब्रूवारी-एप्रिल मध्ये तयार होतात.
  • बहार धरतांना पाणी देण्‍यापूर्वी एक महिना अगोदर बाग नांगरुन घ्‍यावी किंवा खणून घ्‍यावी.
  • तुम्हाला बहारा विषयीची अधिक माहिती आमच्या इतर लेखात मिळेल.

फळांची तोडणी:

  • डाळींबाचे फळ तयार होण्‍यास फूले लागण्‍यापासून साधारणतः 6 महिने लागतात.
  • आंबिया बहाराची फळे जून ते ऑगस्‍ट मध्‍ये मृगबहाराची फळे नोव्हेंबर ते जानेवारीमध्‍ये आणि हस्‍तबहाराची फळे फेब्रूवारी ते एप्रिल मध्‍ये तयार होतात.
  • फळांची साल पिवळसर करडया रंगाची झाली म्‍हणजे फळ तयार झाले असे समजावे व फळाची तोडणी करावी.
  • डाळिंब या पिकावर फळे पोखरणारी आळी (सुरसा) साल पोखरणारी आळी, लाल कोळी, देवी किंवा खवले किड या किडीचा व फळावरील ठिपके फळकुज (फ्रूट रॉट) या रोगाचा प्रादुर्भाव कमी / अधिक प्रमाणात आढळून येतो.
  • डाळिंब बागायतदारासाठी हा एक चिंतेचा विषय बनलेला आहे.
  • राज्‍यात सांगोला, पंढरपूर, बारामती, जत, सटाणा, मालेगांव, देवळा या तालुक्‍यात या रोगाचे प्रमाण अधिक आहे.

अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य हवामानानुसार डाळिंबाची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या डाळिंब पिकाच्या लागवडीकरता कोणते तंत्र वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “बागायती पिके” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. डाळिंब पिकास कोणते हवामान उपयुक्त आहे?

डाळींब पिकास थंड व कोरडे हवामान उपयुक्‍त आहे.

2. डाळिंबाचे पीक कोणत्या जमिनीत घेता येते?

डाळिंबाचे पिक कोणत्‍याही जमिनीत घेता येते.

3. डाळिंब पिकात कोणती आंतरपिके घेता येतात?

डाळिंबाच्या लागवडीनंतर सुरुवातीची दोन वर्षे बागेत दोन ओळींमध्‍ये कांदा, काकडी, मुग, चवळी, सोयाबिन यासारखी कमी उंच वाढणारी पिके आंतरपिके म्‍हणून घेता येतात.

78 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor