मुळा लागवड (Radish Cultivation)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
मुळा हे थंड हवामानातील पीक असून, मूळवर्गीय पिकांमध्ये मुळा हे एक महत्त्वाचे पीक आहे. मुळा पिकाची लागवड प्रामुख्याने रब्बी हंगामात केली जाते. परंतु उष्ण हवामानात चांगल्या वाढू शकणाऱ्या मुळ्याच्या जाती विकसित करण्यात आल्यामुळे मुळ्याचे पीक जवळजवळ वर्षभर घेता येते. मुळ्याची लागवड उत्तर भारतातील मैदानी प्रदेश तसेच दक्षिण भारतात आणि थंड हवेच्या डोंगराळ भागातही केली जाते. महाराष्ट्रात निरनिराळ्या भागांत स्वतंत्रपणे अथवा मिश्रपीक म्हणून मुळा लागवड केली जाते. नाशिक, पुणे भागात मुळा लागवड वर्षभर होते. चला तर मग आजच्या भागात जाणून घेऊया मुळा लागवडीविषयी सर्व काही.
मुळा पिकासाठी योग्य हवामान:
- मुळा हे प्रामुख्याने थंड हवामानातील पीक आहे.
- मुळ्याची वाढ 20 ते 25 अंश सेल्सिअस तापमानाला झपाट्याने होते. परंतु चांगला स्वाद आणि कमी तिखटपणा येण्यासाठी मुळ्याच्या वाढीच्या काळात 15 ते 20 अंश सेल्सिअस तापमान असावे लागते.
- मुळ्याच्या वाढीच्या काळात तापमान जास्त झाल्यास मुळा लवकर जून होतो आणि त्याचा तिखटपणाही वाढतो.
मुळा पिकासाठी योग्य जमीन:
- चांगली वाढ होण्यासाठी मुळा लागवडीकरिता निवडलेली जमीन भुसभुशीत असावी.
- भारी जमिनीची चांगली मशागत करावी अन्यथा मुळ्याचा आकार वेडावाकडा होतो आणि त्यावर असंख्य तंतुमुळे येतात. अशा मुळ्याला बाजारात मागणी नसते.
- मुळ्याची लागवड अनेक प्रकारच्या जमिनीत करता येत असली तरी मध्यम ते खोल भुसभुशीत अथवा रेताड जमिनीत मुळा चांगला पोसतो.
- चोपण जमिनीत मुळ्याची लागवड करू नये.
मुळा लागवडीसाठी जाती:
- पुसा हिमानी
- पुसा देशी
- पुसा चेतकी
- पुसा रेशमी
- जपानीज व्हाईट
- गणेश सिथेटिंग
हंगाम:
- महाराष्ट्रात मुळा लागवड वर्षभर करता येते. परंतु मुळयाची व्यापारी लागवड प्रामुख्याने रब्बी हंगामात केली जाते.
- रब्बी हंगामासाठी सप्टेंबर ते जानेवारी या कालावधीत बियांची पेरणी करावी.
- उन्हाळी हंगामासाठी मार्च-एप्रिल महिन्यात तर खरीप हंगामासाठी जून ते ऑगस्ट महिन्यात बियांची पेरणी करावी.
मुळा लागवडीसाठी ठेवायचे योग्य अंतर:
मुळा लागवड करताना दोन ओळीतील अंतर 30 ते 45 सेमी आणि दोन रोपांमधील अंतर 8 ते 10 सेमी ठेवावे.
लागवड:
- मुळ्याची लागवड सपाट वाफ्यात किंवा सरी-वरंब्यावर केली जाते. दोन वरंब्यांमधील अंतर मुळ्याच्या जातीवर अवलंबून असते.
- युरोपीय जातींसाठी हे अंतर 30 सेंटिमीटर ठेवतात; तर आशियाई जातींकरिता 45 सेंटिमीटर अंतर ठेवतात.
- वरंब्यावर 8 सेंटिमीटर अंतरावर 2-3 बिया टोकून पेरणी करावी.
- पेरणीपूर्वी बी युरिया फॉस्फेट आणि जिबरेलिक ॲसिड यांच्या 30 पीपीएम द्रावणात बुडवून लावल्यास उगवण लवकर व एकसारखी होते व मुळांची लांबी वाढून उत्पादन वाढते.
- सपाट वाफ्यात 15 x 15 सेंटिमीटर अंतरावर लागवड करतात. बियाण्यांची पेरणी 2 ते 3 सेंटिमीटर खोलीवर करावी.
खतांचे प्रमाण:
- मुळ्याचे पीक कमी कालावधीत तयार होणारे असल्यामुळे जास्त उत्पादन मिळण्यासाठी या पिकाला खते वेळेवर द्यावीत.
- जमिनीची मशागत करताना चांगले कुजलेले शेणखत 10 टन दर एकरी जमिनीत मिसळून द्यावे.
- मुळ्याच्या पिकाला दर एकरी 40 किलो नत्र, 20 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाश द्यावे.
- स्फुरद आणि पालाश यांची पूर्ण मात्रा आणि नत्राची अर्धी मात्रा पेरणीपूर्वी द्यावी.
- नत्राची उरलेली अर्धी मात्रा ही बी उगवून आल्यावर म्हणजेच पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी द्यावी.
पाणी व्यवस्थापन:
- मुळा पिकाच्या वाढीसाठी जमिनीत सतत ओलावा असणे आवश्यक असते.
- कोरड्या जमिनीत मुळा पेरणी करू नये.
- बियांची पेरणी केल्यानंतर लगेच हलके पाणी द्यावे. यानंतर जमीन, हवामान, पिकाच्या वाढीची अवस्था यांचा विचार करून पाण्याच्या पाळ्यांतील अंतर ठरवावे. उन्हाळी हंगामात 4 ते 5 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
आंतरमशागत:
- मुळा लागवड कमी अंतरावर करतात; म्हणून जमिनीची मशागत चांगली करणे आवश्यक आहे.
- पीक कमी कालावधीत तयार होणारे असल्यामुळे सुरुवातीच्या काळात पिकात खुरप्याच्या साहाय्याने निंदणी वेळेवर करून पीक तणरहित ठेवावे.
- साधारणपणे दोन निंदण्या कराव्यात. एक खोदणी आणि एक निंदणी सुरुवातीच्या काळात करावी.
किडी आणि रोग:
- काळी अळी (मस्टर्ड सॉ फ्लाय)
- मावा
- करपा
काढणी उत्पादन आणि विक्री:
- मुळा लागवड केल्यानंतर जातीनुसार 40 ते 55 दिवसांनी मुळे काढणीसाठी तयार होतात.
- मुळे नाजूक आणि कोवळे असतानाच मुळयांची काढणी करावी.
- मुळा जास्त दिवस जमिनीत राहिल्यास कडसर, तिखट आणि जरड होतो, मुळयाला गाभा रवाळ होऊन भेगा पडतात.
- मुळा काढण्यापूर्वी शेताला पाणी द्यावे आणि हाताने मुळे उपटून काढावेत. नंतर त्यावरील माती काढून मुळे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत.
- किडलेले, रोगट मुळे वेगळे काढावेत.
- मुळे पाल्यासह काढून विक्रीसाठी पाठवितात.
- पाने आणि मुळे यांना इजा होवू नये म्हणून टोपलीत किंवा खोक्यात व्यवस्थित रचून विक्रीसाठी पाठवावेत.
- मुळयाचे उत्पादन हे मुळयाची जात आणि लागवडीचा हंगाम यावर अवलंबून असते.
- साधारणपणे रब्बी हंगामात मुळयाचे दर एकरी 4 ते 8 टन उत्पादन मिळते.
अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य हवामानानुसार मुळा लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या मुळा पिकाच्या लागवडीकरता कोणते तंत्र वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. मुळा लागवडीसाठी कोणते हवामान योग्य आहे?
मुळा हे प्रामुख्याने थंड हवामानातील पीक आहे. मुळ्याची वाढ 20 ते 25 अंश सेल्सिअस तापमानात झपाट्याने होते.
2. मुळा लागवडीसाठी योग्य जमीन कोणती?
मुळा पिकची वाढ चांगली होण्यासाठी मुळा लागवडीकरिता निवडलेली जमीन भुसभुशीत असावी.
3. मुळा पिकाची लागवड महाराष्ट्रात कुठे केली जाते?
महाराष्ट्रात निरनिराळ्या भागांत स्वतंत्रपणे अथवा मिश्रपीक म्हणून मुळा लागवड केली जाते. नाशिक, पुणे भागात मुळा लागवड वर्षभर होते.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor