तपशील
ऐका
पशुपालन
पशु ज्ञान
DeHaat Channel
1 Aug
Follow

मेंढ्या आणि शेळ्यांमध्ये रेबीज रोगाची लक्षणे व प्रतिबंध (Symptoms and prevention of rabies in sheep and goats)

नमस्कार पशुपालकांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

रेबीज हा उष्ण रक्ताच्या जनावरांना होणारा, विषाणूद्वारे संक्रमित होणारा प्राणघातक आजार आहे. हा रोग कोल्हा, वटवाघूळ, मुंगूस, लांडगा, तरस, घुबड या जंगली जनावरांमध्ये आणि गाय, म्हैस, शेळी, मेंढी, घोडा, वराह, श्वान, मांजर या पाळीव जनावरांमध्ये आढळून येतो. मानवात रेबीज संक्रमणातून होणाऱ्या मृत्युंपैकी 99 टक्के मृत्यू हे पाळीव श्वानांच्या चावण्याने होतात. रेबीज बाधित जनावरांच्या लाळेतून हे विषाणू संक्रमित होत असतात. या आजाराचा प्रादुर्भाव बाधित जनावरांच्या दंशाने, खोलवर चावण्याने किंवा ओरबडल्याने होतो. आजच्या आपल्या या लेखात आपण याच रोगाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

रेबीज रोगाचा प्रसार:

  • रेबीज हॅब्डोव्हायरिडे प्रवर्गातील लायसा विषाणूमुळे होतो.
  • संसर्ग झालेल्या जनावरांच्या लाळेतून हा आजार पसरतो.
  • भारतात 95 टक्के प्रकरणात मनुष्य आणि जनावरांना रेबीज होण्यामागे श्वान कारणीभूत आहे. तर, 2 टक्के प्रकरणात मांजर आणि 1 टक्के प्रकरणात कोल्हा किंवा मुंगुसामुळे रेबीज पसरतो.
  • गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या, घोडे आणि श्वानामध्ये पिसाळणे ही विकृती पिसाळलेला श्वान चावल्यामुळे होते.
  • रेबीज विषाणू लाळेच्या थेट संपर्काद्वारे (जसे की फाटलेली त्वचा किंवा डोळे, नाक किंवा तोंडातील श्लेष्मल पडदा) प्रसारित होतो.
  • चावलेली जागा आणि प्रत्यक्ष त्यावेळी किती विषाणूंची संख्या त्या जखमेतून शरीरात गेली, यावर आजाराची लक्षणे दिसण्याचा कालावधी अवलंबून आहे. तो एक आठवड्यापासून एक वर्षापर्यंत असू शकतो.
  • मानेच्या वरच्या भागात श्वान चावल्यास वासराचा उष्मायन कालावधी 15 दिवस आणि मोठ्या जनावरांमध्ये 20 दिवस असतो.

रेबीज कसा होतो?

  • पिसाळलेल्या (रेबीजग्रस्त) जनावरांच्या चाव्यातून लाळेद्वारे विषाणू जनावरांच्या मांसपेशीत प्रवेश करतात.
  • मांसपेशीतील मज्जातंतूंमध्ये विषाणू त्यांची संख्या वाढवतात आणि मेंदूपर्यंत पोहोचतात.
  • वाढलेली विषाणूंची संख्या मज्जातंतूंना कुजवते आणि विविध प्रकारच्या मांसपेशी सैल बनवते.
  • श्वसनसंस्थेच्या मांसपेशी सैल झाल्यामुळे जनावरास श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो, जनावर दगावते.

शेळी व मेंढ्यांमधील लक्षणे:

  • मेंदू व चावा घेतलेल्या जागेमधील अंतर जेवढे कमी तेवढी लक्षणे लवकर दिसतात.
  • जनावर आक्रमक होते किंवा मलूल बनते.
  • वर्तणुकीत बदल होतो.
  • मेंदू व चेतासंस्थेवर झालेल्या विकृतीमुळे जनावर झाड किंवा भिंतीवर डोके आपटते.
  • जबड्याच्या मांसपेशी सैल पडल्याने जनावर सतत व जास्त प्रमाणात संसर्गित लाळ गाळते.
  • गळा आणि जबड्याच्या मांसपेशी सैल पडल्याने जनावर पाण्याला घाबरते किंवा त्याच्यामध्ये पाण्याची भीती निर्माण होते.
  • जनावर वारंवार लघवी करते, शेण टाकते. निर्जीव वस्तू किंवा माणसांवर धावून येते.
  • जनावराची भूक मंदावते, दात खाते, शेळ्यांच्या दूध उत्पादनात घट होते.

शेळी व मेंढ्यांमध्ये रेबीज झाल्यावर घ्यावयाची काळजी:

  • रेबीज झालेले जनावर इतर जनावरांपासून दूर बांधावे.
  • संसर्गित जनावरांचा चारा, पाणी वेगळे ठेवावे.
  • संसर्गित जनावरांच्या नैसर्गिक स्रावांच्या (लाळ, लघवी, डोळ्यांतील पाणी) संपर्कात स्वतः आणि इतर जनावरांना येऊ देऊ नये.
  • दगावलेल्या जनावराचे मल-मूत्र, चारा, पाणी यांची योग्य ती विल्हेवाट लावावी.

प्रतिबंधात्मक उपाय:

  • रेबीज आजार अत्यंत जीवघेणा असून, वेळेवर योग्य उपचार मिळाले तरच जीव वाचवता येऊ शकतो.
  • रेबीज विषाणू जनावरांच्या लाळेतून माणसाच्या शरीरात प्रवेश करतो. त्यामुळे जनावर चावल्यानंतर जखमेची जागा स्वच्छ करणे सर्वांत महत्त्वाचे आहे.
  • चावा घेतलेली जागा पाणी आणि साबणाने किंवा डिटर्जंटने 15 मिनिटे स्वच्छ धुवावी.
  • जखम झालेल्या जागेवरची लाळ लवकरात लवकर स्वच्छ करावी.
  • जखम धुवून झाल्यानंतर त्यावर जंतूनाशक मलम लावावे.
  • आजारावर उपचारात्मक औषध नाही. त्यामुळे पशुवैद्यकाकडूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
  • रेबीज प्रतिबंधात्मक लस कुत्रा चावलेल्या दिवशी आणि 3, 7, 14 व 28 व्या दिवशी पशुवैद्यकाकडून स्नायूत टोचून घ्यावी.
  • मानेच्या वरच्या भागात श्वान चावल्यास रेबीज प्रतिबंधात्मक लस देऊनही जनावरांचा मृत्यू होतो. त्यामुळे मानेच्या वरच्या भागात श्वान चावल्यास, जखमेच्या आत आणि आजूबाजूला इम्युनोग्लोब्युलीनचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे जीव वाचतो.

तुमच्या मेंढ्या आणि शेळ्यांमध्ये रेबीज रोगाची कोणती लक्षणे दिसून आली आणि तुम्ही काय उपाययोजना केल्या या विषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. जनावरांचे वय ओळखण्याच्या पद्धती?

1) जनावरांचे निरीक्षण केले तर लहान, तरुण आणि म्हातारी जनावरे अशा वयोगटात त्यांचे विभाजन करता येते.

2) लहान जनावरे या गटात वासरांचा, तरुण जनावरांमध्ये आकाराने लहान असलेली, अंगात चपळपणा, मऊ व घट्ट कातडी, शरीरावरील केस मऊ व दातांची पूर्ण रचना असणारी जनावरे येतील.

3) म्हातारी जनावरे म्हणजे आकाराने मोठी, शांत स्वभावाची, सैल कातडी व दातांची अपूर्ण रचना असलेली होय.

2. रेबीज रोग कोणत्या जनावरांमध्ये आढळून येतो:

रेबीज हा रोग कोल्हा, वटवाघूळ, मुंगूस, लांडगा, तरस, घुबड या जंगली जनावरांमध्ये आणि गाय, म्हैस, शेळी, मेंढी, घोडा, वराह, श्वान, मांजर या पाळीव जनावरांमध्ये आढळून येतो.

3. रेबीज रोग दुधाद्वारे पसरतो का?

रेबीज रोग दुधाद्वारे पसरत नाही.

29 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor