तपशील
ऐका
खते
कृषी
कृषी ज्ञान
कृषी ज्ञान
DeHaat Channel
13 Nov
Follow

पाण्यात विरघळणारी खते: प्रकार, वापरण्याच्या पद्धती (Water Soluble Fertilizers: Types, Methods of Application)


नमस्कार मंडळी,

देहात परिवारात सहर्ष स्वागत आहे!

पीक उत्पादनामधे संतुलित अन्नद्रव्ये व्यवस्थापनाला (Fertilizer Management) अनन्यसाधारण महत्त्व आहे. पिकांची अन्नद्रव्यांची गरज पूर्ण करण्यासाठी विविध स्वरूपात, विविध प्रकारे खतांचा वापर केला जातो. यामध्ये प्रामुख्याने जमिनीतून, पाण्यातून, विद्राव्य स्वरूपातील, (Soluble Fertilizer) सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते असे अनेक खतांचे प्रकार उपलब्ध आहेत. मात्र बऱ्याचदा गरज नसताना किंवा दिल्या जाणाऱ्या खतांचे पिकांमधील कार्य माहिती नसताना त्यांची मात्रा पिकास दिली जाते. अशावेळी पीक उत्पादन खर्चात वाढ होते तसेच पिकास अनावश्यक खतांची मात्रा दिल्यामुळे पिकावर विपरीत परिणाम दिसून येतात. परिणामी उत्पादनात घट संभवते. म्हणूनच आजच्या आपल्या या लेखात आपण पाण्यात विरघळणारी खते (Water soluble fertilizers) म्हणजेच विद्राव्य खते त्यांचे प्रकार व वापराच्या पद्धती याविषयी जाणून घेणार आहोत.

विद्राव्य खते म्हणजे काय? (What are water soluble fertilizers):

  • सध्या शेतीमध्ये रासायनिक खत वापरावर होणारा खर्च वाढत आहे.
  • साहजिकच विद्राव्य खतांचा वापर वाढला आहे.
  • विद्राव्य खते पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार द्यावयाची असतात.
  • सध्या बाजारात प्रमुख आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असलेली अनेक विद्राव्य खते पीक वाढीच्या विविध अवस्थेनुसार विविध ग्रेड मध्ये उपलब्ध आहेत.
  • विद्राव्य खते घन तसेच द्रवरुप स्वरुपात उपलब्ध आहेत. घन विद्राव्य खते एक किलो व पंचवीस किलोच्या पॅकिंगमध्ये बाजारात उपलब्ध आहेत.
  • अन्नद्रव्याच्या प्रमाणानुसार किंमतीमध्ये बदल होत असतो. ही खते पाण्यात 100 टक्के विरघळतात व आम्लधर्मीय आहेत.
  • विद्राव्य खते ठिबक सिंचनातून तसेच फवारणीसाठी योग्य असतात.
  • काही विद्राव्य खतांमध्ये मुख्य अन्नद्रव्यां बरोबर दुय्यम अन्नद्रव्ये (मॅग्रेशियम व सल्फर) व सूक्ष्म अन्नद्रव्ये (लोह, जस्त, तांबे) असतात.
  • विद्राव्य खते प्रामुख्याने पिकांवर फवारणीद्वारे दिल्याने जास्त फायदा होतो. कारण ती पिकांना लवकर उपलब्ध होतात.

विद्राव्य खतांचा वापर पिकांसाठी कशाप्रकारे केला जाऊ शकतो?

अ) फवारणीद्वारे

ब) सूक्ष्म ठिबक सिंचनाद्वारे

विद्राव्य खते आणि त्यांचा वापर:

19:19:19 व 20:20:20 -

  • या खतांना 'स्टार्टर ग्रेड' असे म्हटले जाते. या खतांचा वापर प्रामुख्याने पीक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत शाकीय वाढीसाठी केला जातो.

00:52:34 -

  • या खतास 'मोनो पोटॅशिअम फॉस्फेट' म्हणून ओळखले जाते.
  • फुले लागण्यापूर्वी किंवा लागल्यानंतर या खताचा वापर केला जातो.
  • यामध्ये स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात.
  • फळपिकांमध्ये फळांच्या योग्य वाढीसाठी तसेच आकर्षक रंगासाठी याचा वापर होतो.

12:61:00 -

  • या खतास 'मोनो अमोनिअम फॉस्फेट' असे म्हणतात.
  • नवीन मुळांची तसेच शाकीय वाढ जोमदार होण्यासाठी हे खत उपयुक्त असते. फुलांची योग्य वाढ आणि पुनरुत्पादनासाठी या खताचा उपयोग होतो. यामुळे फुटवा चांगला येण्यासही मदत होते.

13:40:13 -

  • कपाशीसारख्या पिकात पात्या, फुले लागण्याच्या वेळी या खताची फवारणी केल्यास फुलगळ थांबते. तसेच शेंगावर्गीय पिकात शेंगाची संख्या वाढण्यास मदत होते.

13:00:45 -

  • या खतास 'पोटॅशिअम नायट्रेट' म्हणतात. यामध्ये नत्राचे प्रमाण कमी असून, पाण्यात विद्राव्य पालाशचे प्रमाण अधिक असते. फुलोऱ्यानंतरच्या अवस्थेत व पक्व अवस्थेत या खताची आवश्यकता असते. अन्ननिर्मिती व त्याच्या वहनासाठी हे खत उपयोगी आहे. या खतामुळे अवर्षण स्थितीत पिके तग धरू शकतात.
  • या खतास 'पोटॅशिअम नायट्रेट' असे म्हणतात.
  • पिकास पाण्याचा ताण पडला असल्यास पिकाची प्रतिकारकक्षमता वाढविण्यासाठी हे खत उपयुक्त आहे.
  • हे खत वनस्पतींमध्ये अन्न तयार करणे व त्याचे वहन करणे यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे फुलोऱ्यानंतरच्या किंवा परिपक्वतेच्या अवस्थेत या खताची आवश्यकता असते.

12:32:61 -

  • कायिक वाढ थांबवून फुलधारणा होण्यासाठी, फुलकळी जास्त येण्यासाठी तसेच फळधारणेसाठी या खताचा उपयोग होतो.

24:24:00:8 -

  • या खतामधील नत्र हे अमोनिकल व नायट्रेट स्वरूपात उपलब्ध होते. शाकीय वाढीच्या तसेच फुलधारणा अवस्थेत याचा वापर करता येतो.

00:00:50 -

  • या खतास पोटॅशिअम सल्फेट किंवा सल्फेट ऑफ पोटॅश' असे म्हणतात.
  • या खतामुळे पीक अवर्षण स्थितीतही तग धरू शकते.
  • फळाचा आकार, रंग, वजन वाढवून गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि टिकाऊपणा वाढविण्यासाठी हे खत मदत करते.
  • या खतामध्ये गंधक सल्फेट स्वरूपात उपलब्ध असल्याने भुरीसारख्या रोगाचे नियंत्रण चांगल्याप्रकारे होते.

कॅल्शिअम नायट्रेट -

  • या खताच्या वापरामुळे पिकाच्या मुळ्या जोमदार वाढून पीक काटक बनते. मुळांच्या वाढीसाठी या खताची आळवणी केल्यास चांगले परिणाम मिळतात.
  • पीक वाढीच्या सुरुवातीच्या काळात तसेच शेंगा किंवा फळ वाढीच्या अवस्थेत या खताचा वापर केला जातो.

विद्राव्य खतांमुळे होणारे फायदे (Benefits of water soluble fertilizers):

  • पिकाच्या मुळापाशी गरजेनुसार योग्य अन्नद्रव्य ठराविक प्रमाणात देता येतात.
  • मजूर, पाणी व खते यांची बचत होते.
  • फर्टिगेशन तंत्रामुळे पाणी वापर कार्यक्षमता 40 ते 50 टक्के, खत वापर कार्यक्षमता 25 ते 30 टक्के वाढते.
  • ही विद्राव्य खते (water soluble fertilizers) सोडिअम व क्‍लोरिनमुक्त असल्याने जमिनीच्या गुणधर्मावर अनिष्ट परिणाम होत नाही.
  • पिकाची वाढ जोमाने झाल्याने पिकांचे रोगांना बळी पडण्याचे प्रमाण कमी होते.
  • खते विभागून जमीन, पिकाच्या व हवामानातील बदलानुसार देता येतात.
  • फवारणीद्वारे विद्राव्य खते दिल्यास ती त्वरित वनस्पतींना उपलब्ध होतात.
  • जमिनीतील पाण्याची कमतरता किंवा कडक उन्हाळा अशा परिस्थितीत फवारणीद्वारे खतांची पूर्तता करता येते.
  • अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे दिसू लागताच त्वरित ती कमतरता पानांद्वारे पोषकतत्व देऊन भरून काढता येते.
  • पिकामध्ये अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे दिसल्यास लगेच त्या अन्नघटकांच्या संबंधित विद्राव्य खतांची फवारणी केल्यास ही खते प्रभावीपणे कार्य करतात.

विद्राव्य खते (water soluble fertilizers) वापरताना घ्यावयाची काळजी:

  • एक किलो विद्राव्य ड्रीप खते जसे 19:19:19, 12:61:00 आणि 00:52:34 इत्यादी विरघळण्यासाठी कमीत कमी 15 लिटर पाणी वापरावे.
  • खते विरघळण्यासाठी पाणी स्वच्छ वापरावे.
  • योग्य मिश्रणासाठी पाण्यामध्ये खते टाकावीत. उलटे खतामध्ये पाणी टाकू नये.
  • ठिबकमधून खते द्यायची संपल्यानंतर दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ पाणी देऊ नये.
  • विद्राव्य खतांच्या उत्कृष्ट परिणामासाठी कंपनीच्या शिफारशीप्रमाणे उत्पादनाचा वापर करावा.
  • एक किलो 00:00.50 ड्रिप खत विरघळण्यासाठी कमीत कमी वीस लिटर पाणी वापरावे.
  • खते देताना पिकाची अवस्था, वाफसा, वातावरण याचा नीट अभ्यास करणे गरजेचे आहे.
  • सर्व ड्रीपर्स समान पातळीवर असणे गरजेचे आहे. यामुळे सर्व पिकाला योग्य प्रमाणात खते मिळतात.
  • ठिबक सिंचन संचात कोठेही लिकेज असता कामा नये. अन्यथा खते वाया जातात.

तुम्ही पाण्यात विरघळणारी कोणती खते वापरता? व कोणती पद्धत वापरता? तुमची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध खतांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. पाण्यात विरघळणारी खते म्हणजे काय?

पाण्यात सहज विरघळणाऱ्या खतांच्या श्रेणीला पाण्यात विरघळणारी म्हणजेच विद्राव्य खते असे म्हणतात.

2. विद्राव्य खते कोणत्या स्वरूपात देता येतात?

विद्राव्य खते प्रामुख्याने पिकांवर फवारणीद्वारे दिल्याने जास्त फायदा होतो. कारण ती पिकांना लवकर उपलब्ध होतात. मात्र सूक्ष्म ठिबक सिंचनाद्वारे देखील विद्राव्य खते दिली जातात.

3. कॅल्शिअम नायट्रेटचा वापर पिकात केव्हा केला जातो?

पीक वाढीच्या सुरुवातीच्या काळात तसेच शेंगा किंवा फळ वाढीच्या अवस्थेत कॅल्शिअम नायट्रेटचा वापर केला जातो.

51 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor