शेळ्या मेंढ्यांची थंडीमध्ये घ्या ह्या पद्धतीने काळजी
नमस्कार पशुपालकांनो,
अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून मेंढी आणि शेळी पालन करतात. परंतु, याच शेळ्या मेंढ्याचे पालन करताना हिवाळ्यात त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते कारण जास्त थंडीमुळं शेळ्यांची लहान करडं दगावण्याचा धोका असतो. म्हणूनच आजच्या या लेखात आपण थंडीमध्ये शेळ्या मेंढ्यांची कशी काळजी घ्यावी याविषयी जाणून घेणार आहोत.
कसा असावा गोठा?
- शेळी, मेंढीच्या गोठ्याची रचना ही इंग्रजी A अक्षरासारखी असावी.
- शेळ्या, मेंढ्यांना फार खर्चिक गोठ्याची आवश्यकता नसते. गोठे थोड्या उंचावर बांधणे आवश्यक असते.
- गोठे कोरडे, हवेशीर असावेत.
- हिवाळ्यात आर्द्रतेचे प्रमाण कमी असल्यामुळे गोठ्यामध्ये ओलावा जास्त वेळ टिकून राहतो आणि तापमान कमी होते.
- गोठ्याची दिशा ठरवताना दक्षिण-उत्तर किंवा पूर्व-पश्चिम बाजूने ठेवल्यास सकाळी आणि सायंकाळी कोवळ्या सूर्यकिरणांमुळे गोठ्यातील ओलसरपणा कमी होतो.
- सूर्यकिरणामुळे जंतुनाशक प्रक्रिया होऊन गोठे निर्जंतुक होण्यास मदत होते.
- गोठा कोरडा व स्वच्छ ठेवावा.
- गोठ्यातील जमिनीत चुनखडी किंवा मुरमाचा वापर केल्यास ओलसरपणा कमी होतो. जमिनीचे तापमान कमी करण्यास प्रतिबंध करता येतो.
- गोठ्यांच्या आजूबाजूला मोकळी जागा असावी.
- गोठ्याच्या दोन्ही बाजूस जागा ठेवून कुंपण करावे.
- स्वच्छ पाण्याची सोय करावी.
आता जाणून घेऊया हिवाळ्यात घ्यायच्या काळजी विषयी:
- वयोमानाप्रमाणे शेळी, बोकड आणि लहान करडांची व्यवस्था करावी.
- आजारी आणि संसर्गजन्य आजार झालेल्या (उदा. फुफ्फुसाचा आजार, जंत इत्यादी) करडूंना ताबडतोब वेगळे करावे.
- हिवाळ्यात करडे, कोकरांचा निवारा उबदार असावा, अन्यथा त्यांच्या शरीराचे तापमान कमी होऊन ते जीवघेणे होऊ शकते.
- दिवसा गोठ्याची दारे व खिडक्या खुल्या ठेवावीत, जेणेकरून हवा खेळती राहील.
- रात्री गोणपाट किंवा पोते यांनी शेड नीट झाकावे. जेणेकरून थंड हवा आत येण्यास प्रतिबंध होईल.
- करडे, कोकरांचा बिछाना कोरडा, मऊ, उबदार असावा. करडांचा बिछाना साधारणपणे 2 ते 3 दिवसांनी बदलावा.
- करडांचा निवारा हा नेहमी कोरडा, स्वच्छ आणि अमोनिया मुक्त असावा; कारण हा वायू करडांच्या फुफ्फुसांना दाह निर्माण करून खोकला, श्वसन संस्थेचे विकार निर्माण करतो. यातूनच जीवघेणा न्यूमोनियाचा आजार होतो.
- कोकरांना थंडी जास्त वाजत असेल तर छोटी शेकोटी, विजेचा दिवा किंवा विजेची शेगडी वापरून गोठ्यातील हवा उबदार ठेवावी. त्यामुळे करडांना सर्दी, हगवण आणि न्यूमोनिया यांपासून संरक्षण होईल.
- शेकोटी करताना जास्त धूर होणार नाही याची काळजी घ्यावी. साधारणपणे गोठा एकदा उबदार झाल्यानंतर शेकोटी विझवावी.
- विजेचा दिवा साधारणपणे करडांपासून 20 इंचांपेक्षा जास्त उंचीवर छताला टांगावा. विजेचा दिव्याला संरक्षक पिंजरा असावा.
- करडे, कोकरांना स्वच्छ आणि कोमट पाणी पिण्यासाठी दिले, तर त्यांची मूत्रसंस्था सुस्थितीत राहण्यास मदत होते.
- एखाद्या करडाला खूप थंडी लागली असेल, तर त्याचे शरीर कोमट पाण्यात (तापमान 40 ते 45 अंश सेल्सिअस) 4 ते 5 मिनिटे बुडवून ठेवावे, पण डोके पाण्याच्या वर ठेवावे. नंतर त्याचे शरीर व्यवस्थित चोळून त्याला स्वच्छ, कोरड्या गोणपाटात लपेटावे, कोमट दूध पाजावे.
- नवजात करडाला त्याच्या वजनाच्या 1/10 इतका चीक (पहिले दूध) द्यावा, त्यामुळे करडात नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती येते. पोट साफ होण्यास मदत होते.
- चिका पाजल्यामुळे मरतुकीचे प्रमाण 2 टक्के ते 3 टक्के कमी करता येते.
- शेळ्या, मेंढ्यांचे मुक्त संचार पद्धतीने संगोपन केले जात असेल, तर त्या ठिकाणी एका कोपऱ्यात एखादा बंदिस्त गोठा जरूर असावा. जेणेकरून रात्रीच्या वेळी शेळ्या, मेंढ्या तेथे जाऊन बसतील. थंडीपासून संरक्षण होईल.
- शेळ्या, मेंढ्या आणि लहान करडांना सकाळच्या वेळी कोवळ्या उन्हात मोकळे सोडावे, जेणेकरून त्यांना सूर्यप्रकाशातून ऊब मिळेल.
तुम्ही हिवाळ्यात तुमच्या शेळ्या मेंढ्यांची काळजी कशाप्रकारे घेता? याविषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor