कोंबड्यांचे नियमित व्यवस्थापन (Regular management of Chickens)
नमस्कार पशुपालकांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
हिवाळ्यात बऱ्याच वेळेस पिण्याच्या पाण्याचे तापमान कमी असल्यामुळे कोंबड्यांचे पाणी पिण्याचे प्रमाण घटते. कोंबड्यांच्या खाद्य सेवनाच्या प्रमाणात पाणी पिण्याचे प्रमाण असणे आवश्यक आहे. साधारणतः योग्य तापमानात कोंबड्या खाद्याच्या दुप्पट पाणी पितात. परंतु हे पाणी पिण्याचे प्रमाण घटल्यास मूत्रपिंडात युरिक अॅसिडचे घनीकरण होते आणि असे युरिक अॅसिड मूत्रपिंड आणि मूत्रवाहिन्यांमध्ये साठून राहते. कोंबड्यांना गाऊट होतो, त्यांचा मृत्यू होतो. पाणी कमी प्यायल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी (डिहायड्रेशन) होते. म्हणून हिवाळ्यामध्ये कोंबड्यांना कोमटपाणी द्यावे. त्यामुळे कोंबड्यांचे पाणी पिण्याचे प्रमाण वाढेल. एक लहान ड्रिंकर प्रती ४० पिल्लांना तर एक मोठा ड्रिंकर प्रति ३० मोठ्या कोंबड्यांसाठी वापरावा. ड्रिंकरची उंची कोंबडीच्या पाठीच्या दोन इंच वर असावी. कोंबड्यांना नेहमी स्वच्छ व निर्जंतुक पाणी द्यावे. मुबलक प्रमाणात पाणी मिळेल अशी व्यवस्था करावी.
लिटर (गादी) व्यवस्थापन:
- हिवाळ्यात लिटर (गादी) ओलसर राहते. याचे मुख्य कारण म्हणजे हिवाळ्यात लिटरमधील आर्द्रतेचे (पाण्याचे) बाष्पीभवन होत नाही.
- अति थंडीमध्ये हवेतील आर्द्रता वाढते. घरट्यातील ओलसरपणामुळे जिवाणू, बुरशी, कॉक्सिडिया यांसारख्या आरोग्यास घातक ठरणाऱ्या जंतूंची वाढ होऊन कोंबड्यांना आजार होतात.
- हिवाळ्यामध्ये शेडमध्ये लिटरचे गोळे होण्यामागे प्रामुख्याने हवेतील आर्द्रता वाढणे, गादीमध्ये पाणी सांडणे, पाण्याचे पाईप फुटलेले असणे त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये कोंबड्यांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी शेडचे पडदे अधिक काळ बंद ठेवणे, शेडमधील वातावरणाचे वायुविजन न झाल्यामुळे देखील लिटर ओले होते.
- लिटरची योग्य पद्धतीने जाडी आवश्यकतेनुसार न ठेवणे तसेच लिटरसाठीच्या तुसाची योग्य निवड न करणे इत्यादी चुकीच्या व्यवस्थापनामुळे देखील लिटर ओले होऊन समस्या निर्माण होतात. म्हणून हिवाळ्यामध्ये लिटर खाली-वर करावे.
- ओले लिटर काढून टाकावे, लिटरमध्ये गोळे झाल्यास असे लिटर बदलणे अत्यंत आवश्यक असते.
आजाराचे नियंत्रण:
- हिवाळ्यात कोंबड्यांना ताण येतो, त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. तसेच शेडमधील अमोनियाचे प्रमाण, गादीचे अयोग्य नियोजन, ब्रूडिंग कालावधीत अयोग्य व्यवस्थापन, खाद्याची खराब प्रत अशा अनेक कारणांमुळे आजारांचा प्रादुर्भाव होतो.
- हिवाळ्यात कोंबड्यांना श्वसनाचे आजार होतात. मुख्यतः इन्फेक्सिअस कोरायझा, क्रॉनिक रेस्पायरेटरी डिसीज (सीआरडी) यांसारखे जिवाणूजन्य आणि अस्परजिलोसिससारखा बुरशीजन्य आणि रक्ती हगवण यांसारखे आदी जीवजन्य आजार होतात.
- वेळोवेळी कोंबड्यांची लक्षणे पाहणे, निदान करणे, मृत कोंबडीचे शव विच्छेदन करणे. वेळेत पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषधोपचार करणे योग्य ठरते. अन्यथा मरतूक वाढून नुकसान होते.
- पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करणे, रोगप्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे देणे, लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. फार्मची जैवसुरक्षा राखणे हा उत्तम पर्याय आहे.
ब्रॉयलर शेडमधील नियोजन:
- नियमितपणे पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ धुवावीत. त्यानंतर धुतलेल्या भांड्यात पाणी भरून ठेवावे. भांडी धुतान त्यावर चढलेला चिकट थर व्यवस्थित धुऊन काढावा.
- स्वच्छ पाण्याचा कोंबड्यांना पुरवठा करावा.
- कोंबड्यांना लागणारी जागा त्यांच्या वाढीनुसार वाढवून द्यावी. कमी जागेमुळे वाढ खुंटते.
- लिटर वेळोवेळी ओली झाल्यास त्वरित ती बाहेर काढून त्या ठिकाणी कोरडे व स्वच्छ तूस टाकावे. वेळोवेळी लिटर खाली वर करून घ्यावी, त्यामुळे शेडमधील अमोनियाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
- खाद्याची भांडी पूर्णपणे भरू नयेत. भांड्यामध्ये दोन-तृतीयांश एवढे खाद्य भरावे. त्यामुळे वाया जाणाऱ्या खाद्यावर नियंत्रण राहते.
- दिवसातून तीन ते चार वेळा खाद्य विभागून कोंबड्यांना द्यावे. त्यामुळे कोंबड्यांचे खाद्य खाण्याचे प्रमाण वाढते. खाद्य साठवून ठेवताना ओलसर व दमट जागी साठवून ठेवू नये. त्यामुळे खाद्यामध्ये बुरशी पसरण्याची दाट शक्यता असते.
- अधूनमधून खाद्याची भांडी बुरशीसाठी तपासून घ्यावीत.
- भांड्यांमध्ये बुरशी आढळून आल्यास ती स्वच्छ धुवावीत. उन्हामध्ये पूर्णपणे वाळवून वापरावीत.
- पिल्ले किंवा कोंबडीची मरतूक झाली असल्यास त्यांना लगेच बाजूला करून रोग निदानासाठी जवळील प्रयोगशाळेमध्ये दाखल करावे.
- शेडमध्ये आजारी पक्षी आढळून आल्यास लगेच बाजूला ठेवून त्वरित उपचार करावेत.
- मृत कोंबड्या उघड्यावर कधीही टाकू नये. त्यांची जाळून विल्हेवाट लावावी, अन्यथा रोग पसरण्याची शक्यता असते.
- कोंबड्यांच्या लसीकरणाचा कार्यक्रम काटेकोरपणे पाळावा. लसीकरण अथवा हाताळणी केल्यावर त्यांच्यावरील ताण कमी करणारी औषधे पाण्यामधून द्यावीत.
- अधूनमधून शेडमधील कोंबड्यांना हलवावे. त्यामुळे त्या नव्या उमेदीने खाद्य खातात. त्यांच्या विक्रीच्या वजनात वाढ होण्यास मदत होते.
- वेळोवेळी शेडला लावलेले पडदे वर करावेत, त्यामुळे शेडमध्ये हवा खेळती राहण्यास मदत होते.
तुम्ही तुमच्या कोंबड्यांचे व्यवस्थापन कसे करता? याविषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. हिवाळ्यात लिटर (गादी) ओलसर राहण्याचे मुख्य कारण काय?
हिवाळ्यात लिटर (गादी) ओलसर राहण्याचे मुख्य कारण म्हणजे हिवाळ्यात लिटरमधील आर्द्रतेचे (पाण्याचे) बाष्पीभवन होत नाही.
2. योग्य तापमानात कोंबड्या किती पाणी पितात?
साधारणतः योग्य तापमानात कोंबड्या खाद्याच्या दुप्पट पाणी पितात.
3. कोंबड्यांसाठी कोणता ड्रिंकर वापरावा?
एक लहान ड्रिंकर प्रती ४० पिल्लांना तर एक मोठा ड्रिंकर प्रति ३० मोठ्या कोंबड्यांसाठी वापरावा. ड्रिंकरची उंची कोंबडीच्या पाठीच्या दोन इंच वर असावी.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor