तपशील
ऐका
कपाशी
तण
कृषी ज्ञान
तण व्यवस्थापन
DeHaat Channel
26 May
Follow

कपाशीतील तण व्यवस्थापन (Weed Management in Cotton)

नमस्कार शेतकरी बंधूंनो,

पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपाशी पिकावर विविध प्रकारचे तण आढळतात. शेतात वाढणाऱ्या या निरनिराळ्या तणांमुळे अन्नद्रव्ये, पाणी, हवा, जागा व सूर्यप्रकाश इ. गोष्टींची कापूस पिकासोबत स्पर्धा होऊन उत्पादनात घट येते. तणांच्या अमर्यादित वाढीमुळे पीक पेरणी, पाणी देणे व आंतरमशागत अशा विविध कामांत अडथळा निर्माण होतो. विविध तणांमुळे कापूस पिकात 74-89 टक्क्यांपर्यंत घट येत असल्याचे विविध प्रयोगांचे निष्कर्ष आहेत. म्हणूनच सुरुवातीच्या 9 आठवड्यांपर्यंत (60 दिवसापर्यंत) कपाशीचे पीक तणमुक्त ठेवणे गरजेचे असते. मागील काही कालावधीत कापूस हंगामात झालेल्या सततच्या हवामान बदलांमुळे तणांचा प्रादुर्भाव वाढलेला दिसून येतो. म्हणूनच आजच्या या लेखात आपण कपाशीमधील तण व्यवस्थापनाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

कापूस - तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी?

  • कापूस पिकात पीक, तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी 20 ते 60 दिवसांपर्यंत असतो. या काळात तण नियंत्रण न केल्यास उत्पादनात लक्षणीय घट येते.
  • या कालावधीनंतर पीक तणमुक्त ठेवले, तरी उत्पादनात झालेली घट भरून निघत नाही.
  • कापूस लागवड करताना दोन ओळींतील जास्त अंतर व सुरुवातीची कापूस पिकाची होणारी हळूवार वाढ यामुळे पेरणीनंतर सुरुवातीच्या काळात तणांचा मोठा प्रादुर्भाव होतो.
  • सुरुवातीच्या 9 आठवड्यांपर्यंत (60 दिवसापर्यंत) कपाशीचे पीक तणमुक्त ठेवणे गरजेचे असते.

प्रतिबंधात्मक उपाय :

  • प्रमाणित आणि स्वच्छ बियाणे पेरणीसाठी वापरावे.
  • चांगले कुजलेले आणि तणांचे बी नसणारे शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरावे.
  • कुंपणे, बांध यावर वाढणारी तणे फुलोऱ्यात येण्यापूर्वीच काढावीत. त्यासाठी वरचेवर स्वच्छता मोहीम राबवावी.
  • पाण्याचे पाट व इतर पाणथळ जागा तणमुक्त ठेवावी.
  • औत, अवजारे, जनावरे यांची ने -आण करतेवेळी तणांचे बी त्यांना चिकटून एका शेतातून दुसऱ्या शेतात पसरणार नाही, याची काळजी घ्यावी.

निवाराणात्मक उपाय :

  • तणांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याचा बंदोबस्त करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व पद्धती निवाराणात्मक उपायात येतात.
  • मशागतीय किंवा तांत्रिक पद्धत: या पद्धतीमध्ये सर्व परंपरागत, प्रचलित पद्धतींचा समावेश होतो.
  • जमिनीची पूर्वमशागत
  • कोळपणी व खुरपणी आंतरपीक पद्धत
  • पिकांची फेरपालट
  • रासायनिक तणनियंत्रण सध्या वाढलेली मजुरी आणि मजुरांची कमतरता या दोन्ही गोष्टींमुळे शेतकऱ्यांचा कल रासायनिक तण नियंत्रणाकडे वाढत आहे.
  • कापूस पिकात उगवणपूर्व, तसेच उगवणपश्‍चात तणनाशकांचा वापर करता येतो.
  • कापूस पिकात शिफारशीत उगवणपूर्व आणि उगवणपश्‍चात तणनाशकांचा योग्य वेळी व योग्य प्रमाणातच वापर करावा.

तण नियंत्रण पद्धती :

  • तण नियंत्रणासाठी तण काढणे हा एक उत्तम पर्याय आहे.
  • पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी पहिली डवरणी करावी.
  • पेरणीनंतर 50 ते 60 दिवसांनी पिकात दुसरी डवरणी करावी.
  • रासायनिक नियंत्रणासाठी खालील तणनाशकांचा वापर करावा:
  • उगवणपूर्व, म्हणजेच पेरणीनंतर लगेच किंवा दुसऱ्या दिवशी पेंडीमेथालिन 30% ईसीची (यूपीएल - दोस्त) 700-1000 मि.ली. वार्षिक गवतवर्गीय व रुंद पानांच्या तणांसाठी एकरी 300 ली पाण्यातून फवारणी करावी.
  • उगवणपश्‍चात, उभ्या पिकात पीक 50-60 दिवसांचे असताना पॅराक्वाट डायक्लोराईड 24 एसएल (देहात - चॉप ऑफ) 500-850 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून  फवारावे.
  • ह्या औषधाची फवारणी दोन ओळींच्या मधेच करावी.
  • पिकावर औषध उडणार नाही याची काळजी घ्यावी.
  • याशिवाय पायरीथिबॅक सोडियम 10% ईसी (धानुका- डोजो मॅक्स) 500 मिली प्रति एकर 200 लिटर पाण्यातून फवारणी करावी.

तणनाशके फवारताना घ्यावयाची काळजी:

  • तणनाशकाच्या डब्यावरील लेबल नीट वाचून घ्यावे.
  • शिफारशीत मात्रेनुसार व वेळेनुसार फवारावे.
  • ढगाळ व पावसाळी वातावरण, धुके किंवा पाऊस असताना तणनाशकाची फवारणी करू नये.
  • वारा नसताना व जमिनीत ओलावा असताना उगवणपूर्व तणनाशकाची फवारणी करावी.
  • कडक उन्हात उगवणपश्‍चात तणनाशकाची फवारणी टाळावी.
  • उगवणपूर्व तणनाशकाची फवारणी पेरणीच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पिकाचे बी मातीने व्यवस्थित झाकल्यानंतरच करावी.
  • तणनाशकांचा शिफारशीत मात्रेतच वापर करावा.
  • वारंवार एकच तणनाशक न वापरता आलटून पालटून वापर करावा. एकदा पेरणीपूर्व तर दुसऱ्यावेळी शिफारशीप्रमाणे उगवणपश्‍चात तणनाशक वापरावे.
  • फेरपालट केल्यास पर्यायाने तणनाशक बदलल्यास तणनाशकाचा जमिनीतील अंश कमी होतो.
  • सेंद्रिय खताचा एकरी 4 ते 6 टन वापर केल्यास जमिनीतील तणनाशकाचे अंश धरून ठेवले जातात तसेच अधिकच्या सेंद्रिय खतांमुळे जमिनीतील सूक्ष्म जीवजंतूचे प्रमाण सुध्दा वाढते.
  • खोल नांगरट केल्यास जमिनीच्या थरांची उलथापालथ होऊन वरचा जास्त अंश असलेला थर अशा मशागतीमुळे खोल जातो.
  • त्यामुळे तणनाशकाच्या अंशाचा पिकांवर प्रतिकूल परिणाम दिसून येत नाही.

तणनाशकामुळे होणारे फायदे:

  • पीक उत्पादन वाढते.
  • तणनाशके मॅन्युअल खुरपणी किंवा तण नियंत्रणाच्या इतर यांत्रिक पद्धतींपेक्षा अधिक किफायतशीर ठरतात, विशेषत: मोठ्या शेतात.
  • हाताने तण काढणे किंवा तण नियंत्रणाच्या इतर यांत्रिक पद्धतींच्या तुलनेत तणनाशकांचा वापर केल्यास वेळ वाचतो.
  • तणनाशके मशागतीची गरज कमी करतात, ज्यामुळे मातीची धूप रोखता येते आणि मातीचे आरोग्य सुधारते. जीवाश्म इंधनावर चालणाऱ्या यंत्र सामग्रीची गरज कमी करून ते हरितगृह वायूचे उत्सर्जनही करतात.
  • तणनाशके शेतातील मजुरीचा खर्च कमी करू शकतात.

तणनाशकांमुळे होणारे तोटे:

  • काही तणनाशके नॉन-बायोडिग्रेडेबल असतात आणि दीर्घ काळासाठी हानिकारक असतात.
  • तणनाशके किंचित विषारी आहेत. त्यामुळे ती विविध आजारांना कारणीभूत ठरू शकतात. काही डोळ्यांच्या आणि त्वचेच्या समस्या आणि वापरकर्त्यांच्या श्वासोच्छवासावर देखील परिणाम करू शकतात आणि तण नाशकाच्या अयोग्य वापरामुळे मृत्यू देखील होऊ शकतो.
  • वाहत्या पावसाच्या पाण्यासह तणनाशके प्रवाहात वाहून जाऊ शकतात किंवा भूगर्भातील पाण्याच्या पुरवठ्यात मिसळून पाणी प्रदूषित करू शकतात.
  • तृणभक्षी तणनाशकांनी उपचार केलेल्या वनस्पती खाऊ शकतात ज्यामुळे वाढणाऱ्या अन्न साखळीत विषारी घटक जातील.

तुम्ही कपाशी पिकात तणांचे व्यवस्थापन कसे केले? आणि तुम्हाला त्याचा काय फायदा दिसून आला? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “तण व्यवस्थापन” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. तण किती प्रकारचे असतात?

तण एकदलवर्गीय व द्विदलवर्गीय अशा दोन प्रकारचे असतात.

2. तणनाशक फवारणीसाठी कोणते नोझल व पंप वापरावा?

जमिनीवर तणनाशक फवारणी करत असल्यास शक्यतो फ्लॅटफेन नोझलचा वापर करावा व पीक उगवणीनंतर फवारावयाच्या तणनाशकाकरिता शक्यतो फ्लडजेट नोझलचा वापर करावा. तणनाशकांच्या फवारणीसाठी शक्यतो वेगळा पाठीवरचा नॅपसॅप पंप वापरावा.

3. कापूस पिकात तणांमुळे किती टक्क्यांपर्यंत घट दिसून येते?

कापूस पिकात विविध तणांमुळे 74 - 89 टक्क्यांपर्यंत घट दिसून येते.

58 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor