भात: रोपवाटिकेत आढळणारे प्रमुख रोग व किडींचे नियंत्रण (Rice: Control of Major Diseases and Pests in Nursery)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
आपल्या देशातील सुमारे 65 टक्के लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश असतो. मानवी शरीरास पोषक अशा बऱ्याच अन्नघटकांचा पुरवठा हा भातातून होत असतो. तसेच इतर पिकांच्या तुलनेत पशु-पक्ष्यांचे खाद्य व औद्योगिकदृष्ट्या देखील भाताचे अनेक उपयोग होतात. त्यामुळे भात हे बहुगुणी तृणधान्य पीक म्हणून ओळखले जाते. भारतातील एकूण भात लागवडीपैकी जवळ - जवळ 35 टक्के क्षेत्र हे महाराष्ट्र राज्यात आहे तसेच एकूण तृणधान्य उत्पादनापैकी 35 टक्के उत्पादन हे महाराष्ट्र राज्याचे आहे. महाराष्ट्र राज्यातील लागवड करण्यात येणाऱ्या अन्नधान्य पिकांचा विचार करता ज्वारी - बाजरीनंतर भात पिकाचा क्रमांक लागतो.
मुसळधार पावसानंतर काही ठिकाणींना पावसाने उघडीप दिली की आद्रतेचे प्रमाण वाढले जाते. अशा परिस्थितीत भात पिकावर किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. जुलै ते डिसेंबर हा किडींचा प्रादुर्भाव कालावधी असतो. विशेषकरून ज्या रोपवाटिका वरकस जमिनीत केलेल्या आहेत तसेच हलक्या जातीची लागवड ज्या ठिकाणी केलेली आहे, त्या ठिकाणी किडींचा व रोगांचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव दिसतो. चला तर मग जाणून घेऊया भात: रोपवाटिकेत आढळणाऱ्या प्रमुख रोग व किडींच्या नियंत्रणाविषयी.
भात: रोपवाटिकेत आढळणारे प्रमुख रोग
करपा:
हा एक बुरशीजन्य रोग आहे. हा रोग पायरीक्युलॅरीया ओरायझो या बुरशीमुळे होतो.
लक्षणे:
- सुरुवातीला पानाच्या टोकावर लक्षणे दिसतात. परंतु कधी-कधी पानांच्या कडेवर किंवा मध्यभागी पृष्ठभागावर पण दिसतात.
- या रोगाची सुरुवातीची लक्षणे म्हणजे पानाच्या रोगग्रस्त भागावर गोल लंबाकार अर्धपारदर्शक ठिपके दिसून येतात.
- जसे-जसे रोगाची तीव्रता वाढत जाईल तस-तसे ठिपक्याचे प्रमाण वाढून पानांवर फिक्कट तपकिरी रंगाचे अनेक ठिपके दिसतात.
- ठिपक्याची कडा गर्द तपकिरी असून हे ठिपके एकमेकात मिसळून पाने पुर्णपणे करपतात.
- पाने करपल्याने पिकाची वाढ थांबते पाने करपल्याने अन्नद्रव्य तयार करण्याचे कामही मंदावते व त्यामुळे उत्पादनात घट होते.
- या रोगाची प्राथमिक सुरुवात रोगग्रस्त बियाण्यापासून होते.
- दुय्यम स्वरुपाचा प्रसार हवेमार्फत व रिमझिम पडणाऱ्या पाऊसामुळे होतो.
नियंत्रण:
- या रोगाच्या नियंत्रणासाठी बिजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. भाताच्या बिजप्रक्रियेसाठी 300 ग्रॅम मीठ + 1 लिटर पाण्यात मिसळून (30% मिठाचे द्रावण) त्यात भात बियाणे टाकून तरंगणारे बियाणे काढून टाकावे व तळाला राहिलेले बियाणे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे व सावलीत सुकवावे. नंतर 3 ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्यास चोळून पेरणी करावी..
- अतिरिक्त खतांचा वापर टाळावा शिफारशीनुसारच खताचे नियोजन करावे.
- रोगप्रतिकारक जातीचा वापर करावा. उदा- जया, फुले मावळ, इंद्रायणी व फुले राधा
- या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच मॅन्कोझेब 75% डब्ल्यूजी (देहात:DEM-45) 3 ग्रॅम किंवा
- कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यू पी (इफको-यामाटो) 1 ग्रॅम किंवा
- हेक्झाकोनॅझोल 5% इसी (टाटारॅलिस-कॉन्टाफ) 1 मिलि किंवा
- क्लोरोथॅलोनील 75% WP (सिजेंटा-कवच) 2.5 ग्रॅम किंवा
- 10 ते 15 दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून फवारणी करावी.
- पिकांची फेरपालट करावी.
आभासमय काजळी:
हा एक बुरशीजन्य रोग आहे. या रोगाची लागण युस्थेलॅजीनाईडी व्हायरेनस या बुरशीमुळे होतो.
लक्षणेः
- भात फुलोऱ्यात आल्यानंतर या रोगाची लक्षणे दिसतात.
- लोंबीतील काही फुलामध्ये दाणे भरण्याऐवजी शेंदरी रंगाच्या गाठी दिसतात.
- पुढे या गाठीचा रंग गर्द हिरवट मखमली होतो.
- या रोगाचा प्रसार रोगग्रस्त बियाण्यापासून होतो.
उपायः
- रोग प्रतिबंधक जातीचा वापर करावा व निरोगी बियाणे वापरावे.
- पेरणीपूर्वी थायरम किंवा व्हिटाव्हॅक्स 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाण्याला चोळावे.
- रोगग्रस्त झाडे किंवा रोगट लोंब्या काढुन नष्ट कराव्या.
- या रोगाच्या नियंत्रणसाठी 0.1 टक्के क्लोरोथालोनिल 75% डब्ल्यू पी (सिजेंटा-कवच) 350 ते 500 ग्रॅम एकर किंवा प्रोपिकोनाझोल 25%ईसी (सिंजेंटा-टिल्ट) 200 मिली प्रति 200 लिटर ड्रेंचिंग करावी.
उदबत्ता:
हा एक बुरशीजन्य रोग आहे. हा रोग इफिलीस ओरायझी नावाच्या बुरशीमुळे होतो.
लक्षणेः
- भात निसवल्यानंतर या रोगाची लक्षणे दिसतात.
- भात निसवल्यानंतर लांबी न येता त्या ठिकाणी उदबत्ती सारखे कठीण राखी रंगाची दांडी दिसते त्यामध्ये दाणे भरत नाही.
- या रोगाचा प्रसार रोगग्रस्त बियाण्यापासून होतो.
उपायः
- बियाण्यास पेरणीपुर्वी उष्णजल प्रक्रिया करावी त्यासाठी बियाणे 50 डिग्री सेंटीग्रेड तापमानाच्या पाण्यात 10 मिनीटे बुडवावे.
- निरोगी बियाणे वापरावे किंवा रोगप्रतिबंधक जातींचा वापर करावा.
- रोगग्रस्त झाडे उपटुन जाळून नष्ट करावीत.
- बियाणे पेरणीपुर्वी थायरम किंवा व्हिटावॅक्स 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाण्याला चोळावे.
जिवाणूजन्य करपा:
हा एक अणूजीवोद्भवी रोग आहे.
लक्षणे:
- रोगाच्या सुरुवातीला पानावर पिवळसर पांढरे अर्थ पारदर्शक ठिपके पडतात. ठिपक्यांची सुरुवात पानाच्या टोकाकडून देठाकडे आणि एक किंवा दोन्ही कडांकडून आत अशी होते.
- रोगाची पूर्ण वाढ झाल्यावर संपूर्ण पान करपते आणि त्याचा रंग राखाडी किंवा तांबुस तपकिरी होतो.
- हवामान अनुकूल असल्यास रोगाचे जिवाणू पानाच्या शिरात शिरतात. त्यामुळे चुडांची संपूर्ण पाने करपतात. भात पिक जागच्या जागी बसते. अशा अवस्थेस क्रेसेक असे म्हणतात.
- रोगाचा प्रसार रोगग्रस्त पेंढा, शेतातील धसकटे किंवा खोडवा, रोगग्रस्त बियाणे आणि बांधावरील इतर तण यामुळे होतो.
नियंत्रणः
- निरोगी बियाणे वापरावे किंवा रोगप्रतिबंधक जातीचा वापर करावा.
- या रोगाच्या नियंत्रणासाठी बिजप्रक्रिया करणे आवश्यक आहे.
- बियाण्यास पेरणीपूर्वी उष्णजल प्रक्रिया करावी त्यासाठी बियाणे 52 ते 54 डिग्री सेंटीग्रेड तापमानाच्या पाण्यात १० मिनीटे बुडवावे.
- स्ट्रेप्टोसाइक्लीन 6 ग्रॅम 120 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारल्यास पिकाला रोगापासून वाचविता येऊ शकते.
- खतांचा संतुलित वापर करावा अतिरिक्त खतांचा वापर टाळावा शिफारशीनुसारच खताचे नियोजन करावे.
- रोगबाधीत झाडे जाळून किंवा खोल नांगरट करुन नष्ट करावीत.
टुंग्रो:
हा एक विषाणूजन्य रोग आहे. या रोगाची लागण एका विशिष्ट घातक लसीमुळे होते.
लक्षणे:
- रोगग्रस्त झाडे किंचीत फुटवे राहून फुटव्यांची संख्या कमी होते. तसेच रोगग्रस्त पाने आणि पर्णकोष यांचीही वाढ खुंटते.
- नंतर रोगग्रस्त पाने मध्य शिरेला समांतर अशी दोन्हीकडून आत वळतात.
- पानांचा रंग सुरुवातीस पिवळसर दिसतो व नंतर पिवळसर तपकिरी होतो.
- पानांवरील शिरांचा रंगसुध्दा पिवळसर होतो.
- लोंब्या अर्धवट बाहेर पडतात.
- या रोगाचा दुय्यम प्रसार एका विशिष्ट जातींच्या तुडतुड्यांमुळे होतो.
- रोगाचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास थोड्या अवधीमध्ये मोठ्या क्षेत्रातील पिकाचे नुकसान होते.
नियंत्रणः
- रोगप्रतिकारक जातींची लागवड करावी.
- लागवड वेळेवर करावी शक्यतो उशिरा करु नये.
- रोगबाधीत झाडे आढळल्यास उपटून नष्ट करावी.
- रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही किटकनाशकांची फवारणी करावी.
- भाताची कापणी झाल्यानंतर रोगवाधीत धसकटे वेचून नष्ट करावी व खोल नांगरट करावी.
भात: रोपवाटिकेत आढळणाऱ्या प्रमुख किडी:
तपकिरी तुडतुडे:
प्रादुर्भावाची लक्षणे:
- प्रौढ व पिल्ले भाताच्या बुंध्यातुन व खोडातून सतत रस शोषण करतात. त्यामुळे पाने पिवळी पडून झाड निस्तेज होऊन, सुकून वाळते.
- प्रादुर्भाव झालेले शेत जळाल्यासारखे दिसते, यालाच ''हॉपर बर्न'' असे म्हणतात.
- अशा रोपांना लोंब्या येत नाहीत आणि समजा आल्याचं तर दाणे न भरताच पोचट राहतात.
- प्रादुर्भावग्रस्त पेंढा जनावरांना खाण्यायोग्य राहत नाही.
नियंत्रणाचे उपाय:
- प्रतिकार जातीचा वापर करावा जसे, अरुणा, ए.डी.टी-36, को-42, को-46, आय.आर-36, आय.आर-72.
- रोपे शिफारस केलेल्या अंतरावर लावावीत. दाट लागवड करू नये.
- प्रत्येक 2.5 मी नंतर 30 से. मी. जागा तण काढणीसाठी सोडावी.
- नत्र असलेल्या खतांचा वापर प्रमाणात करावा, अती वापर करू नये.
- पोटॅश जास्त वापरल्यास फायदा होतो.
- रात्री प्रकाश सापळे व दिवसा पिवळे सापळा लावावे.
- कीडनाशकाचा वापर करण्याआधी पाण्याचा योग्य निचरा करावा.
- प्रत्येक चुडात 5 ते 10 तुडतुडे आढल्यास, इमिडाक्लोप्रिड 70% डब्ल्यू जी (बायर-एडमायर) 12 ग्रॅम एकरी 200 ली पाण्यात मिसळून फवारावे किंवा
- थायमेथोक्सम 25% डब्ल्यू जी (देहात-असेर) 80 ग्रॅम 200 ली पाण्यात मिसळून एकरी फवारावे.
लष्करी अळी :
प्रादुर्भावाची लक्षणे:
- अळया लष्कीरी अळीप्रमाणे हल्ला करतात. रोपांना मोठया प्रमाणात कुरतडतात.
- अळया पाने कुरतडतात त्यामुळे भाताचे पिक निष्पर्ण होते. तसेच पीक लोंबी अवस्थेत असताना या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास धानाच्या लोंब्या कुडतडल्यामुळे शेतात लोंब्याचा सडा पडलेला आढळतो.
- अळया रात्री कार्यक्षम असून दिवसा भातावर, बेचक्यात व बांधावरील गवतात लपून बसतात.
नियंत्रणाचे उपाय:
- ज्या विभागामध्ये प्रादुर्भाव आहे. त्या ठिकाणी भात खाचरात तीन ते चार पक्षी बसण्याचे थांबे उभे करावेत जेणेकरूण पक्षी या अळया नष्ट करतील.
- बेडूक किंवा बदकचे संवर्धन करावे.
- जास्त प्रादुर्भाव असल्यास बांधीत पाणी भरावे.
- पिकावरुन दोर किंवा झाडाच्या फांदया आडव्या फिरवुन पाने गुंडाळणा-या लष्करी अळया पकडाव्यात.
- सायंकाळच्या सुमारास वारा शांत असताना कीडनाशकांचा वापर करावा.
- डायक्लोरोव्ह्स 76% ईसी(नॅशनल पेस्टीसाईड्स आणि केमिकल्स) 12.5 मिली प्रती 10 लिटर पाणी घेऊन फवारणी करावी.
तुम्ही तुमच्या भात रोपवाटिकेतील प्रमुख किडी व रोगांचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
- महाराष्ट्रात भात पीक कुठे घेतले जाते?
महाराष्ट्रात भात पीक कोकण, विदर्भाचा नागपूर विभाग तसेच कोल्हापूर, पुणे, नाशिक, विभागाच्या सह्याद्री लगतच्या भागात घेतले जाते.
- भारतात, भाताची लागवड कोणत्या भागांमध्ये केली जाते?
भारतात, भाताची लागवड साधारणपणे सहा वेगवेगळ्या भागां मध्ये केली जाते, ज्यात किनारपट्टीचा सखल प्रदेश, खोल पाण्याचे क्षेत्र, पावसावर आधारित सखल प्रदेश, पावसावर आधारित उंच प्रदेश, बागायती खरीप आणि बागायती रब्बी या भागांमध्ये केली जाते.
- भात पिकात आभासमय काजळी रोगाची लक्षणे केव्हा दिसतात?
भात फुलोऱ्यात आल्यानंतर भात पिकात आभासमय काजळी रोगाची लक्षणे दिसतात.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor