तपशील
ऐका
कृषी
सूर्यफूल
कृषी ज्ञान
बागायती पिके
DeHaat Channel
24 Mar
Follow

अशा प्रकारे करा सूर्यफुलाची शेती (Sunflower cultivation)!


नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

सूर्यफूल हे समशीतोष्ण देशांमध्ये घेतले जाणारे सर्वात महत्वाचे तेलबिया पीक आहे. जगातील वनस्पती तेलाचे सूर्यफूल हे प्रमुख स्रोत आहे. भारत जगातील तेलबिया पिकांचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. भारतीय कृषी अर्थव्यवस्थेत तेलबियांचे महत्त्वाचे स्थान आहे. इतर वनस्पती तेलांच्या तुलनेत सूर्यफूलाचे तेल हे प्रीमियम मानले जाते. महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भात सूर्यफुल लागवडीचे क्षेत्र अधिक आहे. चला तर मग आजच्या भागात या कमी कालावधीत व तिन्ही हंगामांत येणाऱ्या महत्त्वपूर्ण अशा तेलबिया पिकाविषयी जाणून घेऊया.

जमीन (Suitable Soil for Sunflower cultivation) :

  • सूर्यफूल लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी.
  • आम्लयुक्त आणि पाणथळ जमिनीत हे पीक चांगले येत नाही.
  • जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 असल्यास उत्पादन चांगले मिळते.

हवामान (Suitable Weather for Sunflower cultivation) :

  • मुळात थंड हवामानातील हे पीक असून, बियाण्याच्या चांगल्या उगवणीसाठी 8 ते 10 अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते.
  • पिकाची वाढ, बियाण्यातील तेलाचे प्रमाण वाढविण्यासाठी रात्रीचे तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअस, तर दिवसाचे तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअस एवढे आवश्यक असते.

लागवड हंगाम (Sunflower Cultivation Time) :

  • सूर्यफुलाची लागवड खरीप, रब्बी व उन्हाळी अशा तीनही हंगामात (sunflower cultivation season) करता येते.
  • रब्बी हंगामात ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात पेरणी करावी.
  • पेरणी शक्यतो टोकण पद्धतीने करावी.
  • उन्हाळी हंगामाकरिता फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरावड्यामध्ये पेरणी करावी.

बियाण्याचे प्रमाण (Acre Seed):

सूर्यफुलाच्या पेरणीसाठी सुधारित वाणाचे 3 ते 4 किलो बियाणे आणि संकरित वाणाचे 2 ते 2.5 किलो बियाणे प्रति एकरी वापरावे.

सूर्यफूल पिकासाठी सुधारीत वाण (Varieties for Sunflower Cultivation):

सुधारित जाती:

  • फुले भास्कर
  • एस एस 56
  • मॉर्डेन 68414
  • भानू

संकरित वाण:

  • के बी एस एच 1
  • एल एफ एस एच 17135
  • एल एस एफ एच 44
  • फुले रविराज
  • एम एस एफ एच 17

पूर्वमशागत:

खरीप हंगामासाठी जमिनीची चांगली मशागत केलेली असल्यास रब्बी हंगामामध्ये एखादी नांगरट करून कुळव्याच्या दोन पाळ्या घ्याव्यात.

बीजप्रक्रिया :

  • मर रोगाच्या प्रतिबंधासाठी 2 ते 2.5 ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्यास चोळावे.
  • अझॅटोबॅक्टर हे जिवाणू खत 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास पेरणीपूर्वी चोळावे.

लागवड पद्धत (Sunflower Cultivation):

  • पेरणीचे अंतर मध्यम ते खोल जमिनीत 45 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटर भारी जमिनीत 60 सेंमी बाय 30 सेंमी तसेच संकरित वाण आणि जास्त कालावधीच्या वाणाची लागवड 60 सेंमी बाय 30 सेंमी अंतरावर करावी.
  • कोरडवाहू सूर्यफुलाची पेरणी दोन चाडाच्या पाभरीने करावी. म्हणजे बी आणि खत एकाच वेळी पेरता येते.
  • बियाणे 5 सेमी पेक्षा जास्त खोल पेरू नये.
  • बागायती पिकाची लागवड सरी वरंब्यावर टोकण पद्धतीने करावी.

आंतरमशागत :

  • पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी दोन रोपातील अंतर 30 सेंटीमीटर ठेवून विरळणी करावी.
  • पेरणीनंतर पंधरा दिवसांनी एक खुरापणी करावी. तसेच दोन कोळपण्या कराव्यात.
  • पहिली कोळपणी पेरणीनंतर 20 दिवसांनी व दुसरी कोळपणी 35 ते 40 दिवसांनी करावी.
  • रोप अवस्था, फुलकळी अवस्था, फुलोऱ्याची अवस्था, दाणे भरण्याची अवस्था या संवेदनशील अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नये.
  • फुलकळी अवस्था ते दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास दाणे पोकळ राहून उत्पादनात घट येते.

रासायनिक खते :

  • कोरडवाहू पिकास प्रति एकरी 1 टन शेणखत तसेच 20 किलो नत्र, 10 किलो स्फुरद आणि 10 किलो पालाश पेरणीच्या वेळेस दोन चाडाच्या पाभरीने पेरून द्यावे.
  • बागायती पिकास प्रति एकरी 24 किलो नत्र, 24 किलो स्फुरद, 24 किलो पालाश द्यावे. यापैकी 12 किलो नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व उरलेल्या 12 किलो नत्राची मात्रा पेरणीनंतर एक महिन्याच्या आत द्यावी.
  • गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीसाठी प्रती एकरी 8 किलो गंधक पेरणीच्या वेळी गांडूळ खातात मिसळून द्यावे.

सूर्यफुल पिकातील प्रमुख रोग व किडी:

  • पानांवरील ठिपके
  • तांबेरा
  • केवडा
  • मर रोग
  • अळी
  • तुडतुडे
  • फुलपातर
  • पिठारी

सिंचन व्यवस्थापन (Water Management) :

  • सूर्यफूल हे पाण्यासाठी अतिसंवेदनशील पीक आहे.
  • एकूण पाणी वापराच्या 20 टक्के पाणी वाढीसाठी 55 टक्के पाणी फुलोरा अवस्थेत, तर उरलेले 25 टक्के पाणी दाणे भरण्यासाठी वापरले जाते.
  • पिकास रोपावस्था, फुलकळी अवस्था, फुलोऱ्याची अवस्था, दाणे भरण्याची अवस्था या चार संवेदनक्षम अवस्थेत पाणी देणे गरजेचे आहे.
  • फुलकळी ते दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास दाणे पोकळ राहतात व उत्पादनात घट येते.

काढणी :

  • सूर्यफुलाची पाने देठ व फुलांची मागील बाजू पिवळी झाल्यानंतर पिकाची कापणी करावी.
  • कणसे चांगले वाळवून नंतर मळणी करावी.
  • कोरडवाहू पिकापासून प्रति एकरी 3 ते 4 क्विंटल संकरित वाणापासून 5 ते 6 क्विंटल आणि बागायती संकरित वाणापासून प्रति एकरी 7 ते 8 क्विंटल उत्पादन मिळते.

विशेष टिप्पणी:

  • पीक फुलोऱ्यात असताना सकाळी सात ते अकरा या वेळेत हाताला तलम कापड गुंडाळून फुलाच्या तबकावरून हळुवार हात फिरवावा म्हणजे कृत्रिम परागीभवन होऊन दाणे भरण्याचे प्रमाण वाढते.
  • परागीभवन होण्यासाठी प्रति हेक्टरी चार ते पाच मधमाशांच्या पेट्या ठेवाव्यात.
  • सूर्यफूल पिकाची फेरपालट करावी. सूर्यफुलाची मुळे जमिनीत खोलवर जातात.
  • दरवर्षी त्याच जमिनीत वारंवार हे पीक घेतल्यास जमिनीचा पोत बिघडून उत्पादन क्षमता कमी होते.
  • रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढतो त्यासाठी कमीत कमी तीन वर्षे तरी त्याच जमिनीत सूर्यफुलाचे पीक घेऊ नये.
  • कडधान्य, सूर्यफूल किंवा तृणधान्य, सूर्यफूल याप्रमाणे पिकाची फेरपालट करावी.
  • पीक फुलोऱ्यात असताना किटकनाशकाची फवारणी करू नये. अगदी आवश्यकता असेल तरच किटकनाशके वापरावीत.

अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य वाण वापरून सूर्यफुलाची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या सूर्यफूल पिकाच्या लागवडीकरिता कोणते तंत्रज्ञान वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “बागायती पिके” चॅनेलला फॉलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. सूर्यफुलाची लागवड कोणत्या हंगामात करता येते?

सूर्यफुलाची लागवड खरीप, रब्बी व उन्हाळी अशा तीनही हंगामात करता येते.

2. सूर्यफुलाच्या वाढीसाठी कोणती जमीन व हवामान योग्य आहे?

पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन तसेच बियाण्याच्या चांगल्या उगवणीसाठी ८ ते १० अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते.

3. सूर्यफूल परिपक्व होण्यासाठी किती वेळ लागतो?

सूर्यफूल कमी कालावधीत येणारे पीक असून, केवळ 3 महिन्यांत 12 फुटांपर्यंत वाढू शकते. योग्य वाढीच्या परिस्थितीत, सूर्यफूल लागवडीनंतर 70 ते 100 दिवसांत परिपक्व होतात.

48 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor