रताळ्याची शेती (Sweet Potato Farming)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
रताळे हे एक फळ म्हणुन भारतात अनेक प्रांतात खाल्ले जाते. रताळे बटाट्यासारखेच असते, रताळे हे उपवासात फराळ म्हणुन देखील खाल्ले जाते. रताळे हे औषधीगुणांनी परिपूर्ण असल्याने याचे सेवन आरोग्यासाठी लाभकारी ठरते. रताळ्याची पांढरी, लाल, जांभळी आणि तपकिरी साल देखील असते. महाराष्ट्र, ओडिसा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहार येथे मोठ्या प्रमाणावर रताळे लागवड केली जाते. आपल्या देशात सुमारे २ लाख हेक्टर जमिनीवर याची लागवड केली जाते. देशांतर्गत बाजारपेठेत त्याला नेहमीच मागणी असते. कमी खर्चात आणि कमी वेळेत रताळ्याचे पिक तयार होते आणि इतर फळांपेक्षा व भाजीपाल्यापेक्षा रताळ्याचे दर हे जास्त असतात. तसेच, याची मागणी देखील कायम असते. रताळ्याचे हे बहुगुण पाहता रताळ्याची शेती शेतकऱ्यांसाठी चांगले उत्पन्न कमवून देऊ शकते म्हणूनच आजच्या या भागात आपण रताळे पिकाच्या लागवडीविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
रताळ्याच्या लागवडीसाठी योग्य जमीन (Suitable Soil for Sweet Potato):
- रताळ्याच्या लागवडीसाठी सुपीक जमीन निवडली पाहिजे मग त्यामध्ये लोममाती (वाळू, गाळ आणि थोड्या प्रमाणात चिकनमाती याचे मिळून बनलेली) ही रताळे लागवडीसाठी योग्य मानली जाते.
- रताळ्याच्या लागवडीसाठी जमिनीचे पीएच मूल्य 5.8 ते 6.7 दरम्यान असावे असं कृषी शास्त्रज्ञ सांगतात.
- रताळ्याची लागवड मैदानी आणि डोंगराळ भागात अशा दोन्ही ठिकाणी करता येऊ शकते.
रताळे लागवडीसाठी योग्य हवामान (Suitable Temperature for Sweet Potato):
- रताळ्याच्या लागवडीसाठी 20 ते 28 अंश सेल्सिअस तापमान मानवते असं सांगितले जाते.
- शीतोष्ण आणि समशीतोष्ण असे दोन्ही प्रकारचे हवामान असलेल्या प्रदेशात रताळ्याची लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते.
- रताळ्याची लागवड 75 ते 150 सेमी पर्यंतच्या पाऊस पडणाऱ्या ठिकाणी करता येऊ शकते.
- रताळे लागवड आपण ज्या वावरात करणार आहात तिथे पाणी साचणार नाही ह्याची काळजी घ्यावी कारण वावरात पाणी साचले तर रताळे सडू शकतात आणि परिणामी उत्पादनात घाटा येण्याची शक्यता असते. जर आपणांस रब्बी हंगामात रताळ्याची लागवड करायची असल्यास पाण्याची गरज भासते.
रताळ्याच्या काही सुधारित जाती ( Sweet Potato Varieties):
- श्री कनक
- गौरी
- ST 13
- वर्षा
- कोकण
- अश्विनी
- सम्राट
- कालमेघ
- पुसा सुहावणी
- पुसा रेड
- राजेंद्र गोड
रताळ्याची लागवड कधी करावी:
- रब्बी हंगामात रताळ्याची लागवड ही ऑक्टोबर महिन्यात केली जाते. तसेच, उत्तर भारतात रब्बी, खरीप आणि उन्हाळी या तीनही हंगामात रताळ्याची लागवड करता येते.
- खरीप म्हणजेच पावसाळी हंगामात रताळ्याची लागवड जून ते ऑगस्ट दरम्यान करता येते. त्यावेळी रताळ्याच्या पिकाला फारशी पाण्याची गरज भासत नाही. फक्त पाऊस पडलाच नाही तेव्हा मात्र पिकाला पाणी द्यावे लागते.
- रब्बी हंगामात रताळ्याची लागवड करण्याचा विचार असेल तर या हंगामात लागवड ही ऑक्टोबर ते जानेवारी पर्यंत केली जाऊ शकते, या हंगामात लागवड केलेल्या रताळ्याला मात्र पाण्याची आवश्यकता असते.
रताळ्याची लागवड कशी करावी?
- सर्वात आधी, वावर नांगराने नांगरुण घ्या. त्यानंतर, देशी नांगर किंवा कल्टीव्हेटरने माती भुसभूशीत करून घ्यावी. यानंतर कमीत कमी सहा महिने जुने शेणखत वावरात टाकावे.
- वावरात प्रति एकरी 80 क्विंटल या प्रमाणात शेणखत टाकावे. त्यानंतर रोटाव्हेटर मारून घ्यावा.
- रताळ्याच्या लागवडीआधी रोपवाटिका तयार करावी.
- रताळ्याची लागवड ही वेलींचे तुकडे लावून केली जाते.
- रताळ्याचे वेल आधी रोपवाटिकेत तयार केले जाते.
- लागवडीच्या दोन महिने आधी रोपवाटिका तयार करण्याची शिफारस केली जाते.
- जर आपणांस एक एकर रताळ्याची लागवड करायची असेल तर 40 वर्गमिटर जागेवर रोपवाटिका तयार करावी.
- या रोपवाटिकेत कीडमुक्त व निरोगी कंद 60 x 60 सेमी अंतरावर लावावेत आणि गादा ते गादा 20 x 20 सेमी अंतर ठेवावे.
- एक एकरच्या रोपवाटिकेसाठी 40 किलो कंद लागतात.
- कंद लागवडीच्या वेळी दीड किलो युरिया लावावा. जेव्हा गरज असेल तेव्हा वेळोवेळी पाणी दिले पाहिजे. अशा प्रकारे पहिली नर्सरी दीड महिन्यात तयार होते.
- तयार केलेल्या वेली सुमारे 25 सेमीच्या कापल्या जातात. यानंतर, दुसऱ्या नर्सरीसाठी 500 चौरस मीटर जमीन आवश्यक असते. यामध्ये गादे ते गाद्यापर्यंतचे अंतर 60 सेमी आणि झाडांपासून झाडांचे अंतर 25 सेमी ठेवावे.
- रोपवाटिकेची लागवड केल्यानंतर 15 दिवस आणि 30 दिवसांनी 5 किलो युरिया फवारणे आवश्यक आहे आणि ओलावाची विशेष काळजी घ्यावी. अशाप्रकारे, जेव्हा दुसरी रोपवाटिका तयार होईल, तेव्हा वेलींच्या मध्यभागी 25 सेमीच्या वेली कापून मुख्य वावरात लागवड करावी.
आंतरमशागत:
- 20 ते 30 दिवसाच्या अंतराने नियमित खुरपणी करावी.
- लहान वेलांना मातीची भर लावावी.
- जमिनीवर टेकलेल्या वेलांच्या डोळ्यातून मुळे फुटतात. त्यामुळे लागवडीनंतर 45 ते 60 दिवसांच्या दरम्यान शेंड्याकडील वेलींना वळण द्यावे.
- गरजेनुसार पाणी देणे आवश्यक आहे.
सिंचन व्यवस्थापन:
- रताळ्याच्या रोपांना लागवडीच्या आधारावर सिंचन केले जाते.
- उन्हाळी हंगामात लागवड केली असल्यास लागवडीनंतर लगेचच पाणी द्यावे. या दरम्यान झाडांना आठवड्यातून एकदा पाणी दिले जाते. त्यामुळे शेतात पुरेसा ओलावा राहून कंदांचा विकास चांगला होतो.
- पावसाळ्यात रोपे लावली असतील तर त्यांना जास्त सिंचनाची गरज भासत नाही.
- फक्त पाऊस पडलाच नाही तेव्हा मात्र पिकाला पाणी द्यावे लागते.
- रब्बी हंगामात रताळ्याची लागवड करण्याचा विचार असेल तर, या हंगामात लागवड केलेल्या रताळ्याला मात्र पाण्याची आवश्यकता असते.
रताळे काढणी:
- रताळ्याच्या जातीनुसार, कंदाची वाढ होण्यास 3 ते 4 महिन्याचा कालावधी लागतो.
- लागवडीनंतर सुमारे साडेतीन ते चार महिन्यांनी पाने पिवळी पडू लागल्यानंतर रताळ्याची काढणी करावी.
अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य हवामानानुसार रताळ्याची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या रताळे पिकाच्या लागवडीकरता कोणते तंत्र वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. रताळे लागवडीसाठी योग्य जमीन कोणती?
रताळे लागवडीसाठी साधारण उतार असलेली व उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी.
2. रताळे लागवड कोणत्या हंगामात करावी?
रताळे लागवड तिन्ही हंगामात करता येते, परंतु पावसाळ्यात लागवड करणे सर्वात फायदेशीर आहे. या हंगामात रताळ्याची रोपे चांगली वाढतात.
3. रताळ्याची वाढ होण्यास किती कालावधी लागतो?
रताळ्याच्या जातीनुसार, कंदाची वाढ होण्यास 3 ते 4 महिन्याचा कालावधी लागतो.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor