कवठाची शेती (Wood Apple cultivation)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
कवठ हे फळ आकाराने लहान असते आणि या फळाला कठीण कवच किंवा आवरण असते. संस्कृतमध्ये याला दधीफल किंवा कपित्थ असे म्हणतात तर, इंग्रजीमध्ये याला ‘वूड एप्पल’ असे म्हणतात. औषधी गुणधर्म, वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे कवठ फळांना चांगली मागणी आहे. कवठ हा मध्यम उंचीचा वृक्ष 'रूटेसी' कुळातील असून फेरोनिया एलेफंटम हे शास्त्रीय नाव आहे. कवठ हा काटेरी, पानझडी वृक्ष आहे. झाड ६ ते ९ मीटर उंच वाढते. साल हिरवट, पांढरी रंगाची खडबडीत, जाड असते. झाडाची पाने बारीक असतात. फळाचा गर विटकरी रंगाचा असून, चवीला आंबट-गोड असतो. महाराष्ट्रात नगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली जिल्ह्यात शेतीच्या बांधावर, गोठ्याजवळ कवठाची झाडे आढळतात. हे फळझाड पाण्याचा ताण सहन करू शकणारे आणि अत्यंत काटक आहे. वृक्षाचा विस्तार मोठा असल्याने घर किंवा गोठ्याच्या शेजारी सावलीसाठी कवठाची लागवड केली जाते. कवठाचे अजूनही बरेच फायदे आहेत, म्हणूनच याची शेती लाभदायी ठरते. चला तर मग आजच्या भागात जाणून घेऊया कवठ शेतीविषयीची सविस्तर माहिती.
कवठ शेतीसाठी योग्य जमीन:
- मजबूत मूळ प्रणालीमुळे कवठाचे झाड दुष्काळ सहन करण्याबरोबरच नापिक ते पडीक जमिनीत उत्तम वाढते.
- हल्की व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी.
- चुनखडी व खारवट जमिनीमध्ये काळजी घ्यावी लागते.
कवठ शेतीसाठी योग्य हवामान:
- झाडाच्या जोमदार वाढीसाठी उष्ण व कोरडे हवामान, 250 ते 300 मिलिमीटर पाऊस आणि 20 ते 35 अंश सेल्सिअस सरासरी तापमान लागते.
- मध्यम कोरड्या हवामानात तसेच समुद्रसपाटीपासून 5000 मीटर उंचीवर झाडे आढळतात.
- हे झाड 48 अंश सेल्सिअस आणि हिवाळ्यातील - 6 अंश सेल्सिअस तापमान सहन करू शकते.
- शुष्क हंगामामध्ये कवठाची फूल व फळ धारणा होते.
अभिवृद्धी:
- अभिवृद्धी बिया, डोळे भरून व कलमाने करतात.
- ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये पूर्णपणे परिपक्व झालेल्या व आकाराने मोठ्या असलेल्या फळांमधून बिया घेऊन पॉलीबॅगमध्ये पेराव्यात.
- बियांची उगवण 7 ते 10 दिवसांनी सुरू होऊन 40 दिवसांमध्ये पूर्ण होते.
- रोप हळुवार वाढत असल्याने आठ ते दहा महिन्यांमध्ये लागवडीस तयार होते. परंतु, बियांपासून निर्मित रोपाला फळधारणा होण्यास 6 ते 8 वर्षाचा कालावधी लागतो. म्हणूनच, कलमाद्वारे तयार केलेली उच्च प्रतीची रोपे तयार करून लागवडीस वापरली जातात.
- नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्या दरम्यान एक वर्षाच्या रूटस्टॉकवर कलम केले जाते.
महाराष्ट्रामध्ये लागवडीस शिफारस केलेली जात:
सीएचईएसडब्लू-15
कवठ लागवड हंगाम:
फेब्रुवारी-मार्च किंवा जुलै-ऑगस्ट दरम्यान कवठ लागवड करावी.
कवठ पिकासाठी लागवड अंतर:
- लागवडीच्या दोन महिन्यांपूर्वी 1 मी. x 1 मी. x 1 मी. आकाराचे खड्डे खोदून त्यामध्ये चांगले कुजलेले 10-15 किलो शेणखत, 100 ते 200 ग्रॅम निंबोळी पेंड मिसळावी.
- बीजनिर्मित कवठ रोपांची लागवड 8 मी. x 8 मी., 10 मी × 8 मी. किंवा 12 × 10 मी. अंतरावर तसेच बांधावरील लागवड 5 ते 10 मीटर अंतरावर करावी. कलम केलेल्या रोपांची लागवड 8 मी. x 5 मी. किंवा 6 मी. × 6 मी. अंतरावर करावी.
कवठ लागवड:
- रोपांच्या भोवतीची माती व्यवस्थित दाबून लगेच पाणी द्यावे.
- आळ्यातील तण सतत काढावे, आच्छादन करावे.
- आळ्यातील माती दर महिन्याला वरखाली केल्यास आणि बुंध्याला माती लावल्यास पहिल्या चार वर्षांत दुष्काळात देखील झाड सहज तग धरू शकते.
कवठ पिकात पाणी आणि खत व्यवस्थापन:
- कोरडवाहू किंवा शुष्क भागामध्ये लागवडीनंतर दोन वर्षांपर्यंत पाणी दिल्याने चांगली वाढ होते.
- जल-मृद् संवर्धनाच्या पद्धतीचा वापर केल्याने रोपांची चांगली वाढ होते.
- फळांच्या उत्पादनाला फायदा होतो.
- व्यापारीदृष्ट्या लागवड केलेल्या बागांमध्ये फळ काढणीनंतर पाण्याचा ताण दिल्याने फुलधारणा होण्यास मदत होते.
- फुलधारणेनंतर बागेस पाणी द्यावे.
- रोपाला पहिली 4 वर्षे पावसाळ्यात जून महिन्यात आळे करून 650 ग्रॅम नत्र, स्फुरद, पालाशचे मिश्रण (2:1:1) आणि 500 ग्रॅम निंबोळी पेंड आणि 15 किलो शेणखताबरोबर द्यावे.
- वाढीच्या टप्प्यात काही वेळा फांद्यामधून डिंक निघतो. असा भाग खरवडून त्यावर बोर्डो पेस्ट लावावी.
कवठ पिकात आंतरपिकांचे नियोजन:
- पहिले दोन ते तीन वर्षे रोपांची संथ गतीने वाढ होते.
- आंतरपिके म्हणून मिरची, झेंडू, हरभरा, भुईमूग लागवड शक्य आहे.
- आंतरपिके घेताना कमी पाण्यात येणारी पिके घ्यावीत. जेणेकरून कवठाच्या उत्पादकतेवर परिणाम होणार नाही.
कवठ पीक छाटणी व्यवस्थापन:
- सुरुवातीच्या काळामध्ये रोपांना वळण आणि आकार दिल्याने बागेमध्ये मशागत सोपी होते.
- फळधारणा ही नवीन शाखांवर होत असल्याने जुन्या, रोगट व वाळलेल्या फांद्या फळतोडणी झाल्यानंतर काढून टाकाव्यात.
कवठ फळ परिपक्वता आणि उत्पादन:
- डोळा भरलेली तसेच भेट कलमांना लागवडीनंतर चौथ्या वर्षी फळे लागतात. बियांपासून तयार केलेल्या रोपांना सातव्या वर्षी फळे लागतात.
- उत्पादन हे जात आणि लागवड अंतरावर अवलंबून आहे.
- पाचव्या वर्षांनंतर कलमांना सरासरी 35 ते 50 आणि दहाव्या वर्षापासून सरासरी 80 ते 120 किलो फळे मिळतात.
- कवठाच्या फळांना जास्त मागणी ही ऑक्टोबर ते जानेवारी महिन्यामध्ये पुणे, मुंबई, नागपूर, गुजरात आणि हैदराबाद बाजारपेठेत असते.
अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य हवामानानुसार कवठाची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या कवठ पिकाच्या लागवडीकरता कोणते तंत्र वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “बागायती पिके” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. कवठ पिकास कोणते हवामान उपयुक्त आहे?
कवठ पिकास उष्ण व कोरडे हवामान, 250 ते 300 मिलिमीटर पाऊस आणि 20 ते 35 अंश सेल्सिअस सरासरी तापमान लागते. मध्यम कोरड्या हवामानात तसेच समुद्रसपाटीपासून 5000 मीटर उंचीवर ही झाडे आढळतात.
2. कवठाचे पीक कोणत्या जमिनीत घेता येते?
कवठाचे झाड दुष्काळ सहन करण्याबरोबरच नापिक ते पडीक जमिनीत उत्तम वाढते. तसेच हल्की व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकासाठी निवडावी.
3. कवठ झाडांमध्ये कोणती आंतरपिके घेता येतात?
कवठ झाडांमध्ये आंतरपिके म्हणून मिरची, झेंडू, हरभरा, भुईमूग लागवड शक्य आहे.
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor